अपघातातील चार महिन्यांच्या बाळापाठोपाठ आईचाही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 03:09 AM2018-11-24T03:09:27+5:302018-11-24T03:09:51+5:30

ईदनिमित्त भायखळा येथे आयोजित केलेला उरूस पाहण्यासाठी निघालेल्या शेख कुटुंबीयांच्या दुचाकी अपघातात चार महिन्यांचे बाळ जागीच ठार झाले. त्यापाठोपाठ शुक्रवारी पहाटे त्याच्या आईनेही अखेरचा श्वास घेतला.

 Death of a mother after four months of an accident | अपघातातील चार महिन्यांच्या बाळापाठोपाठ आईचाही मृत्यू

अपघातातील चार महिन्यांच्या बाळापाठोपाठ आईचाही मृत्यू

मुंबई : ईदनिमित्त भायखळा येथे आयोजित केलेला उरूस पाहण्यासाठी निघालेल्या शेख कुटुंबीयांच्या दुचाकी अपघातात चार महिन्यांचे बाळ जागीच ठार झाले. त्यापाठोपाठ शुक्रवारी पहाटे त्याच्या आईनेही अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे कुर्ल्यातील शेख कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
कुर्ला परिसरातील प्रीमिअर रेसेडेन्सी वसाहतीत मोहमद गौस शेख हे पत्नी सबा, ७ वर्षीय मुलगी मायशा आणि ४ महिन्यांच्या सादसोबत राहतात. बुधवारी रात्री ते ईदनिमित्त पत्नी आणि मुलांना दुचाकीवरून भायखळा येथील उरूस पाहण्यासाठी निघाले होते. याचदरम्यान दादरच्या चित्रा सिनेमागृहाजवळ टँकरच्या धडकेत त्यांचा अपघात झाला. अपघातात साद जागीच ठार झाला. तर शेख यांची पत्नी गंभीर जखमी झाली. त्यांनी स्वत:ला सावरत तिघांना केईएम रुग्णालयात दाखल केले. तेथे चिमुरड्याला दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. सबा यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. शुक्रवारी त्यांनीही अखेरचा श्वास घेतला.
मुलाच्या धक्क्यातून सावरत नाही तोच पत्नीच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. दोघांचेही मृतदेह शेख यांच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र जाधव यांनी दिली.
दरम्यान, या प्रकरणी टँकर चालक संतोष कौल याला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे.

आणखी ४ दुचाकींचा अपघात
शेख कुटुंबीयांचा जेथे अपघात झाला त्या ठिकाणी आणखी चार दुचाकींचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील जखमी केईएम रुग्णालयात उपचारांसाठी आले होते.

पेव्हरब्लॉकचा ओबडधोबड रस्ता कारणीभूत?
पेव्हरब्लॉक खाली-वर झाल्याने ओबडधोबड बनलेला रस्ता, एका ठिकाणी पेव्हरब्लॉक उचकटल्याने निर्माण झालेला खड्डा यामुळेच अपघात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

बाळाच्या काळजीपोटी तिने दिला होता नकार
लहान बाळाला सोबत घेऊन जाण्यासाठी सबा यांनी शेखला नकार दिला होता. मात्र सर्व एकत्र फिरून येऊ, असे सांगत शेख यांनी हट्ट केला. त्यामुळे त्या नाराज होऊनच त्यांच्यासोबत बाहेर निघाल्या.
पुढे अपघातात पत्नीसह मुलाला गमावण्याची वेळ शेख यांच्यावर आली. त्यामुळे त्यांना मानसिक धक्का बसला आहे.

Web Title:  Death of a mother after four months of an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात