सेतू केंद्रांसाठी सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 04:50 AM2019-06-19T04:50:41+5:302019-06-19T04:50:53+5:30

३०० पैकी एकही केंद्र सरकारी महाविद्यालयांत नाही; विद्यार्थ्यांसाठी सीईटी सेलची वॉररूम तयार

Depression in Government Educational Institutions for Setu Centers | सेतू केंद्रांसाठी सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये उदासीनता

सेतू केंद्रांसाठी सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये उदासीनता

Next

- सीमा महांगडे 

मुंबई : राज्यात विविध अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रिया नोंदणीला सुरुवात झाली असून सीईटी सेलने यासाठी सेतू असिस्टंट अ‍ॅडमिशन रजिस्टर म्हणजेच सार पोर्टलची निर्मिती केली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तालुकास्तरावर सेतू केंद्रांची सुविधा उपलब्ध असून प्रवेशाच्या नोंदणीपासून कागदपत्रे पडताळणीपर्यंतच्या सर्व सुविधा आणि मार्गदर्शन येथे विद्यार्थ्यांना मिळेल. मात्र महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत उभारण्यात आलेल्या ३७३ सेतू केंद्रांपैकी एकही केंद्र शासकीय महाविद्यालयात नाही. सीईटी सेलची सर्व सेतू केंद्रे खासगी महाविद्यालयांत उभारण्यात आली असून त्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

७ जूनपासून सार पोर्टलवर राज्यातील सेतू केंद्र आणि सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. जशा परवानग्या मिळत आहेत तशी केंद्रांची संख्या वाढत आहे. मात्र राज्यात शासकीय महाविद्यालये असताना खासगी महाविद्यालयांवर सेतू केंद्रांची मेहरबानी का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ४ मे २०१९ पासून सेतू केंद्रांसाठी राज्यातील महाविद्यालयांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी राज्यातील शासकीय अनुदानित, शासकीय स्वयंअर्थसाहाय्यित, अभिमत, खासगी अशा तब्बल ७५१ महाविद्यालयांना सूचनाही पाठविण्यात आल्या. मात्र राज्यातील कोणत्याही शासकीय अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालयांकडून /संस्थांकडून सेतू केंद्रांसाठी अर्ज आले नाहीत किंवा त्यांच्याकडून यासंबंधी विचारणा झाली नसल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त आनंद रायते यांनी दिली. त्यामुळे अखेर ज्या खासगी संस्थांकडून सेतू केंद्रांसाठी होकार मिळाला त्या संस्थांकडून हमीपत्र घेऊन त्यांची सेतू सुविधा केंद्र म्हणून निवड केल्याची माहिती त्यांनी दिली.

सेतू केंद्र म्हणून निवड केलेल्या तब्बल ३०० संस्थांना त्यासाठी १५,१६ मे रोजी प्रशिक्षणही दिल्याचे रायते यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शासकीय संस्था आणि महाविद्यालयांच्या अनिच्छेमुळे सेतू सुविधा केंद्रांसाठीच्या यादीत एकही शासकीय महाविद्यालय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शनिवार, १५ जून रोजी झालेल्या प्रवेश प्राधिकरणाच्या बैठकीत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या तोंडावर अपुऱ्या पडणाºया सुविधांमुळे विद्यार्थ्यांचे हाल होऊ नयेत म्हणून अखेर सीईटी सेलकडून हेल्पलाइन क्रमांक आणि अभ्यासक्रमाच्या तक्रार निवारणासाठी कॉल सेंटर सुरू करण्याची परवानगी घेण्यात आली. सोमवार, १७ जूनपासून विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधी तक्रार निवारणासाठी सुरू करण्यात आलेले कॉल सेंटर आणि हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करण्यात आल्याची महिती आयुक्त आनंद रायते यांनी दिली.

अभ्यासक्रमनिहाय हेल्पलाइन
फोर्ट येथील सीईटी सेलच्या कार्यालयात वॉररूमच तयार करण्यात आली असून त्या वॉररूममध्ये मार्गदर्शक तज्ज्ञांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुकास्तरावर एखाद्या विद्यार्थ्याचे समुपदेशन झाले नाही तर तो विद्यार्थी थेट मेल किंवा हेल्पलाइनच्या माध्यमातून फोर्ट कार्यालयातील मार्गदर्शक तज्ज्ञांशीही बोलू शकतो. विद्यार्थ्यांच्या मनात असणाºया शंका तसेच असंख्य प्रश्नांची उकल या माध्यमातून होणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक - ९८९२८९२२६७ / ८६५७६२३९७७

Web Title: Depression in Government Educational Institutions for Setu Centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.