महाराष्ट्रातील नव्या राजकीय प्रयोगात अहमद पटेल यांचे महत्त्वाचे योगदान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 01:28 AM2020-12-15T01:28:57+5:302020-12-15T01:29:22+5:30

सर्वपक्षीय शोकसभेत राज्यातील दिग्गजांनी वाहिली शब्दसुमने

Ahmed Patel's significant contribution to the new political experiment in Maharashtra | महाराष्ट्रातील नव्या राजकीय प्रयोगात अहमद पटेल यांचे महत्त्वाचे योगदान

महाराष्ट्रातील नव्या राजकीय प्रयोगात अहमद पटेल यांचे महत्त्वाचे योगदान

Next

मुंबई : काँग्रेस पक्षाचे संकटमोचक, सत्तेच्या केंद्रस्थानी राहूनही सत्ता पदांपेक्षा संघटनेच्या कामात रमणारे, पडत्या काळात पक्ष संघटनेची काळजी वाहणारा, सत्ता आणि संघटनेतील दुवा, सोनिया गांधी यांचे विश्वासू सहकारी.. या सर्व विशेषणांना समानार्थी बनलेले काँग्रेसचे नेते दिवंगत अहमद पटेल यांच्या व्यक्तीत्वाचे विविध पैलू सोमवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात उलगडले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नव्या राजकीय प्रयोगात निर्णायक क्षणी अहमद पटेल यांनी महत्वाची भूमिका बजावल्याची कबुली काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या शीर्षस्थ नेतृत्वाने दिली. तसेच पटेलांचे पुत्र फैझल आणि कन्या मुमताज यांची भेट घेत संवेदना प्रकट केल्या.
अहमद पटेल यांना आदरांजली वाहण्यासाठी  प्रदेश काँग्रेस आणि मुंबई विभागीय काँग्रेसने आयोजित केलेल्या शोकसभेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेश प्रभारी एच.के.पाटील, महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, महिला व बाल कल्याणमंत्री यशोमती ठाकूर, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, मंत्री छगन भुजबळ, मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री सतेज पाटील, माजी मंत्री नसिम खान यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गीतकार जावेद अख्तर,  अभिनेते - दिग्दर्शक संजय खान, ज्येष्ठ अभिनेत्री  शबाना आझमी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. मान्यवरांनी यावेळी अहमद पटेल यांच्या प्रतिमेवर फुले वाहून आदरांजली वाहिली. लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी 'दर्डा' परिवाराच्यावतीने पटेल यांना आदरांजली वाहिली. यावेळी  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, गीतकार जावेद अख्तर, मंत्री अमित देशमुख आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

काही क्षणी अनपेक्षितपणे सामोरे जावे लागते. काँग्रेस पक्षाचे नेते अहमद पटेलांचे निधन ही तशीच एक घटना आहे. जेंव्हा आमच्यात राजकीय मतभेद होते, तेव्हा आम्ही वेगळे होतो; आता आमचे नवे राजकीय नाते जुळले असताना अहमदभाई आपल्याला सोडून गेले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
-उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री 

राजीव गांधी यांच्या काळात अहमद पटेल काही काळ सत्ताकारणात होते. पण, त्यांचे मन, स्वभाव हा पक्षात काम करण्याचा होता. त्यांनी संपूर्ण आयुष्य संघटनेसाठी काम केले. शांत, प्रसिद्धीचा मोह नाही. संकटातूम मार्ग काढणारे, असे अहमद पटेल होते.  
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

अहमद पटेल यांचे देशाच्या राजकारणात त्यांचे आगळेवेगळे स्थान होते. पक्षाच्या पलीकडे जात सर्वांशी त्यांचे चांगले संबंध होते. दोनवेळा आमची भेट झाली होती. त्यांचे बोलणे आणि वागणे अतिशय साधे होते.
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा
 

Web Title: Ahmed Patel's significant contribution to the new political experiment in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.