महाराष्ट्रातला मराठी माणूस दिल्लीकरांना धडा शिकवेल, कन्हैय्या कुमार यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 02:11 PM2023-10-29T14:11:48+5:302023-10-29T14:15:08+5:30

काँग्रेसमध्ये आल्यापासून भाजपचं आमच्यावरचं प्रेम खूप वाढलं आहे. पण ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकरला शेन वॉर्नची फिरकी खेळण्याची सवय झाली होती, त्याचप्रमाणे मलाही जय शाह यांच्या वडिलांची गुगली खेळता येते, असा टोलाही त्यांनी हाणला.

A Marathi man from Maharashtra will teach a lesson to Delhiites, says kanhaiya kumar | महाराष्ट्रातला मराठी माणूस दिल्लीकरांना धडा शिकवेल, कन्हैय्या कुमार यांचा हल्लाबोल

महाराष्ट्रातला मराठी माणूस दिल्लीकरांना धडा शिकवेल, कन्हैय्या कुमार यांचा हल्लाबोल

मुंबई : महाराष्ट्राची भूमी ही संत महात्म्यांची भूमी आहे. ज्या वेळी देशभरात इंग्रजांविरुद्ध ब्र काढण्याचीही कोणाची प्राज्ञा नव्हती, त्या वेळी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,’ ही गर्जना महाराष्ट्रातूनच देशभरात दुमदुमली होती. वीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूरवीरांची ही भूमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी विचारांच्या या भूमीतील मराठी माणसांना गृहित धरण्याचं काम केंद्रातील आणि राज्यातील सरकार करत आहे. पण मराठी माणूस यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. याच धास्तीपोटी हे सरकार निवडणुका घेत नसल्याचे मत एनएसयूआयचे प्रभारी कन्हैय्या कुमार यांनी व्यक्त केले. मुंबईच्या एकदिवसीय दौऱ्यादरम्यान ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचा आणि मुंबईचा वाटा खूप मोलाचा आहे. पण आज हीच मुंबई पंतप्रधानांच्या मित्राला आंदण देण्याची तयारी केंद्र आणि राज्यातल्या सरकारने चालवली आहे, अशी टीका युवा नेते कन्हैय्या कुमार यांनी केली. एनएसयूआयचे प्रभारी झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर आलेल्या कन्हैय्या यांनी देशात वारेमाप वाढलेली बेरोजगारी, शिक्षण क्षेत्रातील समस्या, शेतकऱ्यांसोबतच विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या आदी गोष्टींवर सडकून टीका केली. कन्हैय्या कुमार यांचं स्वागत करताना मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी पोलिसांकडून संपूर्ण दौऱ्यातील विविध कार्यक्रमांना कशी आडकाठी केली जात आहे, हे नमूद केलं. पोलिसांवर कोणाचा दबाव आहे, हे सर्व जनता ओळखते. पण हा दबाव झुगारून आम्ही आमचे कार्यक्रम करणार आहोत, असंही त्या म्हणाल्या.

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच कन्हैय्या यांनी मुंबईने आपल्याला किती भरभरून दिलं आहे, याची आठवण सांगितली. आपल्या मुंबई दौऱ्यात विविध कार्यक्रमांना पोलिसांकडून आडकाठी केली जात आहे. त्यात पोलिसांचा दोष नाही. ठरावीक नेत्यांचे तळवे चाटणं, म्हणजे देशसेवा अशी धारणा आजकाल झाली आहे. पण या नेत्यांचे पगार, भत्ते लोकांनी भरलेल्या करातून निघतात. त्यामुळे हे लोक सामान्य जनतेला उत्तरदायी आहेत, हे त्यांना विसरून चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. काँग्रेसमध्ये आल्यापासून भाजपचं आमच्यावरचं प्रेम खूप वाढलं आहे. पण ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकरला शेन वॉर्नची फिरकी खेळण्याची सवय झाली होती, त्याचप्रमाणे मलाही जय शाह यांच्या वडिलांची गुगली खेळता येते, असा टोलाही त्यांनी हाणला.

...मग पात्रता निकष कशाला?
एकीकडे पंतप्रधान ‘सबका साथ सबका विकास’ अशी घोषणा करतात आणि दुसऱ्या बाजूला मुंबईत पुनर्विकासाधीन असलेल्या लोकांना पात्रता निकष लावतात. समजा सगळे आपलेच असतील, तर मग हा पात्रता निकष कशासाठी, असा प्रश्न कन्हैय्या यांनी विचारला. धारावी पुनर्विकास प्रकल्पात हजारो लोकांना पात्रता निकष लावून बाद ठरवण्यात येत आहे. त्यावर सडकून टीका करताना कन्हैय्या यांनी पुन्हा ‘मोदींच्या मित्रा’चा उल्लेख केला. 

फडणवीस यांचा ‘अडवाणी’ केला
राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना कन्हैय्या कुमार यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. फडणवीस ‘मी पुन्हा येईन,’ असं म्हणत होते. पण केंद्रातल्या त्यांच्या मदाऱ्यांनी त्यांचा पार ‘अडवाणी’ केला आहे. १०५ आमदार असूनही दुसऱ्या पक्षातल्या माणसाला मुख्यमंत्रीपदी बसवून स्वत: त्यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना काम करावं लागत असल्याची टीका त्यांनी केली. तसंच भाजपच्या या वॉशिंग मशीनमध्ये कोणतं डिटर्जंट वापरतात की, पक्षात येण्याआधी भ्रष्ट असलेला नेता भाजपमध्ये गेल्यानंतर अचानक पवित्र होतो, असा सवालही त्यांनी या वेळी केला.

ड्रग्जचे साठे अदानींच्याच बंदरात कसे?
राज्यात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या प्रकरणावरही कन्हैय्या यांनी भाष्य केलं. तरुणाईच्या मेंदूला नियंत्रित करण्याचं काम ड्रग्ज करतात. ड्रग्जच्या आहारी गेलेल्या तरुणांना भोवतालाचं भानच राहत नाही. त्यामुळे हे ड्रग्ज तरुणाईला खाईत लोटण्याचं काम करत आहेत. त्यांना घर, कुटुंब, समाज, देश याची कसलीच शुद्ध राहत नाही, असं कुमार म्हणाले. त्याचसोबत ड्रग्जचे अतिप्रचंड साठे अदानी यांच्या ताब्यात असलेल्या मुंद्रा बंदरातच कसे मिळतात, यावर केंद्रीय गृहमंत्रालय काहीच बोलत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

आर्थिक धोरण बदलण्याची गरज
देशात रोजगार निर्मिती वाढवायची असेल, तर देशाचं आर्थिक धोरण बदलण्याची गरज कन्हैय्या कुमार यांनी बोलून दाखवली. आज आपण चीनमधून आलेल्या गोष्टी वापरतो. पण आपल्याकडील उत्पादकता आपण मारली आहे. सेवा क्षेत्रासोबतच उत्पादनावर भर दिला, तरच देशात रोजगार निर्मिती होईल. त्यासाठी एककेंद्रीतता मोडावी लागेल, असंही कन्हैय्या म्हणाले. आज देशात सगळ्याच क्षेत्रांमध्ये एककेंद्री व्यवस्था झाली आहे. त्यामुळे सर्वांना समान संधी मिळत नाही. स्पर्धेसाठी समान संधी तयार केली, तरच नवे उद्योजक आणि उद्योग उभे राहतील. त्यातूनच रोजगारनिर्मिती होईल, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

Web Title: A Marathi man from Maharashtra will teach a lesson to Delhiites, says kanhaiya kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.