पालघरवर बविआचे वर्चस्व

By Admin | Published: October 21, 2014 12:36 AM2014-10-21T00:36:27+5:302014-10-21T00:36:27+5:30

पालघर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातल्या मतमोजणीचा कौल स्पष्ट झाला असून त्याने या जिल्ह्यावर बविआची भक्कम पकड असल्याचे स्पष्ट केले आहे.

Bowman's domination in Palghar | पालघरवर बविआचे वर्चस्व

पालघरवर बविआचे वर्चस्व

googlenewsNext

वसई : पालघर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातल्या मतमोजणीचा कौल स्पष्ट झाला असून त्याने या जिल्ह्यावर बविआची भक्कम पकड असल्याचे स्पष्ट केले आहे. या पक्षाने या जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात अन्य सर्व पक्षांपेक्षा जास्त म्हणजे ३,१७२३० एवढी मते मिळविली आहेत. लोकसभा निवडणुकीत बविआच्या बळीराम जाधव यांचा ज्या मोदी लाटेने पराभव केला त्याच मोदी लाटेला विधानसभा निवडणुकीत लगाम घालण्याची किमया बविआने करून दाखविली. लोकसभा निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता आपले चुकले कुठे? याचे अंतर्मुखतेने परिक्षण करून तिच्या नेतृत्वाने अचूक व्यूहरचना केली. त्याचे फळ तिला तीन आमदारांच्या रुपाने मिळाले. बविआच्या या यशाला काँग्रेसमधील साठमारी, राष्ट्रवादीतील सुंदोपसुंदी आणि मार्क्सवाद्यातील यादवी यांनीही मोठा हातभार लावला असा मतमोजणीचा कौल सांगतो आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मते बविआला मिळाली असून ती ३१,७२३० एवढी आहेत. तर त्या खालोखाल शिवसेनेला २३९८९१ इतकी आहेत. त्यानंतर भाजपला १९७३४९ एवढी मिळाली आहेत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अनुक्रमे ८०८१५, ६००१६ अशी आहेत. तर मार्क्सवाद्यांना २८१४९ अशी आहेत.
या जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे ते बविआच्या क्षितिज ठाकूर यांना नालासोपारा या मतदारसंघात त्यांनी ५४,४९९ एवढे मताधिक्य प्राप्त केले. विशेष म्हणजे ते मावळते आमदार असतानाही त्यांनी हे यश मिळविले. सर्वसाधारणत: विद्यमान आमदारांबद्दल जी नाराजी असते त्यामुळे त्याचे स्थान धोक्यात येते. परंतु, ती येथे अजिबात जाणवली नाही. या जिल्ह्यात सर्वाधिक मतेही त्यांनीच मिळविली. विरोधकांच्या सर्व मतांची बेरीज एकत्र केली. तरी त्या पेक्षाही जास्त मते क्षितीज यांना पडली. त्यांना एकूण ११३५६६ मते मिळालीत. ते राज्यातले सर्वात तरुण आमदारही ठरले. त्या खालोखाल वसईमध्ये हितेंद्र ठाकूर यांना मते मिळाली. ९७२९१ ही त्यांची एकूण मते तर त्यांचे मताधिक्य ३१८९६ एवढे आहे. येथेही विवेक पंडीत मायकल फुर्ट्याडो आणि मनवेल तुस्कानो या तिघांची मते जरी एकत्र केली तरी त्यापेक्षा ठाकूर यांची मते अधिक होतात. विवेक पंडीत यांना सेना, भाजप यांनी छुपे सहकार्य केले तरी त्यांच्यावर बविआच्या हितेंद्र यांनी मात केली.
या जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाची मते बोईसरचे बविआचे उमेदवार विलास तरे यांनी मिळविली. त्यांना ६४,५५० मते मिळाली. त्यांचे मताधिक्य १२,८७३ चे होते. येथे त्यांनी भाजपच्या जगदिश धोडी यांच्या पेक्षा दुप्पट मते मिळविली. धोडी यांना ३०२२८ मते मिळाली. शिवसेनेच्या कमलाकर दळवी यांना मिळालेल्या ५१६७७ मतांपेक्षा १२ हजाराहून अधिक मते तरे यांनी मिळविली. विशेष म्हणजे तेही विद्यमान आमदार होते. तरी त्यांनी मोदीलाटेचा कोणताही प्रभाव येथे जाणवू दिला नाही. पालघरमध्ये राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या कृष्णा घोडा यांनी भाजपचा वारू निसटत्या मताधिक्यानी का असेना रोखला. त्यांना ४६,१४२ मते मिळाली. काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांनी ४५६२७ मते मिळविली. तर भाजपच्या प्रेमचंद गौंड यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ३४१४९ एवढी त्यांची मते होती. बविआच्या मनिषा निमकर यांनी २३७३८ मते मिळवून चांगली झूंज दिली.
विक्रमगडमध्ये आणि डहाणूत मोदीलाट प्रभावी ठरली. विक्रमगड मध्ये विष्णू सावरा या भाजपच्या आमदारांनी ३८४५ या निसटत्या मताधिक्यानी कसाबसा विजय मोदीलाट असताना मिळवला. हेमंत गोविंद या बविआच्या उमेदवाराने १८०८५ मते घेतली नसती तर इथे शिवसेनेच्या प्रकाश निकम यांचा विजय निश्चित होता. कारण त्यांनी ३६३५६ एवढी मते घेतली होती. राष्ट्रवादीच्या भुसारा यांना ३२०५३ मते मिळाली पण ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.
डहाणूत भाजपच्या पास्कल धनारे यांनी ४४८८९ मते आणि १६१०० इतके मताधिक्य मिळवून येथे मार्क्सवाद्यांना पराभूत केले. राष्ट्रवादीच्या चौधरींना २७९६३ आणि काँग्रेसच्या रमेश पडवळे यांना १४१६६ अशी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची मते मिळाली. बविआला डहाणू, विक्रमगड, पालघर येथे खूप मेहनत घ्यावी लागेल असा कौल या मतदानाने मिळाला आहे. काँग्रेसमधील दामू शिंगडा व त्यांचे विरोधक यात माजलेली साठमारी लोकसभा निवडणुकीच्यावेळी त्यांची त्यांच्या पुत्रासह हकालपट्टी करण्याची काँग्रेसवर आलेली वेळ तसेच राष्ट्रवादीत माजलेली यादवी व मार्क्सवाद्यात ओझरे पिता-पुत्र विरुद्ध अन्य नेते यात माजलेला संघर्ष यामुळे त्यांचे या निवडणुकीत पानीपत झाले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Bowman's domination in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.