विद्यार्थ्यांना घरबसल्या मिळणार साक्षांकित शैक्षणिक कागदपत्रे; मुंबई विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 02:42 AM2019-03-29T02:42:27+5:302019-03-29T02:42:48+5:30

विद्यार्थ्यांना परदेशात पुढील शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी लागणारी शैक्षणिक कागदपत्रे आता आॅनलाइन साक्षांकित करून मिळतील. कमीत कमी वेळेत आणि अत्यल्प खर्चात विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

 Attested academic documents for students to receive housing; Important decision of the University of Mumbai | विद्यार्थ्यांना घरबसल्या मिळणार साक्षांकित शैक्षणिक कागदपत्रे; मुंबई विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

विद्यार्थ्यांना घरबसल्या मिळणार साक्षांकित शैक्षणिक कागदपत्रे; मुंबई विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Next

मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात पुढील शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी लागणारी शैक्षणिक कागदपत्रे आता आॅनलाइन साक्षांकित करून मिळतील. कमीत कमी वेळेत आणि अत्यल्प खर्चात विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. विद्यार्थी हित लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गुरुवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत याबाबत ठराव करण्यात आला.
विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शैक्षणिक कागदपत्रे (ट्रान्स्क्रीप्ट्स) महाविद्यालयाकडून दिली जातात. ती साक्षांकित करण्यासाठी त्यांना मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाशी प्रत्यक्ष संपर्क साधून साक्षांकित करून घ्यावी लागतात. साक्षांकित कागदपत्रे वर्ल्ड एज्युकेशन सिस्टीम तसेच कॅनडा इमिग्रेशन सर्व्हिसकडे कुरिअरद्वारे विद्यार्थी पाठवितात. यासाठी बराच वेळ जातो. तसेच दोन ते अडीच हजार रुपयांचा खर्चही येतो. विद्यार्थ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाने नवा हा निर्णय घेतला. आजमितीस वर्षाला सुमारे पंधरा हजार विद्यार्थी शैक्षणिक कागदपत्रे सांक्षाकित करण्यासाठी विद्यापीठाकडे अर्ज करीत असतात. या सर्वांना याचा फायदा होणार आहे.
या सुविधेअंतर्गत विद्यार्थ्यांना तीन ते चार दिवसांत कागदपत्रे आॅनलाइन साक्षांकित करून दिली जातील. तसेच पुढील प्रक्रियाही मुंबई विद्यापीठामार्फत केली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची सत्यता तपासणी आणि चौकशीतून विद्यार्थ्यांची सुटका होईल. मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करून परदेशात स्थायिक विद्यार्थ्यांनाही या सुविधेचा लाभ घेता येईल. या निर्णयाची अंमलबजावणी विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग करेल. यासाठी संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक उपलब्ध करून दिली जाईल.
दरम्यान, विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे आॅनलाइन साक्षांकित करून द्यावीत, अशी मागणी करत युवा सेनेने याबाबत पाठपुरावा केला होता. मागणी मान्य झाल्याने आता विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया सिनेट व अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली.


विद्यार्थी केंद्रबिंदू लक्षात ठेवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण तसेच नोकरीसाठी लागणारी शैक्षणिक कागदपत्रे आॅनलाइन साक्षांकित करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. या निर्णयामुळे वेळेची बचत तर होईलच शिवाय कमीत कमी खर्चात विद्यार्थ्यांना घरबसल्या ही सुविधा उपलब्ध होईल.
- प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

Web Title:  Attested academic documents for students to receive housing; Important decision of the University of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.