नरसिंग यादव प्रकरणानंतर मी अधिक सावध झालो- वीरधवल खाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 10:00 PM2018-03-21T22:00:26+5:302018-03-21T22:24:33+5:30

आहाराविषयी घेतोय अधिक काळजी

After Narsimha yadav case i become more alert says swimmer virdhawal khade | नरसिंग यादव प्रकरणानंतर मी अधिक सावध झालो- वीरधवल खाडे

नरसिंग यादव प्रकरणानंतर मी अधिक सावध झालो- वीरधवल खाडे

googlenewsNext

रोहित नाईक: मी जेव्हा कधी बाहेर जातो तेव्हा स्वत:साठी पाणी सोबत घेऊन जातो. बाहेर कोणी खायला दिले, तर सहसा खात नाही. गेल्या आॅलिम्पिकदरम्यान नरसिंग यादवसोबत झालेल्या घटनेनंतर मी अधिक सावध झालो असून माझ्या आहाराकडे मी खूप गांभिर्याने लक्ष देतो,’ अशी प्रतिक्रिया भारताचा स्टार जलतरणपटू वीरधवल खाडे याने ‘लोकमत’कडे दिली. 

नुकताच झालेल्या ४९व्या सिंगापूर राष्ट्रीय वयोगट जलतरण स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्य अशी दोन पदकांची कमाई करुन भारतात परतलेल्या वीरधवलने बुधवारी ‘लोकमत’शी संवाद साधला. उत्तेजक द्रव्य चाचणीत अडकू नये यासाठी जास्त काळजी घेत असल्याचे म्हणत वीरधवलने सांगितले की, ‘मी माझ्या आहारावर गांभिर्याने लक्ष देत आहे. माझ्या अत्यंत विश्वासातल्या व्यक्तीशिवाय इतर कोणाकडूनही मी कोणत्याही पदार्थाचे सेवन करत नाही. गेल्या ऑलिम्पिकदरम्यान मल्ल नरसिंग यादवसोबत झालेली दुर्दैवी घटना आपण पाहिली. या प्रकरणातून एक धडा मिळाला आहे. भारतात अशा गोष्टीही घडत असल्याने सावध रहावे लागते. त्यामुळे केवळ स्पर्धेच्यावेळीच नाही, तर वर्षभर मी आहारावर खूप लक्ष देत आहे. स्वत:ची पाण्याची बाटलीही मी दुसºया व्यक्तीकडे सोडून जात नाही. मी सुरुवातीपासूनच अशा गोष्टींबाबत सावध होतो, पण नरसिंग प्रकरणानंतर अधिक सजग झालोय.’ 

सिंगापूर स्पर्धेविषयी वीरधवल म्हणाला की, ‘ या स्पर्धेचा अनुभव खूपच चांगला होता आणि वैयक्तिकरीत्या आत्मविश्वास खूप वाढला आहे. गतवर्षानंतर ही पहिलीच मोठी स्पर्धा होती. वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत नोंदवलेल्या वेळेत खूप सुधारणा झाल्याचा आनंद आहे. यामुळे मागच्या तुलनेत यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत नक्कीच यशस्वी कामगिरी होईल असा विश्वास वाटतो.’ जलतरण स्पीडोस्टार वीरधवल पुढे म्हणाला की, ‘या स्पर्धेत आणि याआधीच्या स्पर्धांमध्ये खूप फरक होता. माझ्या ५० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात सिंगापूरचे काही अव्वल खेळाडू सहभागी होते आणि त्यांना मी नमविले. त्यामुळे एकप्रकारे माझ्यासाठी एक स्पर्धक कमी झाल्याचे म्हणण्यास हरकत नाही. त्याशिवाय आॅस्टेÑलियन, ब्रिटिश, दक्षिण आफ्रिकी असे बरेच जलतरणपटू आहेत त्यांचे आव्हान आता समोर असेल. त्यांच्या वैयक्तिक वेळेनुसार माझी कामगिरी सुधारण्याचा सध्या प्रयत्न करत आहे. जर मी माझ्या कामगिरीतील अर्धा सेकंद जरी कमी करण्यात यश मिळवले तरी अव्वल ५ स्थानांमध्ये येऊ शकतो.’ 

बंगळुरु येथे नव्याने उभे राहिलेल्या पदुकोण - द्रविड अकादमीमध्ये वीरधवल सराव करीत आहे. याविषयी तो म्हणाला, ‘येथे आॅलिम्पिक दर्जाचे पूल आणि डायव्हिंग ब्लॉक उपलब्ध असल्याने खेळाडूंना निश्चित याचा फायदा होतो. मी अजूनही इतर खेळाडूंच्या तुलनेत डायव्हिंगमध्ये मागे पडतोय, जर का यामध्ये मी सुधारणा केली तर नक्की मोठ्या स्पर्धांमध्ये पदक मिळणे शक्य होईल.’

 प्रायोजक मिळणे गरजेचे..
‘कोणत्याही खेळातील खेळाडूसाठी प्रायोजक मिळणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे खेळाडूंवरील आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होतो. सहा महिन्यांपूर्वी वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान प्रायोजक नसल्याने मी आॅनलाइन शॉपिंगद्वारे सर्वात स्वस्तातले आवश्यक साहित्य मागवून घेतले होते आणि त्यावर राष्ट्रीय स्पर्धा खेळलो. त्यामुळे प्रायोजक मिळाल्याने खेळाडूंचा खूप मोठा भार कमी होतो. आगामी स्पर्धांसाठी माझा सराव बंगळुरुमध्येच राहिल. त्यात मध्येमध्ये स्वत:ला पारखण्यासाठी काही आंतराराष्ट्रीय स्पर्धांत सहभागी होईन. तसेच ऑलिम्पिकआधी एखादा चांगला प्रायोजक मिळाला, तर विदेशात सरावासाठी जाण्याचा विचार आहे, असेही वीरधवलने यावेळी सांगितले. 

पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांचे अभिनंदन. अशा पुरस्कारांमुळे युवा खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो. याआधी केवळ मर्यादित खेळानांच वाव मिळतो असे वाटंत होते, पण आज चित्र बदलले आहे. त्यामुळे युवा खेळाडूंनी आणि त्यांच्या पालकांनी या पुरस्कारातून प्रेरणा घ्यावी. 
- वीरधवल खाडे.
 

Web Title: After Narsimha yadav case i become more alert says swimmer virdhawal khade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.