अरुण बोंगीरवार पुरस्कार विजेत्या दोन अधिकाऱ्यांना प्रत्येकी १ लाख देणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 18:49 IST2019-03-19T18:24:14+5:302019-03-19T18:49:39+5:30
गेल्या ५ वर्षांत उल्लेखनीय कार्य असतानाही अद्याप कोणत्याही राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय सरकारी पुरस्कारांनी ज्यांना गौरवण्यात आलेले नाही अशा दोन अधिका-यांना अरुण बोंगीरवार उत्कृष्ट प्रशासकीय लोकसेवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

अरुण बोंगीरवार पुरस्कार विजेत्या दोन अधिकाऱ्यांना प्रत्येकी १ लाख देणार
मुंबई : गेल्या ५ वर्षांत उल्लेखनीय कार्य असतानाही अद्याप कोणत्याही राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय सरकारी पुरस्कारांनी ज्यांना गौरवण्यात आलेले नाही अशा दोन अधिका-यांना अरुण बोंगीरवार उत्कृष्ट प्रशासकीय लोकसेवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. १८ मे रोजी (अरुण बोंगिरवार यांच्या जयंतीदिनी) मुंबईत एका समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख २० मार्च आहे.
विजेत्यांना व्यावसायिक संस्थेद्वारे विशेष प्रशिक्षिणही दिले जाणार आहे. विजेत्यांच्या चांगल्या कार्याचा प्रचार करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयोगाची माहिती यशदाच्या माध्यमातून राज्यभर दिली जाणार आहे असे या समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. याबाबतची विस्तृत माहिती, अर्ज यशदाच्या संकेतस्थळावर आहे. समाजासाठी धोरण तयार करताना विज्ञान, तंत्रज्ञानाचा वापर करताना सार्वजनिक निधीच्या अडथळ्यांवर किंवा प्रशासकीय क्षमतेच्या मर्यादांवर मात करुन व्यावहारिक व नाविन्यपूर्ण गोष्टी करण्यात पुढाकार घेतलेले अधिकारी यात पात्र ठरतील.
गरीब लोकांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणारे प्रयोग, कचरा पृथक्करण आणि रिसायकलिंग वाढविणे, वन क्षेत्र वाढवणे, किंवा जैवविविधतेसाठी कार्य करणारे तसेच आर्थिक, पर्यावरणीय, सामाजिक किंवा अशा कोणत्याही संकेतकांचा वापर करून प्रभावी मापनक्षम निर्माण करु शकलेले अधिकारी यात सहभागी होऊ शकतील.
प्रेस, एनजीओ, लोक नियुक्त प्रतिनिधी अशांनी अधिका-यांच्या केलेल्या कामाचे कौतुक किंवा त्यांच्या कामावर लिहीलेले वृत्त, माहिती अर्ज करणारे अधिकारी जूरीच्या संदर्भासाठी देऊ शकतात. स्थानिक ग्राम पंचायत, संयुक्त वन व्यवस्थापन समिती किंवा महानगरपालिका यासारख्या कायमस्वरूपी संस्थेच्या मूलभूत कार्यपध्दतीत सुधारणा करण्यासाठी केलेले काम, शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये सुधारणा करण्यासाठी घेतलेले निर्णय व त्याची अंमलबजावणी, पर्यावरणीय संरक्षण आणि विकासाची गरज संतुलित करताना स्थानिक लोकांच्या उपजीविकेसाठी केले जाणारे विशेष कार्य देखील पुरस्कारासाठी विचारात घेतले जाणार आहे.
या पुरस्काराच्या ज्युरी मंडळात मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख, जेएसडब्ल्यू फाउंडेशन अध्यक्ष संगीता जिंदाल, ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर, यशदाचे महानिदेशक आनंद लिमये यांचा समावेश आहे.