चंदा व दीपक कोचर यांच्या अटकेला हायकोर्टात आव्हान; विशेष बेड, घरच्या जेवणास परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 05:34 AM2022-12-28T05:34:00+5:302022-12-28T05:34:57+5:30

आयसीआयसीआय बँक कर्ज गैरव्यवहारप्रकरणी करण्यात आलेली अटक व विशेष न्यायालयाने सुनावलेली कोठडी बेकायदा असल्याचा दावा करण्यात आला आहे.

chanda kochhar and deepak kochhar arrest challenged in high court in icici bank loan case | चंदा व दीपक कोचर यांच्या अटकेला हायकोर्टात आव्हान; विशेष बेड, घरच्या जेवणास परवानगी

चंदा व दीपक कोचर यांच्या अटकेला हायकोर्टात आव्हान; विशेष बेड, घरच्या जेवणास परवानगी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :आयसीआयसीआय बँक कर्ज गैरव्यवहारप्रकरणी करण्यात आलेली अटक व विशेष न्यायालयाने सुनावलेली कोठडी बेकायदा असल्याचा दावा करत आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीआईओ) चंदा कोचर व त्यांचे पती दीपक कोचर यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता नाही, असे म्हणत कोर्टाने कोचर दाम्पत्याला तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला.

न्या. माधव जामदार व न्या. संतोष चपळगावकर यांच्या सुटीकालीन खंडपीठासमोर कोचर यांच्या वकिलांनी याचिका सादर केली, तसेच तातडीची सुनावणी घेण्याची न्यायालयाला विनंती केली. कोचर यांच्यावर २०१९ मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला. गेली चार वर्षे सीबीआयने त्यांच्यावर कारवाई केली नाही. आवश्यक पूर्वपरवानगीशिवाय दोघांनाही अटक करण्यात आली आहे. त्यामुळे सीबीआयने दोघांना केलेली अटक  व त्यानंतर विशेष न्यायालयाने सुनावलेली कोठडी बेकायदेशीर आहे, असे कोचर यांच्या वकिलांनी सांगितले. व्हिडीओकॉनचे वेणुगोपाल धूत यांना सोमवारी अटक केली. न्यायालयाने या सर्वांना २८ डिसेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉनला दिलेल्या सहा कर्जांपैकी दोन वेळा दिलेले कर्ज हे कोचर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंजूर केले.

विशेष बेड, घरच्या जेवणास परवानगी

कोचर दाम्पत्य आणि धूत यांनी सीबीआय कोठडीत आपल्याला विशेष बेड, गाद्या, टॉवेल, घरचे जेवण व औषधी देण्यात यावी, यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने त्यांना स्वखर्चाने हे सर्व घेण्यास परवानगी दिली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: chanda kochhar and deepak kochhar arrest challenged in high court in icici bank loan case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.