क्राईम डायरी - खंडणीसाठी गँगस्टरची ट्रिंग ट्रिंग थांबली

By मनीषा म्हात्रे | Published: April 8, 2024 09:55 AM2024-04-08T09:55:32+5:302024-04-08T09:56:07+5:30

गेल्या आठवड्यात चीनमधून हद्दपार करण्यात आलेल्या प्रसाद पुजारीच्या अटकेमुळे खंडणीखोरांच्या टोळीला ब्रेक लागताना दिसत आहे.

Crime Diaries - Gangster's Tring Tring stopped for ransom | क्राईम डायरी - खंडणीसाठी गँगस्टरची ट्रिंग ट्रिंग थांबली

क्राईम डायरी - खंडणीसाठी गँगस्टरची ट्रिंग ट्रिंग थांबली

मुंबईतील हॉटेल व्यावसायिक, सेलिब्रिटी आणि बिल्डरांमध्ये खंडणीसाठी दहशत निर्माण करणारे गँगस्टर छोटा राजन, कुमार पिल्लई, एजाज लकडावाला, रवी पुजारी, सुरेश पुजारीपाठोपाठ प्रसाद पुजारीच्या अटकेने गुन्हे शाखेने या टोळ्यांचे कंबरडे मोडले आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमच्या डी गँगसह गुन्हे शाखेने गजाआड केलेले गँगस्टर विदेशात बसून त्यांच्या हस्तकांमार्फत बड्या व्यक्तींना धमकावत होते; पण म्होरकेच पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने खंडणीविरोधी पथकाकडे दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा आलेखही रोडावला आहे.

गेल्या आठवड्यात चीनमधून हद्दपार करण्यात आलेल्या प्रसाद पुजारीच्या अटकेमुळे खंडणीखोरांच्या टोळीला ब्रेक लागताना दिसत आहे. २२ मार्च रोजी पुजारीला चीनमधून भारतात पाठवण्यात आले.  खंडणीविरोधी सेल अनेक वर्षांपासून त्याचा पाठलाग करत होते. त्याने एका चिनी महिलेशी लग्न केले आणि तो तिच्यासोबत राहत होता. त्याला तीन मुले आहेत. तो २० वर्षे चीनमध्ये राहिला होता. त्यापूर्वी महाराष्ट्र एटीएस आणि खंडणीविरोधी सेलच्या प्रयत्नांमुळे सुरेश पुजारीला २०२१ मध्ये फिलिपिन्समधून अटक करून प्रत्यार्पण करण्यात यश आले होते. रवी पुजारीचे फेब्रुवारी २०२० मध्ये सेनेगलमधून प्रत्यार्पण करण्यात आले. एजाज लकडावाला याला जानेवारी २०१९ मध्ये नेपाळ सीमेवर खंडणीविरोधी सेलने पकडले होते, तर छोटा राजनला ऑक्टोबर २०१५ मध्ये पकडण्यात आले आणि बाली, इंडोनेशिया येथून भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आले. ही महत्त्वाची अटक होती. राजनवर हत्या, खंडणी, अमली पदार्थांची तस्करी आणि शस्त्रास्त्रांची तस्करी यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. भारतात हद्दपार झाल्यावर त्याची सर्व प्रकरणे केंद्रीय अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आली.

गुन्हे शाखेच्या आकडेवारीनुसार, २०१५ मध्ये खंडणीच्या ९४ गुन्ह्यांची नोंद झाली. मात्र, २०२३ आणि २४ मध्ये हे प्रमाण प्रत्येकी एकवर आले.  गँगस्टर छोटा राजन, एजाज लकडावाला, कुमार पिल्लई आणि रवी, सुरेश आणि प्रसाद पुजारीकडून गँगस्टर बड्या व्यक्तींना टार्गेट केले जात होते. त्यांचे हस्तक मुंबईत कार्यरत होते. त्यांना मोक्का लावून स्थानिक टोळ्यांची धरपकड सुरू झाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, खंडणीविरोधी सेलला गेल्या दहा वर्षांत सध्या कारागृहात असलेल्या गँगस्टर संबंधित ५०० कॉल आले.  परदेशात आश्रय घेणाऱ्या या गुंडांना जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश येत आहे. 
गेल्या दशकात खंडणीच्या घटनांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक घट झाल्याचे गुन्हे शाखेचे म्हणणे आहे. डी गँगने त्यांच्या कार्यपद्धती तस्करीत बदलल्या. गेल्या दशकात शकील आणि दाऊदने थेट धमक्या दिल्याच्या कॉलपेक्षा त्यांच्या नावाचा वापर करून खंडणी उकळल्याचेही समोर आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Crime Diaries - Gangster's Tring Tring stopped for ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.