मध्य रेल्वेचे ‘गोंधळपत्रक’

By admin | Published: November 24, 2014 04:02 AM2014-11-24T04:02:41+5:302014-11-24T04:02:41+5:30

मध्य रेल्वेकडून नवीन वेळापत्रक नुकतेच लागू करण्यात आले आणि या वेळापत्रकात अनेक गाड्यांचा विस्तार करून प्रवाशांना दिलासा देण्यात आल्याचा दावा करण्यात आला

Central Railway's 'Troubleshooting' | मध्य रेल्वेचे ‘गोंधळपत्रक’

मध्य रेल्वेचे ‘गोंधळपत्रक’

Next

मुंबई : मध्य रेल्वेकडून नवीन वेळापत्रक नुकतेच लागू करण्यात आले आणि या वेळापत्रकात अनेक गाड्यांचा विस्तार करून प्रवाशांना दिलासा देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. मात्र नवीन वेळापत्रक लागू होताच लोकल उशिराने धावू लागल्या आणि त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला. शिवाय वेळापत्रकाच्या मूळ रचनेतच त्रुटी आहेत. काही गाड्यांमध्ये केवळ एक मिनिटाचे अंतर आहे, तर काही गाड्यांमध्ये तब्बल १४ मिनिटांचे अंतर आहे. त्यामुळे काही गाड्यांमध्ये तुरळक गर्दी आणि काही गाड्या ओसंडून वाहत असल्याचे दिसत आहे.
वेळापत्रकात बदल कशासाठी?
रेल्वेकडून दर एक ते दोन वर्षांनी वेळापत्रक बदलण्यात येते. या वेळापत्रकात प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातो. वाढणारी गर्दी आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेता लोकल फेऱ्या वाढवणे, सेवेचा विस्तार करणे, कमी अंतराच्या फेऱ्या रद्द करणे, त्याऐवजी लांब पल्ल्याच्या फेऱ्या सुरू करणे, कमी प्रतिसाद मिळत असलेल्या फेऱ्या रद्द करणे इत्यादी फेरफार केले जातात. त्यानुसार मध्य रेल्वेकडून १५ नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक लागू करण्यात आले.
नियोजनाचा अभाव
या वेळापत्रकात छोट्या मार्गापर्यंत धावणाऱ्या लोकल फेऱ्यांचा विस्तार करताना ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, आसनगाव, टिटवाळा, अंबरनाथ, कर्जतच्या प्रवाशांना दिलासा देत असल्यााचे सांगितले. परंतु फेऱ्यांचा विस्तार करताना अंबरनाथ ते सीएसटी आणि सीएसटी ते कुर्लापर्यंत धावणाऱ्या चार फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर कल्याण ते खोपोली, कर्जतकरांना दिलासा देताना चार नवीन फेऱ्या सुरू केल्या. एकूणच हे नवीन वेळापत्रक देताना कुठलेही नियोजन नसल्याचे दिसून आले. ठाणे ते कल्याणपर्यंतच्या प्रवाशांनाही दिलासा देताना १३ फेऱ्या वाढवण्यात आल्या. वाढवण्यात आलेल्या फेऱ्या आणि विस्तारित करण्यात आलेल्या फेऱ्यांचे नियोजन न राहिल्यामुळे मध्य रेल्वेला गेल्या काही दिवसांत फटका बसला.
कर्जत आणि कसारापासून सीएसटीपर्यंत येणाऱ्या गाड्यांना लेट मार्क लागू लागला. पूर्वी दर तीन ते चार मिनिटांनी सुटणाऱ्या गाड्या नवीन वेळापत्रकानुसार आता एक ते चौदा मिनिटांनी धावत आहेत. काही लोकल लागोपाठ एक मिनिटाने आहेत.
काही लोकल तब्बल सात मिनिटे, आठ मिनिटे, दहा मिनिटे तर बारा आणि चौदा मिनिटांनीही धावत आहेत. त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर तसेच कल्याण ते दादरपर्यंत प्रवास करणाऱ्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. गर्दीच्या वेळेत ट्रेन बऱ्याच वेळाने असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जातोे. मात्र वेळापत्रक योग्य असून ते थोडा कालावधी लागेल, असे मध्य रेल्वेकडून सांगितले जात आहे. त्यामुळे प्रवाशांच्या हाती प्रतीक्षाच शिल्लक राहिली आहे.

Web Title: Central Railway's 'Troubleshooting'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.