बीएनएचएस करणार कबुतरांचा अभ्यास

By admin | Published: May 28, 2017 02:35 AM2017-05-28T02:35:20+5:302017-05-28T02:35:20+5:30

मुंबईत सर्वदूर आढळणाऱ्या कबुतरांची गणना करण्याच्या मोहिमेला बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटने (बीएनएचएस) सुरुवात केली आहे. मुंबईतील कबुतरखाने आणि कबुतरांची

BNHS will study doves | बीएनएचएस करणार कबुतरांचा अभ्यास

बीएनएचएस करणार कबुतरांचा अभ्यास

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत सर्वदूर आढळणाऱ्या कबुतरांची गणना करण्याच्या मोहिमेला बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटने (बीएनएचएस) सुरुवात केली आहे. मुंबईतील कबुतरखाने आणि कबुतरांची संख्या खूपच जास्त आहे. त्यामध्ये ‘रॉक पिजन’ची संख्या सर्वाधिक आहे. ते पाहता, कबुतरांची गणना करणे कठीण असले, तरी येत्या आठवड्यात त्याबद्दलची माहिती सर्वांसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती या मोहिमेतील पक्षीअभ्यासक व बीएनएचएसचे संशोधक सहायक नंदकिशोर दुधे यांनी दिली.
मोहिमेदरम्यान बीएनएचएस कबुतरखाने, कबुतरांची संख्या, त्यांची दिनचर्या, त्यांचे वर्तन व कबुतरांचे पर्यावरणातील स्थान, लोकांची कबुतर पाळण्यामागची कारणे, कबुतरांचे आरोग्य, कबुतरांमुळे नागरिकांना होणारे त्रास, नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम, या सर्वांचा अभ्यास करणार आहे. ही अभ्यास मोहीम तीन टप्प्यांमध्ये होईल. पहिल्या टप्प्यात कबुतरांची संख्या मोजली जाईल. दुसऱ्या टप्प्यात कबुतरखाने, कबुतरांचे राहणीमान, त्याचे लोकांवरील परिणाम आणि तिसऱ्या टप्प्यात विविध डॉक्टरांशी चर्चा करून, कबुतरांचे आरोग्य आणि कबुतरांचे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम या विषयी माहिती मिळविली जाईल. मुंंबईत कबुतरांसाठी दाण्यांची, राहण्याची आणि सुरक्षेची सोय मुंबईत सहज होते. अशा अनेक कारणांमुळे मुंबईत कबुतरांची संख्या येत्या काळात अधिक वाढणार आहे, असे बीएनएचएसचे म्हणणे आहे. असे असूनही कबुतरांबाबत मोठ्या प्रमाणावर माहिती उपलब्ध नाही. या मोहिमेच्या निमित्ताने अशा प्रकारची माहिती उपलब्ध होणार आहे.

- मोहिमेच्या निमित्ताने संस्थेने पक्षी निरीक्षकांना, पक्षी वैज्ञानिकांना आणि सर्व निसर्ग प्रेमींना आपल्या सभोवतालची कबुतरांची पाहणी करावी, त्यांची संख्या मोजावी, त्यांची छायाचित्रे काढावी, त्याचा अहवाल तयार करून संंकलित माहिती n.dudhe@bnhs.or या मेल आयडीवर पाठवावी, असे आवाहन बीएनएचएसने केले आहे.

कबुतर गणना :
या आठवड्यात कधीही
सहभाग : पक्षी निरीक्षक, अभ्यासक, संशोधक, निसर्गप्रेमी
गणना कशी आणि कोठे : कबुतर खान्यांमध्ये घराजवळील कबुतरांच्या वास्तव्याच्या ठिकाणी
अहवाल : गणनेच्या ठिकाणची माहिती, कबुतरांची संख्या, छायचित्रांचा समावेश आवश्यक

Web Title: BNHS will study doves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.