542 hutment dwellers in Poissier will be rehabilitated in SRA, MLA Sunil Prabhu's success | मालाडच्या पोईसरमधील 542 झोपडीधारकांचे होणार एसआरएमध्‍ये पुनर्वसन, आमदार सुनील प्रभू यांच्या पाठपुराव्याला यश
मालाडच्या पोईसरमधील 542 झोपडीधारकांचे होणार एसआरएमध्‍ये पुनर्वसन, आमदार सुनील प्रभू यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई - मालाड (पूर्व) येथील, पोईसर नदीपात्राच्‍या रुंदीकरणात नदीलगतच्‍या ५४२ झोपडीपट्टीधारकांचे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत पुनर्वसन करण्यात येणार आहे. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी पोईसर नदीपात्राच्‍या रुंदीकरणात ५४२ झोपडीधारकांच्‍या पुनर्वसनाबाबत हे आश्वासन दिले आहे.

शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद, दिंडोशीचे आमदार व माजी महापौर सुनील प्रभू यांनी विधानसभेत औचित्‍याच्‍या मुद्याद्वारे पोईसर नदीपात्रातील झोपड्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. गेली चार वर्षे त्यांनी याप्रकरणी सातत्याने पाठपुरावा केला होता. आमदार प्रभू यांच्या प्रयत्नांना यश येऊन मंत्रीमहोदयांनी येथील 542 झोपडपट्टीवासीयांनी मोठा दिलासा दिला मिळाला आहे, अशी माहिती येथील झोपडपट्टीवासीयांनी लोकमतशी बोलताना दिली.

येथील ५४२ झोपडीधारकांचे एसआरए योजनेंतर्गत पुनर्वसन करण्‍याचे प्रस्‍तावित असल्‍याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी आपल्या लेखी उत्‍तरात म्‍हटले आहे. उर्वरित बाधित झोपडीधारकांचे मुंबई महापालिकेने पुनर्वसन करावे. या योजनेतील संबंधित झोपडपट्टीधारकांना तात्‍पुरत्‍या निवासस्‍थानासाठी भाडे देऊन अन्‍यत्र स्‍थलांतरीत करण्‍याचा प्रस्‍ताव एसआरए योजनेच्‍या विकासकाने एसआरए प्राधिकरणाला दिल्‍याचे लेखी उत्‍तरात नमूद केले आहे, अशी माहिती आमदार प्रभू यांनी दिली.

मालाड पूर्वेकडील दिंडोशी परिसरातील पोईसर नदीपात्रात अनेक वर्षांपासून ५४२ कुटुंबे वास्‍तव्‍य करून आहेत. या नदीला महापूर आल्‍यास येथे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्‍तहानी होण्‍याची शक्‍यता असून, या कुटुंबांचे योग्‍य ठिकाणी पुनर्वसन करावे, अशी मागणी शिवसेनेने केली असता, मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रहिवाशांना एमएमआरडीएची घरे देण्‍याबाबत, सरकार सकारात्‍मक पावले उचलेल,  असे ठोस आश्‍वासन दिले होते अशी माहिती आमदार प्रभू यांनी शेवटी दिली.


Web Title: 542 hutment dwellers in Poissier will be rehabilitated in SRA, MLA Sunil Prabhu's success
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.