‘अमर महल पुला’ची ‘अमर कथा’ संपेना, नऊ महिने पुल बंदच, नागरीक, वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 07:19 AM2017-11-30T07:19:23+5:302017-11-30T07:19:32+5:30

चेंबूरजवळील अमर महल येथे असलेल्या उड्डाणपुलाचे काही सांधे निखळल्याने हा पूल एप्रिल २०१७पासून बंद करण्यात आला. नव्या पुलाचे बांधकाम प्रशासनाने हाती घेतले आहे.

 'Amar Kahle Pula''s 'Amar Katha' is over, nine months of pull-back, citizens, drivers angry | ‘अमर महल पुला’ची ‘अमर कथा’ संपेना, नऊ महिने पुल बंदच, नागरीक, वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी

‘अमर महल पुला’ची ‘अमर कथा’ संपेना, नऊ महिने पुल बंदच, नागरीक, वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी

Next

- अक्षय चोरगे
मुंबई : चेंबूरजवळील अमर महल येथे असलेल्या उड्डाणपुलाचे काही सांधे निखळल्याने हा पूल एप्रिल २०१७पासून बंद करण्यात आला. नव्या पुलाचे बांधकाम प्रशासनाने हाती घेतले आहे. परंतु हे काम कूर्मगतीने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. एप्रिल महिन्यात या पुलाच्या डागडुजीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले. चार महिन्यांत बांधकाम पूर्ण होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले होते, प्रत्यक्षात आठ महिने उलटूनही २० टक्केदेखील काम पूर्ण न झाल्याने नागरिकांसह वाहनचालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
एप्रिल २०१७मध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘पुढील चार महिन्यांत पुलाची डागडुजी करून पूल लोकांसाठी खुला करण्यात येईल,’ असे आश्वासन लोकांना दिले होते.
पुलाचे दोन सांधे निखळल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पुलावरील एका बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी संपूर्ण पुलाची पाहणी केली असता, त्यांना ही बाब गंभीर असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पुलावरील एका बाजूची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. अजूनही या पुलावर केवळ एका मार्गानेच वाहतूक सुरू आहे.
हा पूल पूर्व द्रुतगती महामार्गावरील महत्त्वाचा पूल आहे. मुंबईतून ठाणे, नाशिकच्या दिशेने याच पुलावर रोज हजारो वाहने ये-जा करतात. मात्र, एक बाजू पूर्णपणे बंद असल्याने येथे रहदारीच्या वेळी प्रचंड वाहतूककोंडी होते. अवजड वाहनांना पुलावरून जाण्यास बंदी असल्याने तेदेखील पर्यायी मार्गाचा वापर करतात. त्यामुळे सब-वेवरही वाहनचालकांना कोंडीचा सामना करावा लागतो.

वाहनचालकांना फटका
अमर महल पूल बंद झाल्याने संध्याकाळच्या सुमारास ठाण्याकडे जाणाºया मार्गावर लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे रोजच अभूतपूर्व कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागतो. अमर महल ते चेंबूर नाका हे पाच ते दहा मिनिटांचे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना सध्या तब्बल ४५ मिनिटे लागतात.

हे पर्यायी मार्ग वापरा
अमर महल पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने वाहतूककोंडी होऊ नये, म्हणून वाहतूक पोलिसांनी वाहनांना खालील पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु या मार्गांवरही मोठ्या प्रमाणात कोंडी होते.

च्वडाळा फ्री वे छेडा नगर मार्गे
च्सांताक्रुझ-चेंबूर जोड रस्ता छेडा नगर मार्गे
च्सुमन नगर-चेंबूर नाका, मानखुर्द छेडा नगर मार्गे
च्सुमन नगर-चेंबूर नाका, गोवंडी छेडा नगर मार्गे
च्सायन धारावी-एलबीएस मार्ग ते घाटकोपर-अंधेरी जोड रस्ता

पुलावरील केवळ एका बाजूने वाहतूक सुरू आहे. तर अर्ध्या पुलाचा बराचसा भाग पाडण्यात आला आहे. वाहने आणि प्रवाशांची संख्या पाहता उर्वरित पुलाचे काम तातडीने होणे गरजेचे आहे.

वाहतुकीमुळे कामाला अडथळा
एकीकडे वाहतूक चालू आहे; आणि दुसरीकडे अमर महल पुलाचे काम. त्यात परिसरातील प्रचंड वाहतूककोंडीची भर आहे. अशा अवस्थेत पुलाच्या डागडुजीच्या कामाची गती अत्यंत कमी आहे. त्यामुळे दिलेल्या वेळेपेक्षा जास्त कालावधी होऊनही काम अद्याप पूर्णत्वास गेले नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाºयाने सांगितले.

पुलासाठी विशिष्ट तंत्रज्ञान
हा पूल १९९५ साली बांधला आहे. पूल बांधताना विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यात पुलाचे वेगवेगळ्या भागांमध्ये बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे पुलाच्या ज्या भागातील सांधे निखळले आहेत त्या भागाचीच डागडुजी करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे पुलाच्या डागडुजीला फार अवधी लागणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

चालत जाणेच सोयीचे
अमर महल परिसरातील नागरिक रिक्षा, टॅक्सी, बस अथवा इतर कोणतेही खासगी वाहन वापरणे बंद करू लागले आहेत. येथील नागरिक दररोजच्या वाहतूककोंडीपेक्षा काही अंतर चालत जाणे अधिक पसंत करतात. मात्र त्यात ज्येष्ठ नागरिकांचे जास्त हाल होतात.

मानखुर्द, घाटकोपर, विक्रोळी, सांताक्रुझ, सायन येथील कोणत्याही भागातील एखाद्या व्यक्तीस इच्छुक ठिकाणापर्यंत पोहोचायचे झाल्यास अमर महल पूल हा मोठा अडसर आहे. या वाहतूक परिसरातून जायचे असल्यास प्रवासी घेण्यास रिक्षाचालकांचीही नेहेमीच नकारघंटा असते, अशी व्यथा प्रवासी मांडतात.

आॅन ड्युटी २४ तास
अमर महल परिसरातील वाहतूककोंडी लक्षात घेता २४ तास पूल परिसरात वाहतूक पोलीस तैनात केलेले असतात. वाहतूककोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, वाहनांना मार्गदर्शन करण्यासाठी चार ते सहा पोलीस येथे उभे असतात. अनेकवेळा वाहतूककोंडीत अडकलेले वाहनचालक अथवा प्रवाशांमध्ये तंटे होतात. पोलिसांना त्यात हस्तक्षेप करत भांडणे सोडवावी लागतात.

क्रेन कोसळण्याची घटना
पुलाचे काम सुरू केल्यानंतर २९ जुलै रोजी एक क्रेन पुलावरून खाली कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदाराला नोटीस पाठवली होती.

पाठपुरावा, पण प्रतिसाद नाही!
अमल महल पुलाचे काम महापालिकेकडे नसल्याने मी त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. तरीही काम पूर्ण होत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मी अनेकदा पाठपुरावा केला आहे. मात्र पुलाचे काम पूर्ण होण्यास अजून एक वर्ष लागेल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे. विभागाशी पत्रव्यवहारही केला, परंतु पत्राचे अद्याप उत्तर मिळालेले नाही.
- सुशम सावंत, नगरसेवक


या भागातली वाहतूककोंडी नित्याचीच आहे. सुरुवातीला खूप मनस्ताप होत होता, अजूनही होत आहे. परंतु लोकांना आता याची सवय झाली आहे. आसपासच्या परिसरातील लोक घरातून निघतानाच अधिक वेळ लागणार याची पूर्वकल्पना असल्याने घरातून थोडे लवकर निघतात. संबंधित विभागाने पूल लवकर बांधावा.
- जयदीप पांडे, प्रवासी

दररोज अमर महल पुलाजवळच्या सिग्नलजवळ आलो, की रिक्षा बंद करून फक्त वाट पाहण्याचे काम करतो. किमान पंधरा मिनिटे येथे जातात. गेल्या सात-आठ महिन्यांपासून काम सुरू आहे,
परंतु पूल अद्याप उभारलेला नाही. लवकरच काम होईल अशी आशा आहे.
- विनय डांगे, रिक्षाचालक

पुलाचे काम धिम्या गतीने
विभागात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. प्रशासनाचा कारभार खूपच धिम्या गतीने होत असल्याचा फटका नागरिक भोगत आहेत. पुलाचे बांधकाम करणाºया कंत्राटदाराला आणि बांधकाम विभागाला याबाबत जाब विचारणे आवश्यक आहे. - हरिद्वार साहनी, प्रवासी

दिवसभर येथे वाहतूककोंडी असते. मानखुर्द, घाटकोपर, सांताक्रुझ, दादर या ठिकाणांकडे जाणारी वाहने तसेच मुंबईबाहेर जाणाºयांसाठीसुद्धा येथून जावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. एक मिनिटही वाहतूक पोलिसांना येथून हलता येत नसल्याने आमचे हाल होतात.
- हनुमंत वाक्षे, वाहतूक पोलीस

या विभागात प्रवासी घेऊन जाणे आम्हा रिक्षाचालकांसाठी जिकिरीचे झाले आहे. प्रवाशांसोबत आम्ही चालकही वैतागलो आहोत. अनेकदा दहा ते पंधरा मिनिटांचे अंतर जाण्यासाठी पाऊण तास लागतो तसेच मीटरचे भाडेही वाढते, त्यामुळे प्रवासी अनेकवेळा आमच्यावर चिडतात. परंतु पाऊण तास कोंडीत अडकल्यानंतर आम्ही तरी काय करणार?
- प्रमोद शिंदे, रिक्षाचालक

Web Title:  'Amar Kahle Pula''s 'Amar Katha' is over, nine months of pull-back, citizens, drivers angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई