हिंदू राष्ट्रासाठी दहशतवादी घडविण्याचा रचला कट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 06:29 AM2018-12-06T06:29:00+5:302018-12-06T06:33:19+5:30

सनातन संस्थेच्या ‘क्षात्रधर्म साधना’ या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, हिंदू राष्ट्रनिर्मितीसाठी दहशतवादी घडविण्याचा कट रचण्यात आला होता

The conspiracy to set up terror for the Hindu Nation | हिंदू राष्ट्रासाठी दहशतवादी घडविण्याचा रचला कट

हिंदू राष्ट्रासाठी दहशतवादी घडविण्याचा रचला कट

Next

मुंबई : सनातन संस्थेच्या ‘क्षात्रधर्म साधना’ या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, हिंदू राष्ट्रनिर्मितीसाठी दहशतवादी घडविण्याचा कट रचण्यात आला होता आणि त्यासाठीच शस्त्रसाठा करणे, बॉम्ब तयार करणे आणि ते वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याचा खळबळजनक दावा, दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा शस्त्रसाठाप्रकरणी दाखल केलेल्या दोषारोपपत्रात केला आहे.
एटीएसने विशेष न्यायालयात बुधवारी याबाबतचे ६,८०० हून अधिक पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. त्यात १८६ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.
नालासोपाऱ्यातील एका घरात अवैध पद्धतीने शस्त्रांचा साठा बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेल्या वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांच्यावर एटीएसने आर्म्स अ‍ॅक्टनुसार बेकायदा कृत्ये (प्रतिबंध) कायद्यानुसार (यूएपीए) हे दोषारोपपत्र दाखल केले आहे.
नालासोपारा येथे १० आॅगस्टला एटीएसने छापे टाकले होते. यात मोठ्या प्रमाणावर दडविलेला शस्त्रसाठा एटीएसच्या हाती लागला. या प्रकरणी पोलिसांनी सनातन संस्थेचा वैभव राऊत, शिव प्रतिष्ठानचा सुधन्वा गोंधळेकर आणि नालासोपाºयाचा रहिवासी शरद कळसकर यांना आॅगस्टमध्ये अटक केली होती. एटीएसने या सर्वांविरुद्ध स्फोटक पदार्थांचा कायदा, स्फोटकांचा कायदा, बेकायदा कृत्ये (प्रतिबंध) कायदा, आर्म्स अ‍ॅक्टसह महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत दोषारोपपत्र दाखल केले.
या दोषारोपपत्रानुसार नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था आणि अन्य तत्सम संघटनांचे सदस्य आहेत. त्यांनी सनातन संस्थेच्या ‘क्षात्रधर्म साधना’ या पुस्तकात नमूद करण्यात आल्यानुसार, हिंदू राष्ट्रनिर्मितीच्या उद्देशाने प्रेरित होऊन आपसात संगनमत केले. समविचारी युवकांची दहशतवादी टोळी निर्माण केली. ही दहशतवादी टोळी भारताची एकता, अखंडता, सुरक्षा व सार्वभौमत्व यांना धोका पोहोचविण्याच्या उद्देशानेच निर्माण करण्यात आली होती. ही दहशतवाद्यांची टोळी हिंदू धर्म, प्रथा, रूढी यांच्याविरोधात विडंबन, वक्तव्य, लिखाण करणाºया व्यक्तींना व कार्यक्रमांना लक्ष्य करून, लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे काम करत आहे. याचेच उदाहरण म्हणजे, डिसेंबर, २०१७ मध्ये पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘सनबर्न’ या पाश्चिमात्य संगीताच्या कार्यक्रमाला लक्ष्य करण्यात आले. त्यासाठी गावठी बॉम्ब, पेट्रोल बॉम्ब, अग्निशस्त्रे, दगडफेकीद्वारे घातपाती कारवाया करून, जनतेत दहशत निर्माण करण्याचा कट आरोपींचा होता. त्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणाची पाहणी (रेकी) करण्यात आली होती. मात्र, एक आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये आल्याच्या संशयावरून, आरोपींनी सर्व तयारी असूनही घातपाताची योजना रद्द केली, असे तपासात निष्पन्न झाल्याचे एटीएसने दोषारोपत्रात म्हटले आहे.
त्याशिवाय, आरोपींना ज्या ठिकाणी शस्त्र चालविणे आणि स्फोटके बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले, ती ठिकाणे तपासात उघडकीस आली आहेत. कटकारस्थानाची माहिती नोंदवून ठेवलेल्या आरोपींच्या सर्व डायºया हस्तगत केल्या असून, त्यातील सांकेतिक शब्दांची उकल केल्याचे एटीएसने म्हटले आहे.
आरोपींचे मोबाइल बंद करून, दुसºयांच्या नावावरील सिमकार्डे अन्य मोबाइलमध्ये टाकून, त्याचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे संदर्भ देण्यात आले आहेत.
>जप्त केलेला शस्त्रसाठा
शरद कळसकर याच्या घराच्या झडतीत पोलिसांना बॉम्ब बनविण्याच्या कृती लिहिलेल्या दोन चिठ्ठ्या सापडल्या, तर वैभव राऊतच्या घर आणि गाळ्याच्या झडतीत २० जिवंत गावठी बॉम्ब, दोन जिलेटीन कांड्या, चार डिटोनेटर्स, २२ नॉन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्स, सेफ्टी फ्यूज वायर, तीन पीसीबी सर्किट, सहा बॅटरी कनेक्टर, सहा ट्रान्झिस्टर्स, चार रिले स्विच, मल्टिमीटर, सोल्डरिंग मशिन व साहित्य, पॉइझन असे लिहिलेल्या दोन बाटल्या आणि वेगवेगळ्या स्फोटकांची पावडर सापडली.

Web Title: The conspiracy to set up terror for the Hindu Nation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.