बेस्ट आणि मुंबईची हरवलेली शान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:26 AM2018-10-22T00:26:02+5:302018-10-22T00:26:05+5:30

मुंबईची बेस्ट ही एकेकाळी भारतामधील सर्वांत नावाजलेली, आदर्श अशी सार्वजनिक बस सेवा होती.

 The Best and the Happy New Year ... | बेस्ट आणि मुंबईची हरवलेली शान...

बेस्ट आणि मुंबईची हरवलेली शान...

Next

- सुलक्षणा महाजन
मुंबईची बेस्ट ही एकेकाळी भारतामधील सर्वांत नावाजलेली, आदर्श अशी सार्वजनिक बस सेवा होती. बेस्ट ही मुंबईकरांची जान होती. मुंबईची शान होती. मुंबई भटकण्याचा आनंद बेस्ट बसमुळे द्विगुणित होत असे. १९७०च्या दशकात आम्ही वास्तुकलेचे विद्यार्थी हातात मोठी कागदाची भेंडोळी, लाकडी टी स्क्वेअर घेऊन बसने कॉलेजला येत-जात असू. बसला गर्दी असली तरीही सर्व प्रवासी शांतपणे रांगेत उभे राहून बसमध्ये चढत. बेस्टमुळे मुंबईकरांच्या स्वभावातच एक सार्वजनिक शिस्त आलेली होती. मुंबईत राहणे, बेस्टने फिरणे आनंददायक असे.
काही मार्गांवर दुमजली बसेस धावत. वरच्या मजल्यावर पुढची जागा पटकावून मुंबईत हिंडणे ही तेव्हा मोठी करमणूक होती. स्वस्त आणि मस्त. परवडणारी. लहान-मोठ्या, गरीब-श्रीमंत अशा सर्व मुंबईकरांना ती आपली वाटे. बेस्टला तेव्हा स्पर्धक नव्हते, स्पर्धाही नव्हती. पाच-सात वर्षांपूर्वी दररोज चाळीस लाखांच्या वर प्रवासी बेस्टने प्रवास करीत. लोकलप्रमाणेच बेस्ट ही मुंबईची जीवनवाहिनी होती. लोकल सेवा रेल्वेच्या आखलेल्या मार्गांवरूनच धावत असे तर बेस्टच्या बसेस मुंबईच्या कानाकोपऱ्यात जाऊन लोकांना सेवा देत असत. तेव्हा नगरसेवक आपल्या भागातून बेस्टची बस धावावी यासाठी प्रयत्नशील असत. बेस्ट हे लोकप्रतिनिधींसाठी नागरिकांची सेवा करण्याचे साधन होते.
गेल्या पंधरा वर्षांत हे सर्वच पार बदलून गेले आहे. बेस्टच्या बसची संख्या कमी होते आहे. दररोजची प्रवासी संख्या घटून वीस-बावीस लाखांवर आली आहे. पूर्वी बसचा सरासरी वेग तासाला पंधरा-वीस किलोमीटर असे. आता तो आठ-नऊ कि.मी. इतका झाला आहे. रस्त्यावर वाहनांची गर्दी एवढी वाढली आहे की, बेस्टला वेळापत्रक पाळणे अशक्य आहे. लोकांचा प्रवासाचा त्रास आणि बसची वाट बघण्याचा वेळ वाढत गेला आहे. बेस्टची प्रतीक्षा करणे म्हणजे आपल्याच सहनशक्तीचा अंत बघण्यासारखे झाले आहे. त्यामुळेच नागरिक आता ओला, उबर आणि शेअर रिक्षा-टॅक्सी यांना प्राधान्य देत आहेत. अशा अनेक कारणांमुळे बेस्टचा तोटा वाढतो आहे. बेस्टच्या कर्मचाºयांची संख्या कमी झाली तरी पगारापेक्षा आता नोकरीची चिंता वाढली आहे. बेस्ट कर्मचारी संघटनांची ताकदही क्षीण झाली आहे. इंधन आणि देखभाल-दुरुस्तीचा खर्च वाढतो आहे. बेस्टची प्रकृती आणि त्याचबरोबर मुंबईची शान पार रसातळाला गेली आहे. महापालिकेच्या तिजोरीतून पैसे देऊन बेस्ट बस चालवाव्या लागत आहेत.
या सर्व काळातही एक गोष्ट मात्र जोमदार आहे. ते म्हणजे बेस्टच्या बससेवेसंबंधीचे राजकारण! तथाकथित डाव्या चळवळीतील लोक ह्या सर्व दुर्दशेचे खापर खाजगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरणावर फोडतात. अशी आगपाखड करणे सर्वांत सोपे असते. त्यांच्याकडे पर्यायी उपाय सुचविण्यासाठी आवश्यक असणारा अभ्यास, इच्छा आणि उत्तरे शोधण्याचे कसबही नाही. तपशिलात जाऊन माहिती घेण्याची गरज त्यांना नसते आणि वाहतूक क्षेत्राच्या गुंतागुंतीची जाण तर अजिबातच दिसत नाही. बेस्टचा आर्थिक तोटा शासनाने अनुदान देऊन भरून काढणे इतकीच त्यांची मागणी असते. आर्थिक अनुदान कोठून आणायचे? याबद्दल त्यांना चिंता नसतेच. उलट सार्वजनिक संस्थाचा तोटा म्हणजे नागरिकांचा फायदा अशीही त्यांची समजूत दिसते. बेस्टचे खाजगीकरण करण्याचा हा कुटील डाव असल्याची आवई ते उठवतात. परंतु तोटेखोर बेस्ट सेवा विकायला काढली तरी कोणतीही खाजगी कंपनी तिला हात
लावणार नाही हे त्यांना समजू शकत नाही.
वास्तवात बेस्ट सेवेची दुर्दशा आणि कोंडी ही मुख्यत: रस्त्यावरील खाजगी वाहनांच्या अवास्तव वाढलेल्या संख्येमुळे आहे. त्यासाठी रस्त्यावर बस मार्गिका राखून सेवा सुधारता येते. जगातील अनेक महानगरांमध्ये आणि खुद्द वांद्रा-कुर्ला संकुलामध्येही हा प्रयोग यशस्वी ठरतो हे दिसले आहे. आर्थिक तोटा हे बेस्टसारख्या सेवेच्या प्रकृतीचे मापन करण्याचे साधन असते; आणि तो कमी करण्याचे उपाय केवळ सार्वजनिक सेवेचे नसतात तर, महापालिकेच्या ताब्यातील आणि अखत्यारीतील रस्ते आणि महत्त्वाच्या रस्त्यावरील मार्गिका यांचे नियमन करून करता येते.
वाहतूक क्षेत्रातील अभ्यासक, तज्ज्ञ आणि व्यावसायिक मंडळी गेली अनेक वर्षे सार्वजनिक बस वाहतुकीमध्ये सुधारणा करण्याचे अनेक उपाय सांगत आहेत. महापालिकेला आणि राज्य शासनाला याचा ना खेद आहे ना खंत. म्हणूनच नागरिकांच्या इतकेच नगर आणि वाहतूक तज्ज्ञ हताश आहेत. त्यांची युती होऊन आवश्यक ती कठोर धोरणे राबवली तरच बेस्ट मार्गावर आणता येईल.
>स्वस्त आणि मस्त. परवडणारी. लहान-मोठ्या, गरीब-श्रीमंत अशा सर्व मुंबईकरांना बेस्ट आपली वाटे. बेस्टला तेव्हा स्पर्धक नव्हते, स्पर्धाही नव्हती. पाच-सात वर्षांपूर्वी दररोज चाळीस लाखांच्या वर प्रवासी बेस्टने प्रवास करीत. लोकलप्रमाणेच बेस्ट ही मुंबईची जीवनवाहिनी होती.

Web Title:  The Best and the Happy New Year ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.