महानिर्मितीचे नवीकरणीय प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यासाठी विकासकांनी पुढे यावे - डॉ. पी. अन्बलगन

By सचिन लुंगसे | Published: March 6, 2024 07:19 PM2024-03-06T19:19:56+5:302024-03-06T19:20:07+5:30

प्रकल्प कामांना गती देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रकल्प व्यवस्थापन करण्यात येणार आहे.

Developers should come forward to complete the renewable projects of Mahanirti quickly says Dr. P. Anbalgan | महानिर्मितीचे नवीकरणीय प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यासाठी विकासकांनी पुढे यावे - डॉ. पी. अन्बलगन

महानिर्मितीचे नवीकरणीय प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यासाठी विकासकांनी पुढे यावे - डॉ. पी. अन्बलगन

मुंबई: महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने नवीकरणीय ऊर्जेची खरेदी २०२४-२५ करिता सौर १३.५० टक्के, इतर नवीकरणीय ११.५० टक्के म्हणजे एकूण २५ टक्के इतके बंधनकारक केली असल्याने आगामी दोन वर्षांच्या काळात नवीकरणीय वीज उत्पादन सुमारे ६,००० मेगावॅटने वाढविणे गरजेचे झाले आहे.  त्यामुळे  नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात प्रकल्प विकासकांना भरपूर संधी उपलब्ध होणार आहे.  विकासकांनी या संधीचे सोने करावे, आपली व्यावसायिक पत वाढवून या राष्ट्रीय कार्यात पुढे यावे असे आवाहन डॉ. पी. अन्बलगन यांनी केले.  महानिर्मितीच्या वतीने आयोजित देशपातळीवरील अनुभवी नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प विकासकांशी संवादात्मक बैठकीत हॉटेल ताज, मुंबई येथे ते बोलत होते.

महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अन् बलगन यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले तर मंचावर संचालक (प्रकल्प) अभय हरणे, संचालक (वित्त) बाळासाहेब थिटे, संचालक (संचलन) संजय मारुडकर, संचालक (खनिकर्म) डॉ. धनंजय सावळकर, कार्यकारी संचालक पंकज  नागदेवते, राजेश पाटील डॉ. नितीन वाघ, नितीन चांदुरकर तसेच मुख्य अभियंते राजेशकुमार ओसवाल, संजय कुऱ्हाडे, किशोर राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.

डॉ. पी. अन्बलगन म्हणाले की, प्रकल्प कामांना गती देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रकल्प व्यवस्थापन करण्यात येणार आहे.  यासाठी महानिर्मितीने मुख्यालय मुंबईसह नाशिक, पुणे आणि नागपूर येथे नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रीय कार्यालये सुरु केली आहेत.  कुशल, अनुभवी तज्ञ व्यक्तींची चमू या कामी सज्ज आहे.  विशेष म्हणजे महानिर्मितीच्या मालकीची “महाजेनको रिन्युएबल एनर्जी लिमिटेड” ही उप कंपनी स्थापित करण्यात आली आहे.  

प्रास्ताविकातून संचालक (प्रकल्प) अभय हरणे म्हणाले की, महानिर्मितीचे आगामी काळात जलदगतीने ८ हजार मेगावॅट प्रकल्प उभारणी व नियोजन असून त्यामध्ये ७ मेगावॅट क्षमता ते ३०० मेगावॅट स्थापित क्षमतेचे प्रकल्प समाविष्ट आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत १,०७१ मेगावॅट, आर.ई. बंडलिंग १,९५६ मेगावॅट, एन.टी.पी.सी. ग्रीन एनर्जी लिमिटेड समवेत संयुक्त कंपनी स्थापन करून २,५०० मेगावॅट, एस.जे.व्ही.एन. समवेत संयुक्त कंपनी स्थापन करून ५,००० मेगावॅट क्षमतेचे उदंचन जल विद्युत प्रकल्प, सौर प्रकल्प, तरंगता सौर प्रकल्प, राहुरी कृषी विद्यापीठासमवेत १०० मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प, महाऊर्जा समवेत १३५ मेगावॅट क्षमतेचा सौर व पवन ऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे.  त्यामुळे विकासकांनी निविदा अटी-शर्तीबाबत आपली भूमिका मांडावी, जेणेकरून परस्पर सहकार्यातून कालमर्यादेत हे प्रकल्प पूर्ण करणे शक्य होईल.

याप्रसंगी प्रकल्प विकासकांनी महानिर्मिती व्यवस्थापनाशी थेट संवाद साधताना प्रकल्प तपशील, निविदा पात्रता निकष, प्रकल्प कालावधी, आवश्यक परवानग्या, स्थानिक अडचणी, आर्थिक निकष, विकासक नोंदणी, तांत्रिक अटी व शर्ती, गुणवत्ता चाचणी, अनुभव, देखभाल-दुरुस्ती, संचलन-सुव्यवस्था इत्यादि विषयांवर आपली भूमिका मांडली व सकारात्मक चर्चा झाली.  तसेच महानिर्मितीच्या या पुढाकाराबाबत विकासकांनी महानिर्मितीच्या भूमिकेचे स्वागत केले.

प्रारंभी महानिर्मितीची सर्वसमावेशक अशी चित्रफित उपस्थितांना दाखविण्यात आली.  या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उप मुख्य अभियंता (सौर) अजय बगाडे यांनी, तर आभार प्रदर्शन मुख्य अभियंता (सौर) संजय कुऱ्हाडे यांनी केले. सदर बैठकीला महानिर्मितीचे वरिष्ठ अधिकारी व देशभरातर्गंत नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प विकासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Developers should come forward to complete the renewable projects of Mahanirti quickly says Dr. P. Anbalgan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई