भय्यू महाराज यांच्या संपत्तीचा ताळमेळ लागेना; मुलीची न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 01:26 AM2020-12-03T01:26:19+5:302020-12-03T07:27:13+5:30

मध्यप्रदेशातील इंदूर येथील राष्ट्रसंत भय्यू महाराज यांनी १२ जून २०१८ रोजी रिव्हॉल्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती.

Bhayyu Maharaj's wealth did not match; The girl's petition in court | भय्यू महाराज यांच्या संपत्तीचा ताळमेळ लागेना; मुलीची न्यायालयात याचिका

भय्यू महाराज यांच्या संपत्तीचा ताळमेळ लागेना; मुलीची न्यायालयात याचिका

googlenewsNext

अहमदनगर : इंदूर (मध्यप्रदेश) येथील उदयसिंह देशमुख ऊर्फ भय्यू महाराज यांच्या आत्महत्येला ३० महिने उलटले तरी अद्याप वडिलांच्या संपत्तीचा ताळमेळ लागलेला नाही. त्यांच्या व ट्रस्टच्या नावावर असलेल्या संपत्तीची संपूर्ण माहिती मला हवी आहे, अशी विनंती भय्यू महाराज यांची कन्या कुहू देशमुख हिने इंदूर येथील जिल्हा न्यायालयात केली आहे, अशी माहिती कुहूच्या वकिलांनी ‘लोकमत’ला दिली.

भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणाची सध्या इंदूर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) झालेल्या सुनावणीच्या वेळी कुहू देशमुख ही न्यायालयात हजर झाली होती. यावेळी तिने वडिलांच्या संपत्तीविषयी माहिती हवी असल्याचे न्यायालयाला सांगितले, अशी माहिती कुहूचे वकील ॲड. सुदत  जयसिंग पाटील, ॲड. प्रियंका राणे-पाटील, ॲड. भाग्येश पारनेरकर यांनी सांगितले.  

मध्यप्रदेशातील इंदूर येथील राष्ट्रसंत भय्यू महाराज यांनी १२ जून २०१८ रोजी रिव्हॉल्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्यांचे सेवेकरी विनायक दुधाडे, शरद देशमुख, पलक पुराणिक यांना केली अटक असून, ते सध्या कारागृहात आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर कुहू ही प्रसारमाध्यमांपासून दूर होती. वडिलांशी निगडित अनेक गोष्टी तिने न्यायालयाला सांगितल्या. यामध्ये संपत्तीचा वाद, भय्यू महाराज यांची दुसरी पत्नी आयुषी, परिवारातील अन्य सदस्यांचे वागणे या गोष्टींचा समावेश होता. कुहूला वडिलांच्या संपत्तीबाबत काहीही माहिती नाही. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात त्यांची संपत्ती कुठे-कुठे आहे? त्या संपत्तीची सध्या देखभाल कोण करीत आहे? बँक खाते आणि खात्यामधील व्यवहार कसे सुरू आहेत, याबाबत कोणतीही माहिती नाही. वडिलांच्या संपत्तीवर तिचा पूर्ण हक्क असल्याचा दावाही तिने न्यायालयात केला असल्याचे वकिलांनी सांगितले. वडिलांना आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्यांना शिक्षा व्हावी, अशीही मागणी तिने न्यायालयाकडे केली आहे. याप्रकरणी आता पुढील सुनावणी ८ ते १० डिसेंबरला होणार आहे, असे ॲड. भाग्येश पारनेरकर यांनी सांगितले.

Web Title: Bhayyu Maharaj's wealth did not match; The girl's petition in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.