समुद्री वारे स्थिर होण्यास उशीर होत असल्यामुळेच मुंबई कमालीची तापतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 02:50 AM2018-04-20T02:50:24+5:302018-04-20T02:50:24+5:30

हे वारे जर सकाळी ११ वाजण्यापूर्वी स्थिर झाले तर मुंबईकरांना तापदायक वातावरणाला सामोरे जावे लागत नाही.

Due to the delay in stagnating the sea breeze, Mumbai is very hot | समुद्री वारे स्थिर होण्यास उशीर होत असल्यामुळेच मुंबई कमालीची तापतेय

समुद्री वारे स्थिर होण्यास उशीर होत असल्यामुळेच मुंबई कमालीची तापतेय

Next

मुंबई : गुजरात प्रदेशात प्रतिचक्रीवादळ तयार झाले आहे. येथे उष्णतेची लाट आहे. दरम्यानच्या काळात पूर्वेकडून महाराष्ट्राकडे उष्ण, शुष्क आणि कोरडे वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्याच्या कमाल तापमानात उत्तरोत्तर वाढ नोंदविण्यात येत आहे. मुंबईचा विचार करता अरबी समुद्राहून मुंबईकडे वाहणारे वारे स्थिर होण्यास दुपार होत आहे. दुपारी हे वारे स्थिर होत असल्याने येथील वातावरण तप्त होत आहे. हे वारे जर सकाळी ११ वाजण्यापूर्वी स्थिर झाले तर मुंबईकरांना तापदायक वातावरणाला सामोरे जावे लागत नाही. तर पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्याच्या काही भागातील हवामानात आर्द्रता अधिक नोंदविण्यात येत असल्याने येथे काही ठिकाणी पावसाची नोंद होत आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी ‘लोकमत’ला दिली.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, मागील २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. कोकण, गोवा, विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. ‘स्कायमेट’च्या माहितीनुसार, विदर्भ, मराठवाड्यात उष्ण हवामान आहे. चंद्रपूर येथे बुधवारी ४५.४ अंश कमाल तापमानाची नोंद झालीे. दिवसाचे जास्तीतजास्त ४० अंश किंवा त्यापेक्षा जास्त तापमान असेल तर उष्णतेची लाट घोषित केली जाते. किंवा तापमान सामान्य सरासरीपेक्षा ५ अंशाने वाढते तेव्हा उष्णतेची लाट घोषित केली जाते. विदर्भ, मराठवाड्यात कमाल तापमान ४० व ४० अंशापेक्षा जास्त आहे. मध्य महाराष्ट्रासह लगतच्या प्रदेशात ४० अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद आहे. तर, कोकणातील तापमान ३० अंशावर स्थिर आहे.

मोबाइलवर मिळणार पावसाची माहिती
पुणे : येत्या पावसाळ्यात मुंबईतील कोणत्या भागात किती पाऊस पडत आहे, याची तत्काळ माहिती मुंबईकरांना त्यांच्या मोबाइलवर मिळेल. त्यावरून कोठे पाणी साचण्याची शक्यता आहे, हे लक्षात घेऊन घराबाहेर पडायचे की नाही, हे ठरविणे शक्य होईल. मुंबई पालिका आणि हवामान विभाग एकत्रितपणे ही माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. अर्थ सायन्स मंत्रालयाचे सचिव डॉ़ माधवन नायर राजीवन यांनी याबाबत माहिती दिली़

हवामान विभागाचा अंदाज
२० ते २१ एप्रिल : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.
२२ एप्रिल : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल.
२३ एप्रिल : मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल.
२० ते २१ एप्रिल : मुंबईमधील आकाश मुख्यत: निरभ्र राहील.
कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २५ अंशाच्या आसपास राहील.

Web Title: Due to the delay in stagnating the sea breeze, Mumbai is very hot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई