‘जेट’च्या तिकिटांचे कोट्यवधी रुपये अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 06:21 AM2019-04-17T06:21:30+5:302019-04-17T06:21:36+5:30

जेट एअरवेजची उड्डाणे रद्द झाल्याचा प्रचंड मोठा आर्थिक फटका या कंपनीद्वारे प्रवास करण्यासाठी तिकिटे आरक्षित केलेल्या प्रवाशांना बसला आहे.

Billions of rupees of jet tickets stuck stuck | ‘जेट’च्या तिकिटांचे कोट्यवधी रुपये अडकले

‘जेट’च्या तिकिटांचे कोट्यवधी रुपये अडकले

googlenewsNext

- खलील गिरकर
मुंबई : जेट एअरवेजची उड्डाणे रद्द झाल्याचा प्रचंड मोठा आर्थिक फटका या कंपनीद्वारे प्रवास करण्यासाठी तिकिटे आरक्षित केलेल्या प्रवाशांना बसला आहे. जेट एअरवेजने प्रवाशांना तिकीट परतावा देण्याचे आश्वासन दिले असले, तरी कंपनीकडे पैसे नसताना परतावा कसा देणार, याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे आरक्षण केलेल्यांचे तब्बल कोट्यवधी रुपये जेट एअरवेजमध्ये अडकले आहेत.
जेट प्रीव्हिलेज, जेपी माइल्सद्वारे तिकिटे आरक्षित केलेल्यांना कसा परतावा देणार, याबाबतदेखील काहीही माहिती देण्यास कंपनीने असमर्थता दर्शविल्याने पैसे अडकलेल्यांना परतावा मिळणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.
दुहेरी बाजूचे आरक्षण करून एका बाजूने प्रवास केल्यावर दुसऱ्या बाजूने परत येतानाचा परतावा मिळत नाही. याचा फटका परदेशात प्रवासाला गेलेल्या पर्यटकांना व पर्यटक कंपनीला बसला आहे. दुहेरी आरक्षण करून लंडनला गेल्यावर परत येताना ‘जेट’ने उड्डाण रद्द केल्याने, पर्यटकांना भारतात परत आणण्यासाठी मोठा आर्थिक फटका बसल्याचे मत केसरी टुर्सच्या संचालिका झेलम चौबळ यांनी व्यक्त केले. परत येताना कंपनीने उड्डाण रद्द केल्याने परतावा मिळायला हवा. मात्र, त्याबाबत कंपनीने काहीच माहिती दिलेली नाही. त्यामुळेच हा परतावा मिळेल की नाही, याबाबत कल्पना नाही, असे त्या म्हणाल्या.
अनामत म्हणून अडकले पर्यटक कंपन्यांचे कोट्यवधी रुपये
समूहाने तिकिटे आरक्षित करण्यासाठी पर्यटक कंपन्यांना अनामत रक्कम म्हणून ६ ते ८ महिने आधीच विमान कंपनीकडे पैसे भरावे लागतात. पर्यटन कंपनीच्या विस्तारानुसार ही रक्कम कमी-जास्त होते. परदेशात प्रवास करणाºया कंपन्यांचे कोट्यवधी रुपये अनामत रक्कम म्हणून जमा असतात. अशा प्रकारे जेट एअरवेजमध्ये पैसे जमा असलेल्या कंपन्यांना कोट्यवधींची अनामत रक्कम परत कशी मिळणार, याची चिंता सतावत आहे. पुढील महिन्यातील काही परदेशी सहली यामुळे रद्द कराव्या लागतील, अशी भीती या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रवाशांकडून तिकिटे रद्द करण्याची मागणी
अनेक प्रवासी वैयक्तिकरीत्या आरक्षण करतात, काही जण समूहाने आरक्षण करतात, तर पर्यटन कंपन्यांना मोठ्या समूहाचे आरक्षण करावे लागते. या सर्वांचे पैसे अडकले आहेत. सध्या परतावा मिळत असला, तरी त्यासाठी नेहमीपेक्षा जास्त विलंब होत आहे. जेटकडून होत असलेल्या या विलंबामुळे ग्राहकांच्या संतापाला ट्रॅव्हल एजंटना तोंड द्यावे लागत आहे. ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून तिकिटे आरक्षित केलेल्यांनी ही तिकिटे रद्द करण्याची मागणी करण्यास प्रारंभ केला आहे.
जेट एअरवेजचा खोडसाळपणा
जेट एअरवेजने त्यांची १८ एप्रिलपर्यंतची उड्डाणे रद्द केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ज्यांनी १९ एप्रिलचे आरक्षण केले असेल, त्यांना तिकीट रद्द करताना पूर्ण परतावा मिळत नाही व काही रक्कम परतावा म्हणून मिळते. जर उड्डाण रद्द झाले, तर पूर्ण रक्कम परतावा म्हणून मिळते. मात्र, शेवटच्या क्षणी उड्डाण रद्द झाल्याचे जाहीर केल्यावर प्रवाशांना दुसºया विमान कंपनीचे तिकीट मिळणे कठीण होते. याशिवाय जर तिकीट उपलब्ध झाले, तरी त्याचा दर तीन ते चार पट अधिक असल्याने, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागण्याची शक्यता असते. जेट एअरवेजने प्रवाशांसोबत असा खेळ करण्याऐवजी पुढील सर्व उड्डाणे रद्द झाल्याचे घोषित करावे. जेणेकरून प्रवाशांना पूर्ण परतावा मिळू शकेल व त्यांना दुसºया कंपनीचे तिकीट काढण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकेल, अशी मागणी केसरी टुर्सच्या संचालिका झेलम चौबळ यांनी केली आहे.
(क्रमश:)
>प्रीव्हिलेज, माइल्सबाबतही संदिग्धता
जेट प्रीव्हिलेज प्रवासी, जेपी माइल्स योजनेमध्ये आरक्षण केलेले प्रवासी यांची संख्या मोठी असून, अशा कुटुंबीयांद्वारे त्यांच्या पूर्ण कुटुंबीयांसाठी तिकिटे आरक्षित करून ठेवली जातात. त्या माध्यमातून लाखो रुपये कंपनीमध्ये अडकले आहेत. परदेशी प्रवासाची तिकिटे आरक्षित करून ठेवली असल्यास ही रक्कम कोट्यवधींच्या घरात जाते. त्यामुळे अशा प्रकारे जेटमध्ये पैसे अडकलेल्यांना दिलासा कसा मिळणार, याबाबत काहीही माहिती देण्यास ‘जेट’च्या प्रवक्त्यांनी नकार दिला आहे.

Web Title: Billions of rupees of jet tickets stuck stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.