उद्धव ठाकरे आणि अमित शहांमधील बैठक संपली; तब्बल दोन तास झाली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 09:02 PM2018-06-06T21:02:16+5:302018-06-06T22:38:39+5:30

मातोश्रीवर नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ चालली चर्चा

bjp president amit shah meets shiv sena chief uddhav Thackeray at matoshree | उद्धव ठाकरे आणि अमित शहांमधील बैठक संपली; तब्बल दोन तास झाली चर्चा

उद्धव ठाकरे आणि अमित शहांमधील बैठक संपली; तब्बल दोन तास झाली चर्चा

Next

मुंबई: भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंमधील बैठक संपली आहे. अमित शहा उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पावणेआठच्या सुमारास मातोश्रीवर पोहोचले होते. त्यांच्यात साधारणत: साडेआठपर्यंत चर्चा होणार होती. मात्र ही चर्चा नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ चालली. अमित शहा आणि उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल दोन तास बंद दाराआड चर्चा झाली आहे. या बैठकीत नेमकी काय खलबतं झाली, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.

उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात रात्री आठ ते साडेआठ या कालावधीत चर्चा होणार होती. मात्र प्रत्यक्षात ही चर्चा दहावाजेपर्यंत सुरू होती. या मॅरेथॉन बैठकीत नेमकं काय झालं, कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं. विशेष म्हणजे मातोश्रीच्या दुसऱ्या मजल्यावरील बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात मॅरेथॉन चर्चा झाली. या चर्चेनंतर उद्धव ठाकरे अमित शहांना सोडण्यासाठी मातोश्रीच्या दरवाज्यापर्यंत आले होते. यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी अमित शहा यांना नमस्कारदेखील केला. त्यामुळे या दोन नेत्यांमधील चर्चा सकारात्मक झाली, अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. 

देशभरात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला पत्करावे लागलेले पराभव, विरोधकांची होत असलेली एकजूट आणि शिवसेनेनं दिलेला एकला चलो रेचा नारा, या पार्श्वभूमीवर ही भेट अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात होती. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती होणार का?, दोन पक्षांमध्ये निर्माण झालेली दरी मिटवण्यात अमित शहांना यश येणार का?, याची चर्चा या भेटीच्या निमित्तानं राजकीय वर्तुळात सुरू झाली. या बैठकीनंतर अमित शहा मातोश्रीवरुन सह्याद्री अतिथीगृहावर जाण्यासाठी रवाना झाले. यावेळी उद्धव ठाकरे त्यांना दरवाज्यापर्यंत सोडायला आले होते. याशिवाय अमित शहांची देहबोलीदेखील अतिशय सकारात्मक वाटत होती. त्यामुळे ही भेट यशस्वी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

Web Title: bjp president amit shah meets shiv sena chief uddhav Thackeray at matoshree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.