कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्ग, नया नगर ते दादरपर्यंतचे भुयारीकरण पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 01:56 PM2019-01-31T13:56:54+5:302019-01-31T13:57:04+5:30

माहीम येथील नयानगर लॉचिंग शाफ्टमधून भुयारीकरणास प्रारंभ करणाऱ्या कृष्णा १ आणि कृष्णा २ या टनेल बोअरिंग मशिनने (टीबीएम) दादरपर्यंतचे भुयारीकरण यशस्वीरीत्या पूर्ण केले.

Completion of the Colaba-Bandra-Seepz Metro 3 route, new city to Dadar | कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्ग, नया नगर ते दादरपर्यंतचे भुयारीकरण पूर्ण

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्ग, नया नगर ते दादरपर्यंतचे भुयारीकरण पूर्ण

Next

मुंबई :- माहीम येथील नयानगर लॉचिंग शाफ्टमधून भुयारीकरणास प्रारंभ करणाऱ्या कृष्णा १ आणि कृष्णा २ या टनेल बोअरिंग मशिनने (टीबीएम) दादरपर्यंतचे भुयारीकरण यशस्वीरीत्या पूर्ण केले. एकाच दिवशी जुळ्या बोगद्यातून दोन्हीही टीबीएम्स बाहेर पडणे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे (मुं.मे.रे.कॉ) कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गिकेचे काम जलदगतीने करण्यात येत आहे. यापूर्वी  सीप्झ व आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन ठिकाणी भुयारीकरण (ब्रेक थ्रू) पूर्ण करण्यात आले आहे. आज दादर येथील शिवसेनाभवनपर्यंतचा महत्त्वाचा टप्पा गाठण्यात यश मिळाले आहे. 

कृष्णा १ आणि २ या दोन टनेल बोअरिंग मशिन नयानगर लाँचिंग शाफ्ट माहीम येथून अनुक्रमे २१ सप्टेंबर २०१७ आणि १८ ऑक्टोबर २०१७ रोजी भूगर्भात उतरविण्यात आल्या होत्या. नयानगर माहीमपासून ते दादर मेट्रो स्थानकापर्यंत अप मार्गावर २४९० मीटर भुयारीकरण करण्यासाठी कृष्णा - १ या टीबीएमसाठी १७७९ इतक्या आरसीसी सिमेंट रिंग्सचा वापर करण्यात आला. कृष्णा २ या डाऊन मार्गावरील टीबीएमसाठी २४७२ मीटर भुयारीकरणासाठी १७६६ इतक्या आरसीसी रिंग्सचा वापर करण्यात आला. कृष्णा १ व २ द्वारे सरासरी दररोज १० ते १२ मीटर भुयारीकरण करण्यात आले आहे.

या संपूर्ण भुयारीकरणात अभियांत्रिकी तज्ज्ञ आणि कामगार यांच्या १०० जणांच्या दोन तुकडीने बेसाल्ट, टफ आणि ब्रेशिया सारख्या कठीण खडकांना भेदत महत्त्वाचा टप्पा गाठलाय. कृष्णा १ आणि २ हे हॅरॅन्कनेट या जर्मनी बनावटीचे टीबीएम मशीन आहे व त्याची लांबी १०८ मीटर इतकी असून हे प्रत्येकी ४०० टन इतक्या वजनाचे आहे. 

याप्रसंगी मुं. मे. रे. कॉ. च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे म्हणाल्या,"आज प्रकल्पातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आम्ही गाठला आहे. सध्या सर्व १७ टीबीएम्स मुंबईच्या भूगर्भात काम करत आहेत आणि १८ किमी पेक्षा अधिक म्हणजेच एकूण ३५% भुयारीकरण पूर्ण झाले आहे. सध्या कामाची गती बघता मुंबईकरांच्या आरामदायी प्रवासासाठी दिलेल्या वेळेत आम्ही मेट्रो-३ मुंबईकरांच्या सेवेत आणू असा विश्वास आहे."

Web Title: Completion of the Colaba-Bandra-Seepz Metro 3 route, new city to Dadar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो