Do we die poison? ', PM Modi over social media | ‘आम्ही विष पिऊन मरायचे का?’, सोशल मीडियावरून पंतप्रधानांना साकडे

मुंबई : जोगेश्वरीमध्ये राहणाºया एका अपंग महिलेचे दुकान हडपण्यासाठी तिला स्थानिक गुंडाकडून त्रास दिला जातोय. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी मदत न केल्याने, तिने थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे. यात ‘आम्ही विष पिऊन मरून जायचे का?’ असा सवाल तिने उपस्थित केला आहे.
जोगेश्वरीतील बेहरामबाग परिसरात असलेल्या काजूपाडामध्ये कौसरअली हुसेन शेख ही अपंग महिला, तिची आई झुबेदा (७०) यांच्यासोबत राहते. शेख या पायाने अधू असून, त्यांचे या परिसरात एक जनरल स्टोर आहे. या दुकानावर त्यांचे घर चालते. मात्र, त्याच्या शेजारी राहणारा संतोष सोनावणे नामक व्यक्ती त्यांना त्रास देत आहे. दुकानाच्या शटरच्या दुरुस्तीची परवानगी त्यांना पालिकेकडून मिळाली होती. मात्र, तरीदेखील त्याने तक्रार करून त्यांचे शटर पालिकेच्या माध्यमातून तोडायला लावले. त्यांना दुकान उघडू न देण्यासाठी तो धमकावत आहे, असे त्यांनी ‘यू-ट्यूब’वर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. त्यांना स्थानिक राजकारण्यांसह ओशिवरा पोलिसांकडूनही कोणतीच मदत मिळत नसल्याचाही आरोप केला आहे.
सोनवणेच्या विरोधात त्यांनी दोन अदखलपात्र गुन्हेदेखील ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल केले आहेत. मात्र, त्यांना सोनवणेकडून त्रास देणे सुरूच आहे. त्यामुळे त्यांनी ‘आम्हाला जगू दिले जात नाही, तर आता आम्ही विष पिऊन मारायचे का?’ असा सवाल थेट मोदी यांना विचारला आहे. निदान आता तरी यावर कारवाई करून त्यांना न्याय मिळवून दिला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सर्वतोपरी सहकार्य करणार
‘आम्ही सोनावणेवर चॅप्टर केस दाखल केलेली आहे. त्यानुसार, या महिलेला पोलिसांकडून सर्वतोपरी सहकार्य आम्ही करणार आहोत,’ असे ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष खानविलकर यांनी सांगितले.