जेजे’तील ९०० निवासी डॉक्टर आजपासून संपावर

By संतोष आंधळे | Published: December 27, 2023 09:07 PM2023-12-27T21:07:40+5:302023-12-27T21:07:57+5:30

त्वचाविकार विभागातील संपकरी डॉक्टरांना पाठिंबा

900 resident doctors in JJ on strike from today | जेजे’तील ९०० निवासी डॉक्टर आजपासून संपावर

जेजे’तील ९०० निवासी डॉक्टर आजपासून संपावर

मुंबई: जे. जे. रुग्णालयातील त्वचाविकार विभागातील २१ डॉक्टर गेल्या नऊ दिवसांपासून सामूहिक रजेवर आहेत. विभागप्रमुख डॉ. महेंद्र कुरा यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून २१ डॉक्टरांनी हा पवित्रा घेतला आहे. मात्र, अजूनही डॉ. कुरा यांना पदावरून हटविले गेलेले नाही. या संपाला पाठिंबा दर्शविण्यासाठी रुग्णालयातील सर्व ९०० निवासी डॉक्टरांनी उद्या, गुरुवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. निवासी डॉक्टर संपावर जाणार असले तरी अतितत्काळ विभागात मात्र ते सेवा देणार आहेत. ओपीडी आणि वॉर्डमधील रुग्ण मात्र ते पाहणार नाहीत.

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि त्वचाविकार विभागातील संपकरी डॉक्टर यांच्यात मंगळवारी बैठक झाली. मात्र, त्यात कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन सुरूच ठेवले. या आंदोलनाला सर्व निवासी डॉक्टरांनी पाठिंबा दर्शविला आहे. विविध आरोप असलेल्या डॉ. कुरा यांच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. त्यात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले आणि ससून वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांचा समावेश आहे. या प्रकरणी आठडाभरापूर्वी चौकशी समितीने त्यांचा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांना सादर केला आहे. त्यानंतर शासनाने डॉ. कुरा यांना सक्तीच्या रजेवर पाठविले.

जे.जे. निवासी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. शुभम सोहनी यांनी सांगितले की, “काही दिवसांपूर्वीच आम्ही रुग्णालय प्रशासन, वैद्यकीय शिक्षण संचालक, आयुक्त, मंत्री यांना आमच्या मागणीसंदर्भात पत्र देऊन आम्ही संपावर जाण्याचा इशारा दिला होता. मात्र, अद्यापही त्वचाविकार विभागातील निवासी डॉक्टरांची मागणी पूर्ण झाली नाही. डॉ. कुरा यांची तक्रार करून २० दिवस झाले, १० दिवसांपासून त्वचाविकार विभागातील निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर आहेत. तरीही सरकार काही कारवाई करीत नाही. त्वचाविकार विभागातील अध्यापकांनीसुद्धा डॉ. कुरा यांच्याविरोधात तक्रार केली आहे. त्यामुळे आम्ही सर्व ९०० निवासी डॉक्टर गुरुवारपासून संपावर जात आहोत.”

Web Title: 900 resident doctors in JJ on strike from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.