राज्यभरात डेंग्यूचे रुग्ण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 05:35 AM2019-07-19T05:35:40+5:302019-07-19T05:35:46+5:30

राज्यात अजून पुरेसा पाऊस झाला नसला तरी पावसाळ्यातील डेंग्यू, मलेरिया या साथीच्या आजारांंनी तोंड वर काढले आहे.

Dengue cases increase across the state | राज्यभरात डेंग्यूचे रुग्ण वाढले

राज्यभरात डेंग्यूचे रुग्ण वाढले

googlenewsNext

मुंबई : राज्यात अजून पुरेसा पाऊस झाला नसला तरी पावसाळ्यातील डेंग्यू, मलेरिया या साथीच्या आजारांंनी तोंड वर काढले आहे. गुरुवारी हिंगोली जिल्ह्यात डेंग्यूसदृश्य आजाराने एकाचा बळी घेतला. एकट्या पुणे शहर आणि उपनगरांत जुलैमध्ये ११८ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले. कोल्हापूर जिल्ह्यात तर ११५ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. पुण्यात हडपसर, मुंढवा, घोले रस्ता आणि भवानी पेठ भागांत डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. मुंबई आणि उपनगरांमध्येही अशीच स्थिती आहे.
१८८ संशयितांपैकी १९ जणांना लागण झाली आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये १००० जणांना नोटिसा पाठविण्यात आल्या असून, ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जूनमध्ये १६८ संशयित रुग्णांपैकी ३२ जणांना लागण झाली होती. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे स्वच्छता राखण्याबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत असल्याचे सहाय्यक आरोग्य प्रमुख
डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.
स्वच्छतेच्या बाबतीत पारितोषिके पटकावणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात सहा महिन्यांत ३२६ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. ग्रामीण भागामध्ये रुग्णसंख्या अधिक आहे. जिल्ह्यात मेमध्ये १५४, जूनमध्ये ५७ आणि जुलैमध्ये ११५ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. ३२६ पैकी २३० रुग्ण ग्रामीण भागातील असून ९६ रुग्ण नागरी भागातील आहेत. कोल्हापूर शहराशेजारी गेल्या पंधरवड्यात आलेल्या साथीमध्ये १५ हून अधिक जणांना डेंग्यूची लागण झाली आहे.
सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रासह इस्लामपूर, शिराळा, आष्टा, तासगाव, विटा या शहरांमध्ये डेंग्यूचे सुमारे दीडशेवर संशयित रुग्ण आहेत. सातारा जिल्ह्यात कºहाडजवळील आगाशिवनगरमध्ये गेल्या आठवड्यात पाचजणांना डेंग्यूसदृश्य साथीची लागण झाली होती.
नाशिकमध्ये जानेवारीपासून आत्तापर्यंत १९ रुग्ण आढळले. जुलैमध्ये सातच रुग्णं आढळले असले तरी डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण सुरू झाल्याने प्रशासनाने काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. घरी भेटी देऊन डासांची उपत्ती स्थाने आढळलेल्या ३८२ जणांना नोटिसा बजावल्या आहेत.
मराठवाड्यात रुग्णांची संख्या तुलनेने कमी आहे. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात जुलैमध्ये ७ जणांना लागण झाली आहे. २ रुग्ण ग्रामीण भागातील, तर ५ शहरातील आहेत.
तुलनेने विदर्भातील स्थिती बरी असली तरी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागपुरात शहरात गेल्या पंधरवड्यात डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळले होते. वºहाडात अकोला जिल्ह्यात डेंग्यूचे ७, तर मलेरियाचे ५ रुग्ण आढळले आहेत.
>हिंगोलीतील तरुण दगावला
हिंगोली जिल्ह्यातील मन्नास पिंपरी (ता. सेनगाव) येथील राहुल मनोहर मोरे (२९) याचा मुंबईमध्ये डेंग्यूने मृत्यू झाला. राहुल हा मुंबईमध्येच खाजगी गाडीवर चालक म्हणून काम करीत होता. तेथेच गेल्या १५ दिवसांपासून त्याला ताप आला. डेंग्यूचे निदान झाल्यावर मुंबईतीलच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पार्थिवावर गुरुवारी मन्नास पिंपरी या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Dengue cases increase across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.