ग्राहक पंचायतीच्या दरबारी राज्यभरातून ५६७ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 04:02 AM2018-07-09T04:02:09+5:302018-07-09T04:02:38+5:30

विमा, क्रेडिट कार्ड, शिक्षण असो वा रुग्णालयाचे प्रकरण अशा एक ना अनेक तक्रारींचा निपटारा नुकताच ग्राहक पंचायतीने केला आहे. राज्यभरातून मुंबई ग्राहक पंचायतीकडे गेल्या सहा महिन्यांत विविध क्षेत्रांतील तब्बल ५६७ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

567 complaints in the consumer Panchayat court | ग्राहक पंचायतीच्या दरबारी राज्यभरातून ५६७ तक्रारी

ग्राहक पंचायतीच्या दरबारी राज्यभरातून ५६७ तक्रारी

Next

- स्नेहा मोरे
मुंबई  - विमा, क्रेडिट कार्ड, शिक्षण असो वा रुग्णालयाचे प्रकरण अशा एक ना अनेक तक्रारींचा निपटारा नुकताच ग्राहक पंचायतीने केला आहे. राज्यभरातून मुंबई ग्राहक पंचायतीकडे गेल्या सहा महिन्यांत विविध क्षेत्रांतील तब्बल ५६७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील २१५ तक्रारींचे निवारण करण्यात ग्राहक पंचायतीला यश आले आहे. त्यातील सर्वाधिक तक्रारी रिअल इस्टेट क्षेत्रातील असल्याची माहिती पंचायतीच्या तक्रार मार्गदर्शन केंद्राने दिली.
जानेवारी ते जून २०१८ या काळात रिअल इस्टेट क्षेत्रातील विकासक, वसाहतींशी निगडित १६७ तक्रारी दाखल झाल्या. तर त्याखालोखाल ‘रेरा’विषयक १०८ तक्रारी पंचायतीकडे दाखल झाल्या आहेत. तक्रारींविषयी मार्गदर्शन करताना पंचायतीच्या तक्रार मार्गदर्शन केंद्रांचे प्रमुख समन्वयक राजन समेळ यांनी सांगितले की, आॅनलाइन उत्पादनांविषयीच्या तक्रारीही वाढल्या आहेत. मात्र याविषयी पहिल्यांदा पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला ग्राहकांना दिला जातो. कारण या तक्रारी सायबर गुन्हे विभागांतर्गत येतात. त्यानंतर ग्राहकांना मार्गदर्शन केले जाते.
तक्रारींचा आढावा घेताना मुंबई ग्राहक पंचायतीचे सर्व तक्रार मार्गदर्शन केंद्रांचे प्रमुख समन्वयक राजन समेळ यांनी याविषयी सांगितले की, सर्वाधिक तक्रारी या रिअल इस्टेट क्षेत्रातील असतात, त्याचे प्रमाण ६० टक्के एवढे आहे. त्यानंतर सध्या रेरा प्रकरणांविषयीच्या तक्रारींची संख्याही वाढताना दिसते आहे. ग्राहकांनी घर विकत घ्यावे, यासाठी गुलाबी स्वप्नरंजन केले जाते.
ग्राहकांनी एकदा कर्ज काढून घराची किंमत मोजली की त्यानंतर मात्र बिल्डर व ग्राहक यांच्यातील संबंध विविध कारणांमुळे ताणले जाण्यास प्रारंभ होतो. वेळेत प्रकल्प पूर्ण झाला नाही तर कर्जाचा भार सोसावा लागतो, शिवाय अकारण भाड्याच्या घरात आश्रय घ्यावा लागतो. ज्यामध्ये बिल्डरांनी ग्राहकांकडून घराची रक्कम उकळली, परंतु त्यानंतर त्यांनी घर बांधण्याऐवजी पोबारा केला. त्यामुळे पिचलेल्या ग्राहकांनी अखेर अशा बिल्डरांविरोधात दाद मागितल्याची अनेक प्रकरणे आहेत.

सुशिक्षित तरी जागरूकतेचा अभाव

आजही सुशिक्षित व्यक्ती असली तरी ‘ग्राहक’ म्हणून जागरूक नसते ही खंताची बाब आहे. आपण दहा रुपयांची कोथिंबिरीची जुडी घेताना चाचपून घेतो, मात्र लाखभर रुपयांचे व्यवहार करताना सावधानता बाळगत नाही. बऱ्याच प्रकरणांमध्ये ही बाब निदर्शनास येते की, सुशिक्षित वर्गातील व्यक्तींमध्ये याविषयी जागरूकता कमी असते. शिवाय, तक्रार निवारण होण्यासाठीचा संयमही कमी दिसून येतो.

Web Title: 567 complaints in the consumer Panchayat court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.