७०० टॅक्सी पिंजून शोधली परदेशी नागरिकाची बॅग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 03:00 AM2018-07-20T03:00:09+5:302018-07-20T03:00:30+5:30

कुलाबा पोलिसांची कामगिरी

700 foreign civic bags discovered by taxi cage | ७०० टॅक्सी पिंजून शोधली परदेशी नागरिकाची बॅग

७०० टॅक्सी पिंजून शोधली परदेशी नागरिकाची बॅग

मुंबई : व्यवसायासाठी मुंबईत आलेल्या दोन परदेशी नागरिकांची बॅग टॅक्सीत हरविली. ‘अतिथी देवो भव’ म्हणत मुंबई पोलिसांनी ७०० टॅक्सी पिंजून काढत अवघ्या २४ तासांत त्यांची बॅग शोधली. त्यामुळे मुंबई पोलिसांचे कौतुक होत आहे.
कुलाबा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदानचे नागरिक असलेले मोहमद अब्दुल युसूफ हसन (२२) व अब्दुल राहिम बसिर याकूब (३९) हे दोघे मुंबईत व्यवसायासाठी आले होते. १७ जुलैला हसन आणि याकूब यांनी सहार येथून टॅक्सी पकडली. ते कुलाबा येथील हॉटेलकडे उतरले. टॅक्सीतून उतरताना ते त्यांचे पैसे आणि पासपोर्ट असलेली बॅग घेण्यास विसरले. ही बाब लक्षात येताच त्यांनी कुलाबा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
त्यांच्या तक्रारीवरून कुलाबा पोलिसांनी तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धोपावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतल्या टॅक्सीचा शोध सुरू केला. सीसीटीव्हींच्या माध्यमातून टॅक्सीचा क्रमांक मिळवला. आरटीओतून चालकाची माहिती मिळवली. त्याचा मोबाइल क्रमांक मिळविला. मात्र त्याच्याशी वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर त्यांनी त्याचे घर गाठले. मात्र ७ वर्षांपूर्वीच तो घर विकून दुसरीकडे राहण्यासाठी गेल्याचे समजले. पुढे स्थानिक रहिवाशांकडे केलेल्या चौकशीत, तो टॅक्सीचालक सांताक्रुझ परिसरामध्ये त्याच्या टॅक्सीमध्ये राहत असल्याचे समोर आले.
सहार विमानतळ परिसरात शोध घेऊनही तो सापडला नाही. शेवटी टॅक्सी स्टॅण्डचे रेकॉर्ड तपासले असता रात्री २ वाजता टॅक्सी स्टॅण्डला त्याची टॅक्सी आत आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सुमारे ७०० टॅक्सी पिंजून काढल्या. अखेर त्याच्यापर्यंत पोहोचण्यास पोलिसांना यश आले. त्याने ती बॅग पोलिसांच्या ताब्यात दिली.
पोलिसांनी परदेशी नागरिकांना बोलावून त्यांची बॅग तपासणीअंती त्यांना परत दिली. हरविलेली बॅग परत सापडल्याने सुदानचे नागरिक आनंदी होऊन पोलिसांचे आभार मानत मायदेशी परतले.

Web Title: 700 foreign civic bags discovered by taxi cage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.