The date of 'TET' changed | ‘टीईटी’ची तारीख बदलली
‘टीईटी’ची तारीख बदलली

मुंबई : राज्यस्तरीय शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडून प्राध्यापकांसाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी-नेट) एकाच दिवशी आल्याने, आता ‘टीईटी’च्या तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे. परीक्षार्थींचे नुकसान होऊ नये, यासाठी टीईटी ८ जुलैऐवजी १५ जुलै रोजी घेण्यात येणार असल्याचे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे जाहीर करण्यात आले आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षक होण्यासाठी टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे, प्राध्यापक होण्यासाठी किंवा कनिष्ठ संशोधक म्हणून काम करण्यासाठी नेटमध्ये पात्र होणे आवश्यक असते. यंदा या दोन्ही परीक्षा ८ जुलै रोजी येत होत्या. दरवर्षी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आणि शिक्षणशास्त्रातील पदवी किंवा पदविका घेतलेले हजारो उमेदवार या दोन्ही परीक्षा देतात. मात्र, यंदा या परीक्षा एकाच दिवशी होत असल्यामुळे, उमेदवारांना दोन्हीपैकी एका संधीवर पाणी सोडावे लागणार आहे.
या पार्श्वभूमीवर टीईटीची तारीख बदलण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात आली होती. त्यानुसार, परीक्षेची तारीख बदलण्याचा निर्णय घेतल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केले. त्यानुसार, ‘टीईटी’ आता १५ जुलै रोजी होईल.
>ंअद्याप संकेतस्थळावर अपडेट नाही
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टीईटीची तारीख बदलली असली आणि त्याबाबतचे परिपत्रक जारी केले असले, तरी टीईटीचे संकेतस्थळ मात्र अद्याप अद्ययावत करण्यात आलेले नाही. अनेक पात्र आणि इच्छुक परीक्षार्थी परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी किंवा सूचनांसाठी सतत संकेतस्थळाचा आधार घेतात. मात्र, परिषदेने संकेतस्थळ अद्ययावत न केल्याने परीक्षार्थींची गैरसोय होत आहे.


Web Title:  The date of 'TET' changed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.