मुंबई : राज्यातील प्रत्येक कर्करोगग्रस्तापर्यंत पोहोचण्यासाठी कालबद्ध मोहीम आखण्यात आली असून, त्याचा एक भाग म्हणून आॅनलाइन आॅन्कोलॉजी ट्युटोरियलद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि आशा कार्यकर्ती यांना कर्करोगाविषयीचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शुक्रवारी दिली.
टाटा रुग्णालय आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टरांना कर्करोगाविषयी अद्ययावत आणि निरंतर प्रशिक्षण मिळावे, यासाठी आॅनलाइन आॅन्कोलॉजी ट्युटोरियलचा सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात आरंभ करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. डॉ. सावंत म्हणाले, या ट्युटोरियलमार्फत तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेता येणार आहे. तज्ज्ञ सल्लागारांचे व्हिडीओ व्याख्यान, केस स्टडी, मूल्यांकन प्रश्नावली आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या संबंधित तज्ज्ञांद्वारे वेबिनार इत्यादी माध्यमांतून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आॅनलाइन आॅन्कोलॉजी ट्युटोरियलद्वारे प्रशिक्षण घेतलेले डॉक्टर सीएमई मूल्यांकनासही पात्र ठरणार आहेत.
राज्यातील प्रत्येक कॅन्सर रुग्णांचे निदान व्हावे, यासाठी सर्व स्तरातून जास्तीतजास्त रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. दुसºया टप्प्यामध्ये प्रत्येक कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या वेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, आरोग्य सेवा संचालक डॉ. सतीश पवार, सहसंचालक डॉ. साधना तायडे, टाटा मेमोरियलचे संचालक डॉ. कैलाश शर्मा उपस्थित होते.

आॅनलाइन आॅन्कोलॉजी ट्युटोरियलची वैशिष्ट्ये
हा अभ्यास चिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, दंतवैद्यक आणि इतर आरोग्य सेवा व्यावसायिकांसाठी आहे. जे कर्करोगतज्ज्ञ नसतात, परंतु कर्करोगाचे लवकर शोध, निदान करण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
आॅनलाइन व्हिडीओ व्याख्यानांचा उपयोग आरोग्य व्यावसायिकांना त्यांचे कौशल्य व ज्ञान सुसज्ज करण्याच्या हेतूने केलेला आहे. कर्करोगाच्या प्रकरणांची माहिती शोधणे, त्यांचे निदान करणे आणि त्यांचा अहवाल सादर करणे हा आहे.
कर्करोगाच्या शरीरातील वेगवेगळ्या जागा आणि उपजागांवर आधारित संपूर्ण अभ्यासक्रम सात आठवड्यांचा वेगवेगळ्या मॉड्युलसह तयार केलेला आहे.