सावरकरांना ब्रिटिशांकडून पेन्शन कशासाठी मिळत होती, हे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट करावे, नाना पटोलेंचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 06:01 PM2022-10-08T18:01:22+5:302022-10-08T18:02:07+5:30

Nana Patole: राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान कर्नाकटमध्ये एका पत्रकार परिषदेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सावरकर यांच्याविषयी जे विधान केले त्यावर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आकांडतांडव करण्याची काही गरज नाही. राहुल गांधी खरे तेच बोलले त्यात चुकीचे काय आहे?

Devendra Fadnavis should explain why Savarkar was getting pension from the British, Nana Patole's challenge | सावरकरांना ब्रिटिशांकडून पेन्शन कशासाठी मिळत होती, हे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट करावे, नाना पटोलेंचं आव्हान

सावरकरांना ब्रिटिशांकडून पेन्शन कशासाठी मिळत होती, हे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट करावे, नाना पटोलेंचं आव्हान

googlenewsNext

मुंबई -  काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान कर्नाकटमध्ये एका पत्रकार परिषदेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सावरकर यांच्याविषयी जे विधान केले त्यावर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आकांडतांडव करण्याची काही गरज नाही. राहुल गांधी खरे तेच बोलले त्यात चुकीचे काय आहे? सावरकर व आरएसएसचे स्वातंत्र्य चळवळीत काडीचेही योगदान नाही. सावरकर यांना ब्रिटिशांकडून पेन्शन मिळत होती याचे अनेक दाखलेही आहेत. ही पेन्शन सावरकरांना कशासाठी मिळत होती हे फडणवीसांनी स्पष्ट करावे, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सर्व देश काँग्रेसच्या झेंड्याखाली जात, धर्म, प्रांत विसरून एक झाला होता. या लढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सावरकर यांचे काहीही योगदान नाही. उलट भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सावरकर व आरएसएसची भूमिका ब्रिटिशांना साथ देणारीच होती. ‘अंग्रेजो चले जाव, भारत छोडो’ चळवळीत सर्व देश एकवटला असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठे होता? ब्रिटिश सत्तेच्या विरोधात सशस्त्र लढा देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली असताना सावरकर यांनी मात्र ब्रिटिश सैन्यात तरुणांनी भरती व्हावे असे आवाहन करत होते. काळ्या पाण्याची शिक्षा ही एकट्या सावरकर यांनाच झाली नव्हती तर त्यांच्याबरोबर १४९ स्वातंत्र्यसैनिकांनाही झाली होती पण या शिक्षेतून सावरकर यांनाच ब्रिटिशांनी नंतर मुक्त केले, हा इतिहास आहे.

पंडित जवाहरलाल नेहरु यांनी सुद्धा ११ वर्षे तुरुंगवास भोगला, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्यासह लाखो स्वातंत्र्यसैनिकांनीही तुरुंगवास भोगला, लाठ्या काठ्या झेलल्या, हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी बलिदान दिले. भारताच्या फाळणीचे बीज सावरकरांनी मांडलेल्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतातच आहे हे ‘नव इतिहासकार’ फडणवीसांना माहित असेलच.  खोटी व अपुरी माहिती देऊन लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे, जनतेचा बुद्धीभेद करणे ही आरएसएस व भाजपची कार्यपद्धती आहे. अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये असताना सावकर बुलबुल पक्षावर बसून भारतभ्रमण करत होते असा बनावही कर्नाटकातील भाजपच्या शासनाने शालेय पुस्तकात केला, यातून खोटी माहिती पसरवण्याचे कामच भाजपाकडून केले जात आहे हे स्पष्ट होते.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेला केरळ, तामिळनाडू, कर्नाटकात जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने भाजपाने धास्ती घेतली आहे. त्यामुळे काहीतरी शोधून भारत जोडो यात्रा व राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याचे काम भाजपा करत आहे. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली यात्रा भारत जोडणारीच आहे, तोडण्याचे काम भाजपा व आरएसएसचे आहे म्हणूनच फडणवीसांच्या तोंडी ‘भारत जोडो की तोडो’ असे शब्द येणे आपसुकच आहे. फडणवीस यांना राहुलजी गांधी यांच्या वक्तव्याने मिरच्या झोंबण्याचे काही कारण नाही कारण राहुलजी सत्य तेच बोलले, असेही पटोले म्हणाले.

Web Title: Devendra Fadnavis should explain why Savarkar was getting pension from the British, Nana Patole's challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.