मुंबईत दरडींचे भय कायम; पालिकेकडून उपाययोजना नाही, रहिवाशांचा जीव मुठीत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 09:39 AM2024-04-15T09:39:27+5:302024-04-15T09:41:24+5:30

घाटकोपर येथील शुक्रवारी झालेल्या भूस्खलनाच्या घटनेनंतर मुंबईतील डोंगर उतारावरील झोपड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

after landslide incident in ghatkopar the issue of slum on hill slopes in mumbai has come to the fore | मुंबईत दरडींचे भय कायम; पालिकेकडून उपाययोजना नाही, रहिवाशांचा जीव मुठीत

मुंबईत दरडींचे भय कायम; पालिकेकडून उपाययोजना नाही, रहिवाशांचा जीव मुठीत

मुंबई :घाटकोपर येथील शुक्रवारी झालेल्या भूस्खलनाच्या घटनेनंतर मुंबईतील डोंगर उतारावरील झोपड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घाटकोपर येथील असल्फा व्हिलेज, शीव येथील ॲण्टॉप हिल, चेंबूर-वाशीनाका, भांडुप, चुनाभट्टी- कुर्ल्यातील कसाईवाडा आदी ठिकाणच्या डोंगरांवर हजारो झोपड्या वसल्या आहेत. पालिका तसेच संबंधित यंत्रणांकडून या झोपड्यांबाबत ठोस उपाययोजना करण्यात येत नाहीत. त्यामुळे तेथील रहिवाशांना दरडींच्या छायेत जीव मुठीत घेऊन राहावे लागते. 

मुंबईत दरडी कोसळण्याची २७९  ठिकाणे असून, त्यातील ७५ ठिकाणे धोकादायक, तर ४५ ठिकाणेही अतिधोकादायक असल्याचे मागील वर्षी पालिकेने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. या ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याचे काम सुरू आहे. डोंगरउतारावर राहणाऱ्या रहिवाशांना नोटिसा बजवाव्यात व सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्याचे निर्देश आयुक्तांनी बैठकीत दिले. मात्र, त्यानंतर दोन दिवसांतच घाटकोपर येथे भूस्खल झाले.

अखेर ‘त्या’ झोपड्या जमीनदोस्त -

घाटकोपरच्या भूस्खलनाच्या घटनेनंतर डोंगर उतारावर असणाऱ्या सात झोपड्या शनिवारी पालिकेकडून जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. तेथे राहणाऱ्या जवळपास ३२ रहिवाशांचे पालिकेकडून जवळच्याच पालिका शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान डोंगर उतारावरील या झोपड्या अनधिकृतपणे बांधण्यात आल्या होत्या. 

पालिकेकडून फक्त कागदी घोडे -

दरडी कोसळून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी डोंगरांवर संरक्षक भिंती बांधल्या जात आहेत. संबंधित यंत्रणांकडून त्यासाठी कोट्यवधींच्या निधीची तरतूद केली जाते. पावसाळ्यात पालिका अधिकाऱ्यांकडून तेथील झोपड्यांवर नोटीस चिटकवण्याव्यतिरिक्त कोणतीच ठोस उपाययोजना केली जात नाही. तर, पावसाळ्यानंतर कोणीही फिरकत नसल्याच्या तक्रारी रहिवासी करतात.
या भागातील रहिवाशांना आपत्कालीन प्रसंगाला तोंड देण्यासंदर्भात प्रशिक्षण दिले तरी अचानक येणाऱ्या या संकटामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे डोंगर उतारांवरील या झोपड्यांना संरक्षण देण्यासाठी पालिकेने ठोस धोरण आखण्याची मागणी सामाजिक संघटना करत आहेत.

Web Title: after landslide incident in ghatkopar the issue of slum on hill slopes in mumbai has come to the fore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.