मराठवाड्यातील सिंचनावर ६८६ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 05:00 AM2017-11-21T05:00:33+5:302017-11-21T05:00:52+5:30

मराठवाड्यातील निम्न दुधना आणि नांदूर मध्यमेश्वर या दोन सिंचन प्रकल्पांवर गेल्या एक वर्षांत ६८६ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी दिली.

686 crores spent on irrigation in Marathwada | मराठवाड्यातील सिंचनावर ६८६ कोटी खर्च

मराठवाड्यातील सिंचनावर ६८६ कोटी खर्च

Next

मुंबई : मराठवाड्यातील निम्न दुधना आणि नांदूर मध्यमेश्वर या दोन सिंचन प्रकल्पांवर गेल्या एक वर्षांत ६८६ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी दिली. औरंगाबाद येथे गेल्यावर्षी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात आयोजित अधिकाºयांच्या बैठकीत घेतला. मराठवाड्यात आधीच्या काळात रखडलेले अनेक सिंचन प्रकल्पांना गती आली असून उर्वरीत कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
१२ वर्षापासून रखडलेले वाकी धरणाचे काम निधी उपलब्ध झाल्याने आता पूर्ण झाले आहे. तसेच भाम धरणाचे कामही मागच्या एका वर्षात ४० टक्क्यांवरुन ८५ टक्के पूर्ण झाले असून ते मार्च २०१८ पर्यंत १०० टक्के पूर्ण होईल. वाकी धरणाच्या पुर्ततेमुळे ७५.८ एमसीएम इतकी पाणीसाठा क्षमता निर्माण झाली असून ८ हजार ९४० हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. निम्न दुधना प्रकल्पात साधारण ५० हजार ३० हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.
निम्न दुधना प्रकल्पांतर्गत वाकी धरणावर गेल्या एका वर्षात ३३२ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यातून या धरणात ७५.८ एमसीएम इतकी पाणीसाठा क्षमता निर्माण झाली असून ८ हजार ९४० हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.
या बैठकीस मुख्य सचिव सुमित मलिक यांच्यासह विविध विभागांचे सचिव डी. के. जैन, सुधीर श्रीवास्तव, आय. एस. चहल, प्रविण परदेशी, सुनिल पोरवाल, मनोज सौनिक, नितीन गद्रे, आशिषकुमार सिंह, असीम गुप्ता, वल्सा नायर सिंह, एकनाथ डवले आदी उपस्थित होते.
>कृष्णा खोºयातून पाणी देण्यासाठीच्या प्रकल्पांना गती
२०१७-१८ मध्ये कृष्णा-भिमा स्थिरीकरण प्रकल्पासह कृष्णा मराठवाडा प्रकल्पास २५० कोटी रुपयांचा विशेष निधी राज्यपालांच्या सुत्राबाहेर मंजूर करण्यात आला आहे. यामुळे २००७ पासून रखडलेल्या या कामास गती प्राप्त झाली आहे.
कडकनाथवाडी साठवण तलावाचे काम पूर्ण झाले असून येसवंडी साठवण तलाव, नळदूर्ग बंधारा आणि सोमनथळी बॅरेजचे काम प्रगतीपथावर आहे. अशी माहिती यावेळी अधिकाºयांनी दिली.
मराठवाड्याची पाण्याची गरज लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत हे काम मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
तेरचे वस्तुसंग्रहालय
तेर येथील शासकीय वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. या कामाची निविदा प्रसिद्ध करून बांधकाम तातडीने सुरू करण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिल्या.
२०१८पर्यंत घरकूल
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मराठवाडा विभागात १ लाख ७ हजार घरकुलांना मान्यता देण्यात आली आहे. या सर्व लाभार्थ्यांना अनुदान उपलब्ध करून देऊन २०१८ अखेर ही घरकुले पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले.
>याही कामांचा आढावा
मराठवाडा वॉटर ग्रीड योजना, जालना रेशीमकोष बाजारपेठ, लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास संस्था स्थापन करणे, औरंगाबाद येथील जलसंधारण आयुक्तालय, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी येथे नवी कौटुंबिक न्यायालय स्थापन करणे आदी विविध विषयांचा यावेळी मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.

Web Title: 686 crores spent on irrigation in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई