मस्तच! पालिका रुग्णालयात आता डिजिटल केसपेपर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 09:23 AM2023-11-29T09:23:15+5:302023-11-29T09:23:31+5:30

एचएमआयएस प्रणालीसाठी निविदा प्रक्रिया.

Digital case paper now in municipal hospital in mumbai | मस्तच! पालिका रुग्णालयात आता डिजिटल केसपेपर

मस्तच! पालिका रुग्णालयात आता डिजिटल केसपेपर

मुंबई : महापालिकेच्या आरोग्य विभागातील अनेक रुग्णालयात आजही बहुतांश रुग्णालयात हाताने केस पेपर लिहिला जातो. तसेच डॉक्टरही प्रिस्क्रिप्शन हाताने लिहून काढतात. रुग्णाच्या चाचण्याच्या अनेक नोंदी आणि डिस्चार्ज कार्ड लिहून काढावे लागते. त्यामुळे रुग्ण आणि डॉक्टरांचा दोघांचा वेळ वाया जातो. त्यामुळे यापुढे महापालिकेच्या सर्व रुग्णालयात आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली सुरु करण्यात  येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियेचे काम सुरु करण्यात आले, असून त्याची जाहिरात सुद्धा देण्यात आली आहे.   


राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार देशातील सर्वच वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (एचएमआयएस) बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांच्या आजराची सर्व माहिती एका क्लिकवर कॉम्पुटरवर मिळविणे सोपे होते. तसेच आरोग्यविषयक संशोधन पेपर लिहिण्यासाठी या सर्व माहितीचा वापर होतो. तसेच आरोग्याशी निगडित काही धोरणे बनविण्याकरिता या माहितीचा वापर होत असतो.

महापालिकेचे दवाखाने :
    मुंबई पालिकेमार्फत चार वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालये, एक दंत महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालय, १६ उपनगरीय रुग्णालये, ५ विशेष रुग्णालये, ३० प्रसूतिगृहे, १९२ दवाखाने सुरू आहेत. याखेरीज २०२ हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना देखील कार्यरत आहेत.

सध्याच्या घडीला पालिकेच्या काही नायर, कस्तुरबा, राजावाडी आणि कूपर रुग्णलयात आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली कार्यरत आहे. मात्र, पालिकेच्या सर्वच रुग्णलयात ही प्रणाली सुरु करण्याकरिता निविदा प्रक्रियेची जाहिरात देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व गोष्टीत पार पडल्या की, लवकरात लवकर ही प्रणाली रुग्णालयात सुरु करण्यात येणार आहे. - डॉ. नीलम अंड्राडे, संचालक, पालिका वैद्यकीय महाविद्यालय

निविदा प्रक्रियेची बोली :


पालिकेच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागातर्फे आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली संदर्भातील निविदा प्रक्रियेविषयी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.  १८ डिसेंबर रोजी या निविदा प्रक्रियेची बोली बंद करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पालिकेतील केवळ वैद्यकीय महाविद्यायाशी संलग्न रुग्णालयात नव्हे तर महापालिकेच्या अखत्यारीतील सर्व रुग्णालयात ही व्यवस्था सुरु करण्यात येणार आहे.

Web Title: Digital case paper now in municipal hospital in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.