घरेलू कामगारांकडून आंदोलनाची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 05:47 AM2018-10-04T05:47:21+5:302018-10-04T05:47:41+5:30

सिटूचा निर्धार : सामाजिक सुरक्षेसाठी लढा देणार!

Announcement of agitation by domestic workers | घरेलू कामगारांकडून आंदोलनाची घोषणा

घरेलू कामगारांकडून आंदोलनाची घोषणा

Next

मुंबई : घरेलू कामगारांना किमान वेतन, आठवड्याची सुट्टी आणि सामाजिक सुरक्षितता मिळण्यासाठी तीव्र लढा करण्याचा निर्धार सी.आय.टी.यू. (सिटू) संघटनेच्या नुकत्याच पार पडलेल्या राज्य अधिवेशनात करण्यात आला आहे. सिटू संलग्न महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांतील घर कामगार संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे दुसरे अधिवेशन पुण्यातील गांधी भवन येथे २८ व २९ सप्टेंबरला पार पडले. या वेळी भविष्यात होणाऱ्या राज्यव्यापी, देशव्यापी आंदोलनाची घोषणा केल्याचे आरमायटी इराणी यांनी मंगळवारी मुंबईत बोलताना सांगितले.

इराणी म्हणाल्या, सोलापूर, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक, बीड, औरंगाबाद, जालना, नागपूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमधून १००हून अधिक प्रतिनिधींनी राज्यातल्या घरकामगारांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. प्रचंड प्रमाणात वाढत असलेल्या महागाईच्या काळात घरकामगारांचे वेतन मात्र कुंठित अवस्थेत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस घरकामगारांमध्ये कुपोषण आणि दारिद्र्याचे प्रमाण वाढत आहे. त्यांच्या मुलांचे शिक्षण व आरोग्यासाठी वेतनातून पैसे उरत नाहीत. परिणामी, किमान वेतन समिती गठित करण्याची मागणी घेऊन तसेच आठवड्याची सुट्टी, पगारी रजा, विमा, पेन्शन आणि कल्याण मंडळाचा कारभार सुधारावा या महत्त्वाच्या मागण्यांसाठी येत्या काळात तीव्र लढा उभा करण्याचा निर्धार अधिवेशनात घरकामगारांनी केला.
अधिवेशनाचे उद्घाटन सिटूचे महाराष्ट्र राज्य सचिव कॉम्रेड एम. एच. शेख यांनी केले. असंघटित क्षेत्रातल्या प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचण्याचा निर्णय सिटूने घेतला आहे. घरेलू कामगारांचे संघटन आणि लढ्याला पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. सिटूचे जिल्हा अध्यक्ष कॉ. अजित अभ्यंकर यांनी घरेलू कामगारांनी सरकारच्या तुटपुंज्या कल्याणकारी योजनांवर अवलंबून न राहता, कामगार म्हणून आपले अधिकार मागण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले.

...अशी होणार आंदोलने
आॅक्टोबर महिन्यात जिल्हा पातळीवर मोर्चे, नोव्हेंबर महिन्यात सह्यांची मोहीम, डिसेंबरमध्ये मुंबई मोर्चा आणि ८ व ९ जानेवारी २०१९ ला सर्व कामगार संघटना देशव्यापी संयुक्त संपात सहभागी होण्याची हाक अधिवेशनात देण्यात आली. तसेच प्रत्येक जिल्ह्यात मालक वर्गाला सादर करण्यासाठी वेतन-पत्रक तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील काळातील कामकाजाचे सुसूत्रीकरण करण्यासाठी २१ कार्यकर्त्यांची समिती निवडली असून समितीचे अध्यक्ष या पदावर आरमायटी इराणी, तर कार्याध्यक्ष म्हणून शुभा शमीम यांची निवड एकमताने करण्यात आली.

Web Title: Announcement of agitation by domestic workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई