...अन् नव्वदीतले आजी-आजोबा झाले ‘तरुण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 07:14 AM2018-05-09T07:14:11+5:302018-05-09T07:14:11+5:30

कुठलाही ‘इव्हेंट’ असला की त्यात तरुणाईची गर्दी दिसून येते. युवावर्गासाठी असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि त्यात तरुणाई उत्साहाने सामील झाल्याचे चित्र दिसते. पण ज्येष्ठ नागरिक असलेल्या; विशेषत: वृद्धाश्रमातील मंडळींसाठी असा काही ‘इव्हेंट’ होऊ शकतो का, या प्रश्नाचे उत्तर आता होकारार्थी देता येईल.

 ... and the grandfather of the nineties, 'Tarun' | ...अन् नव्वदीतले आजी-आजोबा झाले ‘तरुण’

...अन् नव्वदीतले आजी-आजोबा झाले ‘तरुण’

Next

- राज चिंचणकर
मुंबई : कुठलाही ‘इव्हेंट’ असला की त्यात तरुणाईची गर्दी दिसून येते. युवावर्गासाठी असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि त्यात तरुणाई उत्साहाने सामील झाल्याचे चित्र दिसते. पण ज्येष्ठ नागरिक असलेल्या; विशेषत: वृद्धाश्रमातील मंडळींसाठी असा काही ‘इव्हेंट’ होऊ शकतो का, या प्रश्नाचे उत्तर आता होकारार्थी देता येईल. याचे कारण म्हणजे ‘आपण आनंदयात्री’ या संस्थेच्या उत्साही कार्यकर्त्यांनी त्यावर केलेले शिक्कामोर्तब! वयोवृद्ध मंडळींना व्यासपीठावर एकत्र आणून, त्यांच्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले.
वय वर्षे ६० ते ९२ म्हणजे ज्येष्ठ ते अतिज्येष्ठ या वर्गात मोडणारी मंडळी! परंतु या मंडळींच्या अंगातही काही सुप्त कलागुण असतात, हे ‘आपण आनंदयात्री’च्या कार्यकर्त्यांनी अचूक हेरले आणि त्यांना थेट एका व्यासपीठावर निमंत्रित केले. रंगीबेरंगी प्रकाशझोत, उत्साहाने भारलेले व्यासपीठ अशा पार्श्वभूमीवर हातात अवचित आलेला ध्वनिक्षेपक पाहून या वयोवृद्ध मंडळींच्या चेहऱ्यावर आनंदाचे व समाधानाचे स्मित उमटले.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमात ८०हून अधिक आजोबा-आजींनी हजेरी लावली. त्यांचा उत्साह पाहून या संस्थेचे कार्यकर्तेही चकित झाले. ‘आनंदोत्सव आनंदयात्रींचा’ या कार्यक्रमाचे औचित्य साधत ‘बेस्ट’ उपक्रमातील काही उत्साही मंडळींनी हा योग जुळवून आणला. यात मुंबई व मुंबईच्या परिसरातील वृद्धाश्रमांमध्ये राहणाºया आजोबा-आजींनी विविध कलाविष्कार सादर करत उपस्थितांना थक्क केले.
नृत्य, संगीत, गायन, वादन, काव्य, अभिनय, चित्रकला, हस्तकला, लाइव्ह-शो असे अनेक कलाप्रकार या मंडळींनी या वेळी आविष्कृत केले. शेफर्ड विडोज (भायखळा), सर जमशेटजी (नागपाडा), आॅल सेंट होम (माझगाव), स्मित (भिवंडी), जीवन आधार (दिवा), आनंद आश्रम (पालघर), साईधाम (कल्याण), मदर तेरेसा (विरार), नर्मदा निकेतन (बेलापूर), श्रद्धानंद आश्रम (वसई) अशा वृद्धाश्रमांतील ज्येष्ठ मंडळी या कार्यक्रमात सहभागी झाली.

‘हेल्पेज इंडिया’चे संचालक प्रकाश बोरगावकर, दिग्दर्शक हेमंत भालेकर, अनिल गवस, रंगकर्मी जयवंत भालेकर, श्रीनिवास नार्वेकर, सिनेदिग्दर्शक बलविंदर सिंग, आमटे परिवारासोबत कार्यरत असणारे व स्वातंत्र्य सैनिक अनंत पाटील यांचे सुपुत्र निर्भय पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी, धावपटू सुधीर भिलारे आदी मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आजी-आजोबांना सन्मानित करण्यात आले. ‘आपण आनंदयात्री’चे प्रमोद सुर्वे, विजय सूर्यवंशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी हा योग जुळवून आणत, ज्येष्ठ मंडळींसमवेत साजरा केलेला एक दिवस या वयोवृद्ध मंडळींच्या आयुष्यात सुखद झुळूक आणणारा ठरला.

Web Title:  ... and the grandfather of the nineties, 'Tarun'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.