कोणी घर देतं का... घर! आयुष्यभराची पुंजी गुंतवून ‘रस्त्यावर’ आलेल्यांचा आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 03:55 AM2018-02-11T03:55:24+5:302018-02-11T03:55:34+5:30

निवृत्तीनंतर हक्काच्या घरात जाण्यासाठी आयुष्यभराची पुंजी स्वस्त घराच्या ‘स्वप्नात’ गुंतवली. मुंबईत स्वत:च्या हक्काच्या घरात जाण्यासाठी त्यांची लगबग सुरू झाली. घराची प्रतीक्षा अंतिम टप्प्यात असतानाच त्यांचे स्वप्न भंगले.

Does anyone give a house ... home! The voices of the 'streets' engage with life-long life | कोणी घर देतं का... घर! आयुष्यभराची पुंजी गुंतवून ‘रस्त्यावर’ आलेल्यांचा आवाज

कोणी घर देतं का... घर! आयुष्यभराची पुंजी गुंतवून ‘रस्त्यावर’ आलेल्यांचा आवाज

googlenewsNext

- मनीषा म्हात्रे

मुंबई : निवृत्तीनंतर हक्काच्या घरात जाण्यासाठी आयुष्यभराची पुंजी स्वस्त घराच्या ‘स्वप्नात’ गुंतवली. मुंबईत स्वत:च्या हक्काच्या घरात जाण्यासाठी त्यांची लगबग सुरू झाली. घराची प्रतीक्षा अंतिम टप्प्यात असतानाच त्यांचे स्वप्न भंगले. त्यामुळे सध्या ‘कोणी घर देतं का घर..?’ असे म्हणण्याची वेळ खारघरच्या ढोले दाम्पत्यावर ओढावली आहे. या मायानगरीतील ६ हजारांहून अधिक कुटुंबे या स्वस्त घराच्या घोटाळ्याची शिकार ठरली आहेत.
परळमध्ये मधुकर सूर्यवंशी या महाठगाने मिलिंद कासारेच्या मदतीने ‘भीम फाउंडेशन’ ही संस्था स्थापन केली. ३ लाखांपासून १० लाखांमध्ये वन बीएचके, २ बीचके फ्लॅट देण्याचे आमिष या लोकांना दाखविण्यात आले. अशावेळी राजकीय नेत्यांच्या नावाखाली तो या गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करत होता. त्याच्या आमिषाला बळी पडून ६ हजारांहून अधिक नागरिकांनी या योजनेत पैसे गुंतवले. मात्र, २०१४मध्ये हजारो कोटींचा घोटाळा करून तो पसार झाला. त्याच्या या घोटाळ्यामुळे अनेक जण रस्त्यावर आले आहेत. यामध्ये फसलेल्या काही कुटुंबीयांच्या व्यथा...

दोन वेळच्या जेवणाची भ्रांत...
वरळी बेस्ट वसाहतीत उत्तम ढोले हे पत्नी सुनंदा आणि मुलांसोबत राहायचे. ढोले बेस्ट चालक, तर पत्नी गृहिणी. लग्नानंतर मुले दुसरीकडे राहण्यास गेली. निवृत्तीनंतर कुठे जायचे, हा प्रश्न दोघांनाही सतावत होता. अशातच भाचीकडून त्यांना भीम फाउंडेशनमधील स्वस्त घरांच्या योजनेबाबत समजले. त्यांनी तेथे धाव घेतली.
अवघ्या १० लाखांमध्ये त्यांना मालवणीसारख्या ठिकाणी वन बीएचके फ्लॅट देण्याचे आमिष दाखविले. त्यांनी हक्काच्या घरासाठी जवळचे दागिने, पीएफ, नोकरीतून मिळणारे पैसे आणि आतापर्यंत बचत केलेल्या पुंजीतून अडीच लाख रुपये गुंतवले.
२०१४मध्ये त्यांना घर देण्यात येणार होते. त्याच काळात ढोलेही निवृत्त झाले. मात्र, घर तयार झाले नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर काही दिवसांतच भीम फाउंडेशनचा संस्थापक मधुकर सूर्यवंशी पसार झाल्याचे समजले. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ढोले यांची पत्नी सुनंदा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपली फसवणूक झाल्याचे समजताच या अवस्थेत कुठे व कसे राहायचे, हा प्रश्न दोघांना पडला.
काही कर्ज घेऊन खारघरमध्ये भाड्याने घर घेतले. फसवणूक झाल्याच्या विचारांमध्ये पतीला दोन वेळा हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या उपचाराचा खर्च आणि घरखर्च भागविण्यासाठी घरकाम करावे लागतेय.

गुंतवणूक करताना काळजी घ्या...
सूर्यवंशीसारखे अनेक ठग सध्या स्वस्त घराच्या नावाखाली नागरिकांना फसवताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये अडकणाºयांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना त्याची खातरजमा करणे गरजेचे आहे. संबंधित घर, जागेबाबत माहिती घ्या, कागदपत्रांचीही पडताळणी करा, परिसरातील अन्य रहिवाशांकडूनही घराच्या मूळ मालकाबाबत माहिती घ्या. जेणेकरून भविष्यात फसवणूक होणार नाही, असे आवाहन
मुंबई पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहे.

अशी होते फसवणूक...: हे महाठग सोशल नेटवर्किंग अथवा वृत्तपत्रांमधून स्वस्त घराच्या जाहिराती देतात. ‘सावज’ जाळ्यात अडकताच बनावट कागदपत्रांच्या आधारे करारनामा करून त्यांचा विश्वास संपादन करतात. ओळखीचे अथवा बंद घर विकायचे असल्याचे सांगून नागरिकांना तेथे नेतात आणि त्यांच्याकडून पैसे उकळतात. एकच घर त्यांनी चार ते पाच जणांचा विकल्याचे प्रकारही पश्चिम उपनगरात समोर आले होते.

...आणि रस्त्यावर आलो : वसईच्या राजश्री खंदारे यांनी सांगितले, मी अपंग आणि पती अंध आहेत. अशात मिळेल ते काम करून आमचा उदरनिर्वाह चालतो. स्वस्तात घर मिळण्याच्या आमिषापोटी आम्ही दोघांनी या ‘स्कीम’मध्ये अडीच लाख रुपये गुंतवले. मात्र, हक्काच्या घरात जाण्यापूर्वीच आमची फसवणूक झाली. सध्या त्या पैशांसाठी काढलेल्या कर्जामुळे रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.

घरही गेले
आणि दागिनेही...
अंधेरीतील संगीता पवार. मालाड परिसरात अवघ्या ६ लाखांत घर मिळत असल्याची माहिती त्यांना मिळाली. म्हणून त्यांनी यामध्ये १ लाख २० हजार रुपये भरले. पवार यांनी त्यांच्याकडील दागिने गहाण ठेवून हे पैसे भरले होते. सध्या घरही गेले आणि दागिनेही, असे पवार यांनी सांगितले.

पत्नीचे ऐकले
आणि अडकलो...
बँकेतून निवृत्त झालेले सोलोमन रोहेकर सांगतात, मी अशा गोष्टींवर कधीच विश्वास ठेवत नव्हतो. पत्नीच्या भावाने या योजनेत पैसे गुंतवले होते. त्यानेही आग्रह धरला. त्यामुळे पत्नीनेही हक्काच्या घराबाबत इच्छा व्यक्त केली. दोघांनीही यामध्ये पैसे गुंतवले. आता त्यांचे ऐकले नसते तर बरे झाले असते, असा पश्चात्ताप करीत आहोत.

Web Title: Does anyone give a house ... home! The voices of the 'streets' engage with life-long life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.