उत्पन्नामध्ये पन्नास टक्के गळती

By admin | Published: December 18, 2014 12:56 AM2014-12-18T00:56:05+5:302014-12-18T00:56:05+5:30

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५० टक्के कृषीमालाची बाजार फी वसूल होत नाही. उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचा धक्कादायक कबुली

50 percent leakage in income | उत्पन्नामध्ये पन्नास टक्के गळती

उत्पन्नामध्ये पन्नास टक्के गळती

Next

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५० टक्के कृषीमालाची बाजार फी वसूल होत नाही. उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचा धक्कादायक कबुली पणन संचालक सुभाष माने यांनी दिली. बाजार समितीची स्थिती अत्यंत वाईट असून येथे सुरू असलेली हत्ता पद्धत तत्काळ बंद करण्यात यावी, असे आदेशही त्यांनी दिले.
न्यायालयीन लढाईनंतर पणन संचालक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सुभाष माने यांनी बुधवारी मुंबई एपीएमसीच्या कामकाजाचा आढावा घेतला. बैठकीमध्ये बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कामकाज नियमानुसार होत नसल्याविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, संस्थेची स्थिती अत्यंत बिकट आहे. या ठिकाणी नियमांचे पालन होत नाही. अधिकाऱ्यांना विचारलेल्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर देता आलेले नाही. येणाऱ्या कृषीमालापैकी ५० टक्के मालाचीच बाजार फी वसूल होत आहे. उर्वरित ५० टक्केची गळती सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांशी चर्चा करताना निदर्शनास आले. व्यापाऱ्यांची दफ्तर तपासणी होत नाही. दफ्तर तपासणी सुरू केली की व्यापारी दबाव आणून कामकाज बंद पाडतात. ही अत्यंत गंभीर गोष्ट असून बाजार समिती व्यापारी चालवतात का, असा प्रश्न माने यांनी उपस्थित केला. दफ्तर तपासणी तत्काळ सुरू करण्यात यावी, जर कोणी विरोध करत असेल तर त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत असा आदेशही देण्यात आला आहे.
मुंबई बाजार समितीमध्ये अद्याप हत्ता पद्धत सुरू आहे. कायद्याने बंदी असतानाही या ठिकाणी मालाची विक्री करण्यासाठी ही पद्धत अवलंबली जात आहे. पणन संचालकांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्याही स्थितीमध्ये हत्ता पद्धत बंद झालीच पाहिजे. जर कोणी अशाप्रकारे व्यापार करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 50 percent leakage in income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.