'बेस्ट' निर्णय... मुंबईत पुन्हा दिसणार ट्राम; CSMT स्टेशनजवळच इतिहासाचं जतन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 13:19 IST2019-02-18T13:18:34+5:302019-02-18T13:19:04+5:30
मुंबईच्या इतिहासात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आज पाहणं काहीसं दुर्मिळ झालं आहे.

'बेस्ट' निर्णय... मुंबईत पुन्हा दिसणार ट्राम; CSMT स्टेशनजवळच इतिहासाचं जतन
मुंबई- मुंबईच्या इतिहासात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आज पाहणं काहीसं दुर्मिळ झालं आहे. मुंबईत एकेकाळी ट्राम सेवेचा दबदबा होता. त्याच ट्राम सेवेतील एक डब्याचं जतन करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे. विशेष म्हणजे तो डबा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळच्या भाटिया बागेत पाहता येणार आहे. ट्रामची सेवा आता संपुष्टात आली असली तरी ट्रामच्या डब्याची ओळख जतन करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेनं यासाठी 16 लाख रुपयांची तरतूद केली असून, लवकरच त्याचं भाटिया बागेत जतन केलं जाणार आहे.
मुंबई खरी ओळख असलेला ट्रामचा या डब्याच्या माध्यमातून पर्यटकांना मुंबईच्या भूतकाळातील पाऊलखुणा पाहता येणार आहे. मुंबईत जाळं असलेली ट्रामची सेवा 1962 रोजी बंद करण्यात आली होती. ट्राम ही पूर्णतः विजेवर चालत होती. विजेवर चालणाऱ्या या ट्रामचा एक डबा जपून ठेवण्यात आला होता. मुंबईत पालिकेनं पुढाकार घेत तो डबा आता लोकांना पाहता यावा, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळच्या भाटिया बागेत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
बेस्टच्या आगारातील वस्तुसंग्रहालयात जपून ठेवलेला हा डबा आता मुंबईकरांना भाटिया बागेत जाऊन पाहता येणार आहे. 2016मध्ये बेस्टनं हा डबा भंगारात न पाठवता त्याचं जतन करण्याचा निर्णय घेतला. मुंबईकरांसह प्रवाशांना हा डबा पाहता यावा, यासाठीच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळच्या भाटिया बागेत ठेवण्यात येणार आहे. मुंबईकरांना हा ट्रामचा डबा पाहण्याची संधी मिळावी या उद्देशानं महापालिकेनं ही योजना आखली आहे.