२०११ ते २०१७ दरम्यान देशात ५२ विमान अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 07:11 AM2018-06-29T07:11:13+5:302018-06-29T07:11:24+5:30
नागरी विमान वाहतूक महासंचालक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात २०११ ते २०१७ पर्यंत ५२ विमान अपघात झाले आहेत
मुंबई : नागरी विमान वाहतूक महासंचालक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात २०११ ते २०१७ पर्यंत ५२ विमान अपघात झाले आहेत. त्यापैकी सर्वाधिक ११ अपघात २०११ मध्ये त्याखालोखाल २०१५ मध्ये १० अपघात, २०१२ मध्ये ९ अपघात, २०१३ मध्ये ८ अपघात, २०१६ मध्ये ७ अपघात, २०१४ मध्ये ६ अपघात व २०१७ च्या मार्च महिन्यापर्यंत १ अपघात असे एकूण ५२ अपघात घडले आहेत. या ५२ पैकी ७ अपघात सरकारी एअरलाईन्सचे झाले आहेत. तर खासगी विमान कंपन्यांचे २ अपघात झाले आहेत. विदेशी विमान कंपन्यांचा अवघा एक अपघात झाला होता. विमान उड्डाणाचे प्रशिक्षण देणाऱ्या इन्स्टिट्यूटचे ९ अपघात झाले आहेत. २०११ ते २०१६ या कालावधीत विमान प्रवासात सुरक्षेबाबत गंभीर त्रुटी उद्भवल्याचे प्रसंग ४५ वेळा घडले. यात सर्वाधिक २३ प्रसंग विमानाच्या अभियांत्रिकीमधील तांत्रिक बिघाडामुळे घडले होते. तर १३ प्रसंग आॅपरेशनल त्रुटीमुळे उद्भवले होते. सर्वाधिक ११ प्रसंग २०११ व २०१६ मध्ये उद्भवले होते. २०१२ मध्ये ७, २०१३ मध्ये ६, २०११ व २०१५ मध्ये प्रत्येकी ५ प्रसंग घडल्याचे समोर आले आहे.