संगणक टंकलेखनाचा अभ्यासक्रम धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 06:21 AM2018-05-16T06:21:35+5:302018-05-16T06:21:35+5:30

पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सुरू केलेल्या गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्यूटर टायपिंग बेसिक कोर्स (जीसीसी-टीबीसी) हा अभ्यासक्रम आता धोक्यात आला आहे.

Computer typing risk threat | संगणक टंकलेखनाचा अभ्यासक्रम धोक्यात

संगणक टंकलेखनाचा अभ्यासक्रम धोक्यात

मुंबई : पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सुरू केलेल्या गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्यूटर टायपिंग बेसिक कोर्स (जीसीसी-टीबीसी) हा अभ्यासक्रम आता धोक्यात आला आहे. शासनाच्या संगणक अर्हता आदेशात या अभ्यासक्रमाचा समावेश नसल्याने संगणक टंकलेखन संस्था बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे संस्थाचालक व कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र राज्य टंकलेखन-लघुलेखन, संगणक टायपिंग शासनमान्य संस्थांच्या संघटनेने मंगळवारी आझाद मैदानात उपोषण केले.
संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे म्हणाले की, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते संगणकीय टायपिंग अभ्यासक्रम सुरू केलेल्या संस्थांना परिषद संलग्नतेचे ई-प्रमाणपत्र ९ आॅगस्ट २०१५ रोजी देण्यात आले. त्या वेळी तावडे यांनी संगणक टंकलेखन अभ्यासक्रमाचा शासनाच्या संगणक अर्हता परीक्षेत समावेश करण्यासाठी समिती गठीत करत शासन अर्हतेमध्ये समावेश करण्याचे आश्वासन दिले. मात्र ते पूर्ण केलेले नाही.
>प्रस्ताव सादर करणार-उपसचिव
आंदोलनाची दखल घेत शासनाच्या सामान्य प्रशासन आयटी विभागाने शिष्टमंडळाशी चर्चा केली. विभागाचे उपसचिव यांनी २१ आॅक्टोबर २०१३ रोजीच्या शासन आदेशासोबत मंजूर केलेला अभ्यासक्रम तपासून संगणक टंकलेखन अभ्यासक्रमाच्या प्रस्तावाची पडताळणी करण्याचे आश्वासन दिले, तसेच इतर अभ्यासक्रमाचा आढावा घेऊन, त्यात समानता आढळल्यास संगणक अर्हता देणेबाबतचा प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचेही मान्य केले.

Web Title: Computer typing risk threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.