डॉ. सुहास पेडणेकर मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 01:42 PM2018-04-27T13:42:51+5:302018-04-27T14:15:33+5:30

डॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे. 

Dr. Suhas Pednekar is the new Vice Chancellor of the University of Mumbai | डॉ. सुहास पेडणेकर मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू

डॉ. सुहास पेडणेकर मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू

Next

मुंबई- रसायनशास्त्राचे प्राध्यापक आणि माटुंग्याच्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे. राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी शुक्रवारी ( 27) डॉ. पेडणेकर यांना राजभवन येथे बोलावून नियुक्तीचे पत्र सुपूर्द केले. डॉ. पेडणेकर यांची नियुक्ती कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची 65 वर्षे पूर्ण करतील तोपर्यंत (यापैकी जे अगोदर असेल ते) करण्यात आली आहे. 

कुलगुरुपदासाठी रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर यांचे नाव आघाडीवर होते. अखेर त्यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड  करण्यात आली आहे. रुईयाला मिळालेला स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा आणि सत्ताधारी पक्षाशी असलेले घनिष्ठ संबंध यामुळे डॉ. पेडणेकर यांची नियुक्ती झाल्याची चर्चा आहे. डॉ. पेडणेकर यांनी विद्यापीठ प्रशासनावर कधीही काम केलेले नाही. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी ते किती सक्षमपणे पार पाडतात हे येत्या काळात समजणार आहे.  

गेल्या वर्षी 24 ऑक्टोबर रोजी डॉ. संजय देशमुख यांना विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून कार्यमुक्त केल्याने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूपद रिक्त झाले होते. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती बनवली होती. डॉ श्यामलाल सोनी, संचालक, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, पौडी गढवाल, उत्तराखंड व भूषण गगराणी, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको हे समितीचे अन्य सदस्य होते.  

Web Title: Dr. Suhas Pednekar is the new Vice Chancellor of the University of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.