एअर इंडियाने केलेली वैमानिक, विमान कर्मचाऱ्याची बडतर्फी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 05:40 AM2019-02-28T05:40:18+5:302019-02-28T05:40:20+5:30

हायकोर्ट : विनाचौकशी बडतर्फीचा नियम घटनाबाह्य

Air India pilot, crew member suspension cancle | एअर इंडियाने केलेली वैमानिक, विमान कर्मचाऱ्याची बडतर्फी रद्द

एअर इंडियाने केलेली वैमानिक, विमान कर्मचाऱ्याची बडतर्फी रद्द

Next

मुंबई : सहवैमानिक जितेंद्र कृष्ण वर्मा आणि विमान कर्मचारी (केबिन क्रू) मयंक मोहन शर्मा यांना सेवेतून तडकाफडकी बडतर्फ करण्याची एअर इंडियाने केलेली कारवाई उच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवून रद्द केली.


वर्मा यांना २५ मार्च २०११ पासून तर शर्मा यांना ४ मे २०१५ पासून बडतर्फ केले होते. त्याविरुद्ध दोघांनी केलेल्या रिट याचिका मंजूर करून न्या. भूषण गवई व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाने त्यांची बडतर्फी रद्द केली. या दोघांनाही बडतर्फीच्या तारखेपासूनचे सेवासातत्य कायम ठेवून पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे आणि त्यांना दरम्यानच्या काळाचा ५० टक्के पगारही द्यावा, असा आदेश खंडपीठाने दिला. एअर इंडियाने त्यांच्या सेवा नियमांमधील (स्टँडिंग आॅर्डर) नियम क्र. १७ चा आधार घेऊन वर्मा व शर्मा यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली होती. त्यात कोणतेही कारण न देता व खातेनिहाय चौकशी न करता कर्मचाऱ्यास तडकाफडकी सेवेतून काढून टाकण्याचा अधिकार व्यवस्थापनास आहे. मात्र हा नियम कर्मचाऱ्यांना नैसर्गिक न्याय नाकारणारा असल्याने न्यायालयाने तो घटनाबाह्य ठरवून रद्द केला. विशेषत: एअर इंडियासारख्या सरकारी विमान कंपनीत व्यवस्थापनास असा ‘हायर अ‍ॅण्ड फायर’चा मनमानी अधिकार देणारा सेवानियम असू शकत नाही, असे खंडपीठाने नमूद केले.


या सुनावणीत वर्मा यांच्यासाठी अ‍ॅड. अशोक डी. शेट्टी यांनी, शर्मा यांच्यासाठी अ‍ॅड. मोहन बिर सिंग यांनी, एअर इंडियासाठी ज्येष्ठ वकील सुधीर तलसानिया यांनी तर भारत सरकारसाठी अ‍ॅड. नीता मसूरकर यांनी काम पाहिले.

बडतर्फीची तकलादू कारणे
सहवैमानिक वर्मा २० वर्षे एअर इंडियाच्या सेवेत होते. नोकरीस लागताना सादर केलेला वैमानिकाचा दाखला त्यांनी लबाडी व फसवणुकीने मिळविल्याच्या आरोपावरून त्यांना नोकरीतून काढले गेले. मात्र याची खातेनिहाय चौकशी केली गेली नाही किंवा वर्मा यांना स्वत:ची बाजू मांडण्याची संधीही दिली गेली नाही.
च्शर्मा हे ‘एअर इंडिया केबिन क्रू संघटनेचे सक्रिय सदस्य आहेत. सुरक्षा नियमांचे पालन केले जात नसल्याचा विषय त्यांनी संघटनेमार्फत लावून धरला होता. त्यामुळे त्यांच्यावर आकसाने ही कारवाई केली गेली. विमान कर्मचाºयास दोन ड्युटींमध्ये किमान सलग २२ तासांची विश्रांती देण्याचा सुरक्षा नियम आहे. याचे उल्लंघन करून ३० एप्रिल २०१५ रोजी त्यांना जेद्दा-मुंबई विमानात ड्युटी लावली गेली. नियमावर बोट ठेवून शर्मा ड्युटीवर गेले नाहीत. वैमानिकाने त्यांना जेद्दा येथे मागे ठेवून एका कमी विमान कर्मचाºयासह ती फ्लाईट केली. नंतर ड्युटी करण्यास नकार दिल्याचा ठपका ठेवून शर्मा यांना बडतर्फ केले गेले.

Web Title: Air India pilot, crew member suspension cancle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.