यंदा 'ईद'ला रसिक दरबारी सलमानची गैरहजेरी!

By संजय घावरे | Published: April 10, 2024 08:05 PM2024-04-10T20:05:44+5:302024-04-10T20:05:59+5:30

मागील बऱ्याच वर्षांपासून सणासुदीला बिग बजेट सिनेमे रिलीज करण्याचा हिंदी सिनेसृष्टीत ट्रेंड आहे.

Absence of courtier Salman khan picture at this year's Eid | यंदा 'ईद'ला रसिक दरबारी सलमानची गैरहजेरी!

यंदा 'ईद'ला रसिक दरबारी सलमानची गैरहजेरी!

मुंबई: मागील बऱ्याच वर्षांपासून सणासुदीला बिग बजेट सिनेमे रिलीज करण्याचा हिंदी सिनेसृष्टीत ट्रेंड आहे. काही मोठ्या कलाकारांनी जणू वर्षातील मोठे सण वाटूनच घेतले आहेत. यापैकी रमजान ईद म्हटली की सलमान खान म्हणजेच 'भाईजान'चा सिनेमा हे समीकरण ठरलेले होते. यंदाची ईद मात्र त्याला अपवाद ठरली आहे. या 'ईद'ला सलमान रसिक दरबारी गैरहजर राहणार आहे.

मागील १५ वर्षांमध्ये कोरोनाची दोन वर्षे आणि २०१३ वगळता दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर सलमानच्या बिग बजेट सिनेमांनी हजेरी लावली आहे. प्रेक्षकांनीही सलमानच्या सिनेमांना भरभरून प्रतिसाद दिला आहे. मागच्या वर्षी सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट बॅाक्स आॅफिसवर रिलीज झाला होता, हा चित्रपट अपेक्षेनुसार कमाई करू शकला नव्हता. याखेरीज 'टायगर ३'मध्ये तो कतरीना कैफसोबत दिसला. शाहरुख खानच्या 'पठाण'मधील त्याचा कॅमिओही प्रेक्षकांना भावला. ईद तर सोडाच, पण यंदा सलमानचा एकही सिनेमा प्रदर्शित होणार नाही. मागील १५ वर्षांमध्ये सलमानच्या ११ चित्रपटांनी ईदला प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित केला. यात 'दबंग', 'बॅाडीगार्ड', 'एक था टायगर', 'किक', 'बजरंगी भाईजान', 'सुलतान', 'ट्युबलाईट', 'रेस ३', 'भारत' आणि 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटांचा समावेश आहे.

या सर्वच चित्रपटांनी पहिल्या दिवशी कोट्यवधींची कमाई केली आहे. सलमानच्या चाहत्यांना यंदा ईदला आपल्या आवडत्या कलाकाराची नक्कीच उणीव भासणार असली तरी दोन तगडे सिनेमे त्यांच्या भेटीला येणार असल्याने भरपूर मनोरंजन होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

यंदा ईदला अजय देवगणचा 'मैदान' आणि अक्षय कुमार, टायगर श्रॅाफ यांचा 'बडे मियां छोटे मियां' हे दोन बिग बजेट सिनेमे रिलीज होणार आहेत. दोन्ही चित्रपटांकडून प्रचंड अपेक्षा आहेत. 'मैदान' हा चित्रपट १९६२ मध्ये सुवर्ण पदक विजेत्या फुटबॅाल संघाचे प्रशिक्षक सैयद अब्दुल रहीम यांच्या संघर्षाची कहाणी सांगणारा आहे. 'बडे मियां छोटे मियां' हा अली अब्बास जफर दिग्दर्शित मसाला एन्टरटेनर आहे.

वर्ष - चित्रपट - पहिल्या दिवसाची कमाई - एकूण व्यवसाय  
२०१० - दबंग - १४.५० कोटी - २२१.१४ कोटी 
२०११ - बॅाडीगार्ड - २१.६० कोटी - २५२.९९ कोटी 
२०१२ - एक था टायगर - ३२.९३ कोटी - ३३५ कोटी 
२०१४ - किक - २६.४० कोटी - ४०२ कोटी 
२०१५ - बजरंगी भाईजान - २७.२५ कोटी - ९६९.०६ कोटी 
२०१६ - सुलतान - ३६.५४ कोटी - ६२३.३३ कोटी 
२०१७ - ट्युबलाईट - २१.१५ कोटी - २११.१४ कोटी 
२०१८ - रेस ३ - २९.१७ कोटी - ३०३ कोटी 
२०१९ - भारत - ४२.३० कोटी - ३२५.५८ कोटी 
२०२३ - किसी का भाई किसी की जान - १५.८१ कोटी - १८२.४४ कोटी

Web Title: Absence of courtier Salman khan picture at this year's Eid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.