बाल लैंंगिक शोषण, मानवी तस्करीविरोधात यात्रेच्या माध्यमातून लढा - सत्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:39 AM2017-08-25T00:39:10+5:302017-08-25T00:39:15+5:30

लहान मुलांना देशाचे भविष्य मानले जाते. मात्र गेल्या काही वर्षांत बाल लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीत झालेली वाढ देशासाठी चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत देशात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण व्हावे, म्हणून दीर्घ आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

 Child sexual exploitation, fight through Yatra against human trafficking - Satyarthi | बाल लैंंगिक शोषण, मानवी तस्करीविरोधात यात्रेच्या माध्यमातून लढा - सत्यार्थी

बाल लैंंगिक शोषण, मानवी तस्करीविरोधात यात्रेच्या माध्यमातून लढा - सत्यार्थी

Next

लहान मुलांना देशाचे भविष्य मानले जाते. मात्र गेल्या काही वर्षांत बाल लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीत झालेली वाढ देशासाठी चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत देशात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण व्हावे, म्हणून दीर्घ आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. कन्याकुमारीपासून दिल्लीपर्यंत ‘भारत यात्रा’ म्हणून हजारो लोक चालत जाणार आहेत. नेमके काय असणार या यात्रेमध्ये? त्यातून काय साध्य होईल? याबाबत नोबेल पारितोषिक विजेते, समाजसेवक कैलाश सत्यार्थी यांच्याशी ‘लोकमत’चे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी साधलेला संवाद...

भारत यात्रेमागचा मुख्य उद्देश काय? त्याचे स्वरूप कसे असेल?
- देशातील चुप्पी तोडण्यासाठी भारत यात्रा काढण्यात येणार आहे. देशात बाल लैंगिक शोषणाचे प्रकार वाढले आहेत. मानवी तस्करीत ५ वर्षांपासून १५ वर्षांपर्यंतची लहान मुले आणि मुलींच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. मात्र आजही तक्रार नोंदवण्याचे प्रमाण कमी आहे. पालक आणि पाल्यांमध्ये संवाद नसल्याने या घटना उघडकीस येत नाहीत. या यात्रेच्या माध्यमातून १ कोटी नागरिक बाल लैंगिक शोषण तसेच अत्याचाराविरोधात लढण्याची शपथ घेतील. मानवी तस्करीत कठोर शिक्षेची तरतूद करण्याची मागणी करतील.

या यात्रेत कोण सामील होईल?
कन्याकुमारीपासून २२ राज्यांतून ११ हजार किलोमीटरचा प्रवास करून ही यात्रा दिल्लीला पोहोचेल. दरम्यान, देशातील विविध ६ राज्यांतून अंतर्गत यात्रा निघून त्या मुख्य यात्रेत सामील होतील. यात्रेत सर्वपक्षीय खासदार, मंत्री, संबंधित राज्यातील मुख्यमंत्री, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सामाजिक संस्था व संघटनांमधील कार्यकर्ते सामील होतील. सुमारे १०० ते १५० कार्यकर्ते रोज यात्रेत चालतील. त्यांना प्रत्येक दिवशी त्या-त्या शहरातील हजारो लोक जोडले जातील. अत्याचाराला बळी पडलेले पीडित आणि त्यांचे कुटुंबीय यात्रेचे नेतृत्व करतील.

यात्रेशी ग्रामीण भागाला कसे जोडणार?
ग्रामीण भागाशी जोडून घेण्यासाठी याआधीच साडेपाच लाख आंतरदेशीय पत्रे सरपंच आणि पंचांना पाठवली आहेत. त्यात बहुतेकांकडून प्रतिसादही मिळाला आहे. कारण प्रत्येकाला या यात्रेत सामील होता येणार नाही. मात्र यानिमित्ताने या विषयावर चर्चेला सुरुवात होऊन एक संघटन तयार होईल.

मुलांना बोलते कसे करावे?
मुलांना चैनीच्या वस्तू आणि सुखसोयी दिल्या की पालकांना त्यांचे कर्तव्य संपले असे वाटते. मात्र तसे नसून संवाद महत्त्वाचा आहे. मुलांसोबत मित्र म्हणून संवाद साधताना पालकांनी ऐकण्याची सवय लावावी. त्यांच्यावर विचार लादू नका. उलट त्यांच्यासोबत वेळ घालवा. कारण तक्रार पेटीतून मुलांच्या तक्रारी जाणून घेण्यापेक्षा त्यांना बोलते करणे अधिक महत्त्वाचे आहे.

सर्वात जास्त अपेक्षा कोणाकडून आहेत?
युवकांकडून जास्त अपेक्षा आहेत. त्यांनी समूह तयार करून या प्रश्नाविरोधात लढण्याची गरज आहे. कारण आजची पिढी वाचली, तरच पुढच्या पिढ्या सुरक्षित राहतील. त्यामुळे शाळा व महाविद्यालयीन तरुणांशी संपर्कात असून मोठ्या संख्येने ते सामील होतील, याची खात्री आहे. त्यादृष्टीने आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

यात्रेचा काय परिणाम अपेक्षित आहे?
संपूर्ण देशाचे वातावरण या यात्रेनंतर ढवळून निघेल. २७ धर्म आणि जातींच्या धर्मगुरूंसोबत याआधी परिषद घेतली आहे. त्यात हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, जैन अशा सर्व धर्मगुरूंचा समावेश होता. प्रत्येक धर्मगुरू त्यांच्या शिकवणीतून या प्रश्नाला वाचा फोडणार असून यात्रेदरम्यान, यात्रेकरूंनी मंदिर, मशीद, गुरुद्वारांमध्ये मुक्काम करावा असा प्रस्ताव धर्मगुरूंनीच मांडला आहे.

यात्रेच्या समारोपानंतर काय?
ही यात्रा म्हणजे एका प्रदीर्घ आंदोलनाची सुरुवात आहे. तीन वर्षे हे आंदोलन सुरू राहील. बाल मानवी तस्करीसंदर्भात कठोर कायदा करावा म्हणून केंद्र सरकारसह राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. त्यामुळे यात्रेचा समारोप कठोर कायद्याने होईल, अशी आशा आहे.

Web Title:  Child sexual exploitation, fight through Yatra against human trafficking - Satyarthi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.