Devendra Fadnavis vs Sanjay Raut Live Interview: बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारामुळे युती होणारचः मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 08:42 PM2018-04-10T20:42:58+5:302018-04-10T22:19:38+5:30

शिवसेना हा बाळासाहेबांच्या विचाराने चालणारा पक्ष. त्यामुळेच युती होईल असा विश्वास वाटतोः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis vs Sanjay Raut Live Interview: How can I be the Chief Minister of the 'Googly' of Sanjay Rauta? | Devendra Fadnavis vs Sanjay Raut Live Interview: बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारामुळे युती होणारचः मुख्यमंत्री

Devendra Fadnavis vs Sanjay Raut Live Interview: बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारामुळे युती होणारचः मुख्यमंत्री

googlenewsNext

मुंबईः महाराष्ट्रातील जनतेने कधीही न पाहिलेली एक जबरदस्त मुलाखत आज 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८'च्या मंचावर रंगतेय. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या मॅरेथॉन मुलाखतींचा दांडगा अनुभव असलेले, 'रोखठोक' लेखणीचे संपादक, शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि मुत्सद्दी, अभ्यासू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमनेसामने उभे ठाकलेत. राऊतांच्या बाउन्सर, यॉर्कर, गुगलीचा मुख्यमंत्री फडणवीस कसा सामना करतात, ते फ्रंटफूटवर खेळतात की बॅकफूटवर, त्यांच्या उत्तरांतून पुढच्या राजकारणाचे काही संकेत मिळतात का, जुन्या मित्रांमध्ये युतीची गाठ बांधली जाते का, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. या 'न भुतो' मुलाखतीचे Live Updates.... 

मुलाखतीला हलकीफुलकी सुरुवात... 

संजय राऊत यांनी तिरकस आणि हलक्याफुलक्या शैलीत मुलाखतीला सुरुवात केली. याठिकाणी लोक आपल्यासाठीच थांबलेत, असं राऊतांनी म्हणताक्षणीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'हा सामना फिक्स नाही', हे लोकांना सांगा, असे म्हणत पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. त्यावर प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर राऊतांनीदेखील या मुलाखतीच्यावेळी कोणतंही बॉल-टॅम्परिंग झालं नाही, असे सांगत आणखी एक बाऊन्सर टाकला.

संजय राऊतः देवेंद्रजी आपलं स्वागत. आपण एकदम रिलॅक्स राहा. आम्ही दोघेसुद्धा एकमेकांना ओळखून आहोत. थेट मुद्द्याला हात घालूया. तुमच्याकडून सगळ्यांना ब्रेकिंग न्यूज हवीय. संजय राऊत आपली मुलाखत घेणार असा प्रस्ताव आला तेव्हा पहिली रिअॅक्शन काय होती. 
देवेंद्र फडणवीसः विचार करून सांगतो असं म्हटलं. संजय राऊत घेताहेत हे कारण होतंच, पण त्याहीपेक्षा शरद पवार - राज ठाकरे पार्श्वभूमीवर होतेय मुलाखत म्हणून म्हटलं विचार करून सांगतो. नंतर म्हटलं करूया. मजा येईल. 

संजय राऊतः तुम्ही 'सामना' वाचत नाही मग तुम्हाला सामनातून टीका होती हे कसं कळतं?
देवेंद्र फडणवीसः मुंबईतलं नक्की माहिती नाही पण दिल्लीतले अनेक पत्रकार सामना वाचतात आणि मला प्रतिक्रिया विचारत राहतात. 'सामना'ची दखल घ्यावीच लागते कारण तुम्ही रोज ब्रेकिंग न्यूज देता.

संजय राऊतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काय निर्णय होतात हे कळत नाही, मग शिवसेनेत एखादी गोष्ट भविष्यात घडणार हा अंदाज कसा बांधू शकता?
देवेंद्र फडणवीसः राजकीय पक्ष आहे. राजकीय पक्ष काय करेल याचा अंदाज बांधता येतो. राजकीय अपरिहार्यता, राजकीय सोय, राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागतो आपल्याला. संघाला तसं काही बंधन नाही. 

संजय राऊतः भाजपा-शिवसेना युती होईल, असं तुम्ही कसं सांगू शकता?
देवेंद्र फडणवीसः मला जी परिस्थिती समोर दिसते ती पाहून मी सांगतो. शिवसेना हा बाळासाहेबांच्या विचाराने चालणारा पक्ष. ज्यावेळी या देशातील तथाकथित सेक्युलर एकत्र होतील, त्या-त्या वेळी या देशातील खरे सर्वधर्मसमभाव मानणारे हिंदुत्ववादी एकत्र येतात, हा इतिहास आहे.

संजय राऊतः महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ असे तुम्हाला कधी वाटले होते का?
देवेंद्र फडणवीसः राज्यमंत्री किंवा एखाद्या मंत्रीपद होईल, असे वाटले होते. मात्र, मुख्यमंत्री होईन, असं वाटलं नव्हतं. नगरसेवक होतो तेव्हा आमदार होईल असं वाटलं नव्हतं, आमदार झालो तेव्हा मंत्री होईन असा विचारही कधी केला नव्हता. 

संजय राऊतः फडणवीस सरकारचा रिमोट कंट्रोल कुणाकडे आहे?
देवेंद्र फडणवीसः बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांच्याकडे रिमोट कंट्रोल द्यायला आवडला असता. परंतु सध्या या सरकारचा रिमोट कंट्रोल कोणाकडेही नाही, दिल्लीतही नाही. भाजपामध्ये जे काही आहे ते थेट आहे. साडेतीन वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांनी एखादी गोष्ट करा किंवा करू नका, असा साधा फोनही केला नाही. केवळ केंद्राच्या उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचा आग्रह असतो. लोकांना आवडेल असं काम करा पण उगाच नसत्या घोषणा करू नका, हेच मोदी नेहमी सांगतात. 

संजय राऊतः २०१४ आधी ज्योतिषाला पत्रिका दाखवली होती का?
देवेंद्र फडणवीसः ज्योतिषाला पत्रिका कधीच दाखवू नका. प्रत्येक ज्योतिषी वेगळं सांगतो आणि दिशा भरकटते. आपणच आपले ज्योतिषी आहोत असं समजायचं आणि पुढे जायचं. 

मुलाखतीदरम्यान राऊत यांनी २०१४ मध्ये जागा वाटपावरून युती फिसकटल्याचा उल्लेख केला. तेव्हा आकड्यांची गणिते जमली नाहीत तर आता तुम्ही युती घडवून आणण्यासाठी असा नेमका काय चमत्कार करणार, असा प्रश्न संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, तुमच्या मनातील आकडे मला माहिती आहेत. तेव्हा राऊतांनी राज्यात 'मटकाबंदी' असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांना गुगली टाकली. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही,  हो मीच गृहमंत्री आहे, मीच मटक्यावर बंदी घातली, असे उत्तर देत मूळ प्रश्नाला बगल दिली.

संजय राऊतः या राज्याचं नेतृत्व करताय. अनेक दिग्गजांना ही संधी मिळत नाही. तुम्हाला तरुण वयात ही संधी मिळाली. या संधीचं सोनं करावं हे तुमचं स्वप्न. पण तुमच्या काळात शेतकरी संपावर गेले. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट. शेतकऱ्यांनी माल रस्त्यावर टाकला. हे कशाकरता आणि का होतंय?
देवेंद्र फडणवीसः परिवर्तन एका दिवसात घडू शकत नाही. महाराष्ट्रात सिंचन क्षमता केवळ १८ टक्के. ८२ टक्के कोरवाडू जमीन निसर्गावर. आम्ही सत्तेत आलो, तेव्हा २० हजार गावांमध्ये दुष्काळ, यंदा १८ हजार गावांमध्ये दुष्काळ. या मालिकेने आम्ही व्यथित झालो नाही. विकासदर नकारात्मक, पण ७५ टक्के पाऊस पडूनही उत्पादन विक्रमी. हे जलयुक्त शिवारमुळे शक्य. 'लोकमत'ने परवा कांदे उत्पादकांची मुलाखत छापली होती. यावर्षी जेवढा पैसा कमावला तेवढा कधीच कमावला नसल्याचं त्यात शेतकऱ्यांनी सांगितलं. 

संजय राऊतः आज विदर्भात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, कर्ज चुकवता न आल्याने, कर्जमाफीचा आकडा महाराष्ट्र सरकारकडे नाही...
देवेंद्र फडणवीसः  अलीकडच्या काळात तुम्ही दिल्लीला जास्त राहता, कर्जमाफी मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांची सर्व माहिती पटलावर ठेवली. त्यात जिल्हा, तालुका गाव आणि बँकनिहाय शेतकऱ्यांची माहिती आहे. विरोधी पक्षांनाही ती माहिती पेन ड्राइव्हद्वारे उपलब्ध आहे.

संजय राऊतः भीमा कोरेगाव प्रकरणानंतर लोक विचारत होते सरकार आणि मुख्यमंत्री कुठे आहेत?
देवेंद्र फडणवीसः भीमा कोरेगावची घटना चुकीचीच होती. मानवंदना देण्याचे कार्य शांतपणे सुरू होते. या घटनेच्या वेळी तिकडे ८ लाख लोक होते, तरी त्यापैकी एकही जण जखमी झाला नाही. केवळ एकाचा मृत्यू झाला तोदेखील वेगळ्या कारणामुळे. देशातील इतर राज्यांमध्ये हिंसक घटनेदरम्यान जितक्या लोकांचा बळी जातो तितकी जीवितहानी महाराष्ट्रात होत नाही. १२ वाजेपर्यंत दाखवत होते बंदचा फज्जा आणि त्यानंतर हिंसक घटना सुरू झाल्या. परंतु इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील हिंसाचारात बळींची संख्या तुलनेत कमी असते.

संजय राऊतः अहमदनगरमध्ये हत्याकांड घडले, तीन आमदारांवर गुन्हा दाखल झालाय, महाराष्ट्राला मुख्यमंत्री आहे, गृहमंत्री आहे का? 
देवेंद्र फडणवीसः राज्याचे गृहमंत्रिपद हे मुख्यमंत्र्यांकडेच असणे योग्य आहे, आर. आर, पाटील स्वत: चांगले गृहमंत्री होते. पण ते नेहमी आपली उद्विग्नता बोलवून दाखवत असत. फाइल मुख्यमंत्र्यांकडे अडल्याचे वारंवार सांगत. गेल्या सरकारपेक्षा गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले आहे.

संजय राऊतः राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा आहे. अनेक गुन्हेगार या पक्षातून त्या पक्षात पारडं बदलत असतात. भाजपा सत्तेत आल्यापासून अनेकांनी स्वतःचं शुद्धिकरण करून घेतलंय. तुम्हाला हे पटतं का?
देवेंद्र फडणवीसः भाजपामध्ये फार गुन्हेगार आले असं मला वाटत नाही. पण प्रत्येक पक्षाने आत्मपरीक्षण करणं गरजेचं. प्रत्येक पक्षात किती गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत. अशा लोकांना आपण घ्यायचं नाही असा निर्णय प्रत्येक पक्षाने केला पाहिजे. राजकारणाचं गुन्हेगारीकरण थांबवलं पाहिजे. जनतेने हाही विचार केला पाहिजे. मत देणारे कोण, कोणामुळे निवडून येतात. जनतेला आत्मनिग्रह करावा लागेल.  

संजय राऊतः २०१९चं चित्र काय सांगू शकता?
देवेंद्र फडणवीसः महाराष्ट्रातील हे सरकार असंच राहणार, कुठेही जात नाही. २०१९ मध्येही शंभर टक्के जनता आपल्यावरच विश्वास दाखवणार आहे. माध्यमांना काहीही वाटू द्या, टीकाकारांना टीका करू द्या, पण सामान्य माणसाला विश्वास आहे की, नरेंद्र मोदी ही व्यक्ती आपल्यासाठी काम करतेय. त्या जोरावर केंद्रातही आधीपेक्षा जास्त जागा घेऊन मोदींचं, रालोआचं सरकार येईल.

संजय राऊतः तुमच्या किंवा अमृता वहिनींच्या खात्यामध्ये १५ लाख जमा झाले का?

देवेंद्र फडणवीसः देशवासीयांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विदेशातील बँकांशी आपल्या देशाचा करार नव्हता. मात्र, आता भाजपाच्या काळात १०० पेक्षा अधिक टॅक्स हेवन असलेल्या बँकांशी करार झाला. त्यामुळे इथून पुढे कोणत्याही भारतीयाने पैसा दडवल्यास सरकारला थेट त्याची माहिती मिळू शकते.

संजय राऊतः महाराष्ट्राचे नेतृत्व करताय? दिल्लीत जायची इच्छा आहे का? 
देवेंद्र फडणवीसः तुम्हाला सांगितलंय, की मी मुख्यमंत्री होईन असे वाटले नव्हते, मुंडेसाहेब मुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची इच्छा होती. पण दुर्दैवाने मुंडे साहेबांचे निधन झाले, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष या नात्याने मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मला स्वीकारावी लागली. मात्र मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. पक्षाने सांगितलं तर दिल्लीला जाईन, तर राजीनामा द्यायला सांगितल्यास राजीनामा देऊन नागपूरला जाईल. 

संजय राऊतः तुम्ही सांगताय की २०१९ मध्ये युती होणार? पण नारायण राणे  म्हणालेत की युती झाली तर भाजपा सोडणार म्हणून
देवेंद्र फडणवीसः मी पेपर वाचलेला नाही. त्यामुळे राणे काय बोलले याची नेमकी माहिती नाही. तुम्ही सवतीसारखे वागला म्हणून आम्ही त्यांना जवळ केले, तुम्ही सवतीसारखे वागला नसता तर  आम्ही त्यांना जवळ केले नसते.

Web Title: Devendra Fadnavis vs Sanjay Raut Live Interview: How can I be the Chief Minister of the 'Googly' of Sanjay Rauta?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.