बाजारपेठांमध्ये दिवाळी खरेदीची झुंबड, सेलमुळे आॅनलाइन वस्तूंनाही जोरदार मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 07:04 AM2018-11-05T07:04:17+5:302018-11-05T07:04:30+5:30

बाजारपेठांत रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी, मॉल्समध्ये ग्राहकांची झुंबड... दुकानांमध्येही खरेदीसाठी रांगा हे चित्र आहे, धनत्रयोदशीपासून सुरू होणाऱ्या दिव्यांच्या तेजोमय दीपोत्सवासाठी लोकांमध्ये असलेल्या उत्साहाच्या वातावरणाचे.

 Demand for Diwali shopping, Sail sales in the market due to strong demand | बाजारपेठांमध्ये दिवाळी खरेदीची झुंबड, सेलमुळे आॅनलाइन वस्तूंनाही जोरदार मागणी

बाजारपेठांमध्ये दिवाळी खरेदीची झुंबड, सेलमुळे आॅनलाइन वस्तूंनाही जोरदार मागणी

Next

मुंबई : बाजारपेठांत रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी, मॉल्समध्ये ग्राहकांची झुंबड... दुकानांमध्येही खरेदीसाठी रांगा हे चित्र आहे, धनत्रयोदशीपासून सुरू होणाऱ्या दिव्यांच्या तेजोमय दीपोत्सवासाठी लोकांमध्ये असलेल्या उत्साहाच्या वातावरणाचे. रविवारी सुट्टीच्या दिवशी आकाश कंदिलांपासून रांगोळ्या, कपडे, फटाके, फराळ, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांच्या खरेदीसाठी देशभरातील बाजारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आॅनलाइन बाजारही जोमात सुरू झाला आहे. पारंपरिक सोने बाजारही मोठ्या झळाळीसाठी सज्ज झाला आहे.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खरेदीवर विविध योजनाही जाहीर केल्या आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदीचा उत्साह अधिक असल्याने विविध इलेक्ट्रॉनिक, मोबाइल, फर्निचर, गृहपयोगी वस्तूंची बाजारपेठ गजबजली आहे. रंगबिरंगी कपडे, नवीन पद्धतीच्या पणत्या, एकापेक्षा एक रंगसंगती आणि आकारांचे आकाश कंदील, आवाजाचे आणि बिन आवाजाचे फटाके, तयार फराळाला असलेली वाढती मागणी याकडे ग्राहकांचा अधिक कल दिसून येत आहे.
आॅनलाइन पोर्टल्सवर मोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसह सर्वच वस्तुंवर ३० ते ५० टक्के सलवत आहे. रोज दुपारी ‘फ्लॅश सेल’मध्ये वस्तू अर्ध्यापेक्षा कमी दरात विक्री होत आहेत. हा ‘फ्लॅश सेल’ ५ मिनिटात संपतो. त्यावरुनच आॅनलाइन बाजारातील ग्राहकांच्या प्रतिसादाचा अंदाज येतो. व्हॅलेटद्वारे पेमेंट केल्यास तात्काळ कॅशबॅक, विशिष्ट कार्डाने पेमेंट केल्यास १० टक्के सवलत, अमूक एखादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी केल्यास त्यावर अन्य वस्तू मोफत यांचा त्यात समावेश आहे. दिवाळीच्यानिमित्ताने वाहनांची खरेदी समाधानकारक सुरू आहे.

सोन्याला येणार झळाळी

भारतात वर्षभरात सोने बाजारात सरासरी ४ लाख ५० हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. २५ टक्के विक्री दिवाळीदरम्यान
होते. सोन्याचे दर सध्या हळूहळू वधारत असल्याने सोन्याबाबत ग्राहकांमध्ये एरवी असलेली साशंकता यंदा नाही. त्यामुळे दिवाळी ते डिसेंबर या काळात तूट भरुन निघेल, असा विश्वास आॅल इंडिया जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी कौन्सिलचे अध्यक्ष नितीन खंडेलवाल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
 

Web Title:  Demand for Diwali shopping, Sail sales in the market due to strong demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी