चैत्यभूमीवर उसळला भीमसागर! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची रीघ 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 07:53 AM2024-04-15T07:53:38+5:302024-04-15T07:54:03+5:30

उन्हाच्या तीव्र झळांची तमा न बाळगता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी रविवारी असंख्य भीमसैनिक चैत्यभूमीवर आले.

Bhimsagar rose on Chaityabhoomi followers to salute Babasaheb Ambedkar | चैत्यभूमीवर उसळला भीमसागर! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची रीघ 

चैत्यभूमीवर उसळला भीमसागर! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची रीघ 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उन्हाच्या तीव्र झळांची तमा न बाळगता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी रविवारी असंख्य भीमसैनिक चैत्यभूमीवर आले. निमित्त होते महामानवाच्या जयंतीचे. मुंबई आणि परिसरासह राज्यभरातील अनुयायांनी चैत्यभूमीवर बाबासाहेबांचे मनोभावे दर्शन घेतले. बाबासाहेबांची जयंती रविवारी मुंबई आणि परिसरात उत्साहात साजरी झाली. राज्यभरातून अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले होते. कडक उन्हातही भीमसैनिकांचा उत्साह तिळमात्र कमी नव्हता.

दुपारनंतर उन्हाच्या झळा कमी झाल्यावर आंबेडकरी अनुयायांचा ओघ आणखी वाढला. त्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात शिवाजी पार्कचा परिसर दुमदुमून गेला होता. तसेच आंबेडकरी अनुयायांकडून बाइक रॅलीच्या माध्यमातूनही ठिकठिकाणी अभिवादन केले जात होते. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असल्याने राजकीय नेतेही मोठ्या प्रमाणात चैत्यभूमीवर दाखल झाले होते.  उद्धवसेनेचे उमेदवार अनिल देसाई, अरविंद सावंत यांच्यासह शिंदेसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा समावेश होता. चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. या प्रसंगी महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर आणि इतर अधिकाऱ्यांनी महामानवास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

राजकीय बॅनरबाजी नाही
सण आणि महापुरुषांची जयंती म्हटली की राजकीय पक्षांमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी बॅनरबाजीची स्पर्धाच लागते. त्यातून मुख्य रस्ते आणि चौक बॅनरने भरून जातात. आता लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. परिणामी राजकीय पक्षांच्या बॅनरबाजीवरही बंधने आली आहेत. त्यामुळे दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिवाजी पार्क परिसरात आणि शहरातील मुख्य चौकांमध्ये लागणारे राजकीय पक्षांचे बॅनर यंदा लागलेले नाहीत. त्यामुळे शिवाजी पार्कसह शहरातील रस्त्यांची राजकीय पक्षांच्या बॅनरमधून सुटका झाली आहे.

Web Title: Bhimsagar rose on Chaityabhoomi followers to salute Babasaheb Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.