पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रासले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 02:50 AM2019-06-11T02:50:06+5:302019-06-11T02:50:17+5:30

पाण्यासाठी वणवण : पालिकेच्या ए, बी आणि सी वॉर्डमधील स्थिती

Disturbed citizens due to water shortage, contaminated water | पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रासले

पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रासले

Next

मुंबई : कुलाबा परिसरातील महापालिकेच्या ए, बी आणि सी विभागातील विविध ठिकाणी पाणीटंचाई आणि दूषित पाणीपुरवठा होत असून नागरिक त्रस्त झाले आहेत.

ए विभागातील गीतानगर, गणेशमूर्तीनगर, आंबेडकरनगर, संक्रमण शिबिर, शिवशक्तीनगर, शिवसृष्टीनगर, मच्छीमारनगर १, २, ३, ४ व ५, महात्मा फुलेनगर, सुदामनगर, दर्यानगर, कुलाबा मार्केट परिसरातील बहुतांश झोपडपट्ट्यांमध्ये नागरिक पाण्यासाठी वणवण करीत आहेत. लहान मुलांना अभ्यासापेक्षा पाणी येण्याच्या वेळापत्रकाला महत्त्व द्यावे लागत आहे.

महात्मा फुलेनगर, आझाद नगरी यासारख्या झोपडपट्टीमध्ये घरोघरी नळजोडणी दिली आहे, परंतु त्या ठिकाणी पाणी अजून उपलब्ध झाले नाही़ पाणी माफियांकडून पाणी विकत घ्यावे लागते. बी आणि सी विभागातील चिराबाजार, धोबीतलाव, काळबादेवी, भुलेश्वर, फणसवाडी, लोहार चाळ, झवेरीबाजार, उमरखाडी, मांडवी येथील जुन्या चाळींमधील नागरिकांना पाण्याची कमतरता, दूषित पाणी या समस्यांना सामोरे जावे लागते़ पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही, असे भाजप आमदार राज पुरोहित यांनी सांगितले.
दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून यावर तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली आहे़

टँकरचे पाणी मागवावे लागते
गेल्या तीन महिन्यांपासून सुतार चाळ परिसरात पाणीटंचाई आहे. दोन दिवसांपासून दूषित पाणी येत आहे. त्या पाण्याला हातही लावू शकत नाही. आम्हाला टँकरने पाणी मागवावे लागले आहे. या प्रकरणी पालिकेकडे तक्रार करूनही कारवाई होत नाही. - नदीम, बोरसादवाला, रहिवासी

..अन्यथा तीव्र आंदोलन
कुलाबा परिसरात पाण्यासाठी नागरिकांची लूट सुरू आहे. पाणी माफियांच्या मोठ्या टोळ्या येथे सक्रिय आहेत. दररोज त्यांचा १४ लाखांचा आर्थिक व्यवहार चालतो. महापालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने पाणी माफिया बिनधास्त येथे पाण्याची अवैध विक्री करीत आहेत. यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
- राज पुरोहित, भाजप आमदार

दोन महिन्यांनंतर पुन्हा दूषित पाणी
आनंदवाडी परिसरात गेल्या एक वर्षापासून दूषित पाणी येत होते़ त्याबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर दोन महिने दूषित पाणी येत नव्हते, पण आता पुन्हा दूषित पाणी येत आहे. - धनराज शाह, रहिवासी
 

Web Title: Disturbed citizens due to water shortage, contaminated water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.