४८ तासांचा फुसका बार, खड्डे बुजविण्यात पालिका प्रशासन अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 02:29 AM2018-07-16T02:29:30+5:302018-07-16T02:31:32+5:30

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे.

48 hours of fuselage bar, municipal administration fails to dig potholes | ४८ तासांचा फुसका बार, खड्डे बुजविण्यात पालिका प्रशासन अपयशी

४८ तासांचा फुसका बार, खड्डे बुजविण्यात पालिका प्रशासन अपयशी

Next

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर चहूबाजूंनी टीकेची झोड उठत होती. त्यानंतर, महापालिका प्रशासनाने ४८ तासांत ३५८ खड्डे बुजविण्याचा दावा केला होता. मात्र, रविवार उलटला, तरीही खड्ड्यांची परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. या उलट पावसामुळे खड्ड्यांमध्ये भरच पडली आहे. याविषयी ‘रिअ‍ॅलिटी चेक’ केले असता हा दावा फोल ठरला आहे. या खड्ड्यांमुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने खड्ड्यांविषयी पालिका प्रशासनाला सुनावले होते. यामुळे जागे झालेल्या पालिका प्रशासनाने ४८ तासांत खड्डे बुजविण्याचा दावा केला होता. पालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईत केवळ १ हजार ३२ खड्डे होते. यापैकी ६७४ खड्डे आतापर्यंत बुजविण्यात आले आहेत. त्यानंतर, शुक्रवारी ३५८ शिल्लक होते, हे खड्डे ४८ तासांत बुजविण्याचा दावा करण्यात आला होता, पण हे खड्डे जैसे थे असल्याने पालिकेचा दावा आता फोल ठरला आहे. पालिका प्रशासनातर्फे खड्डे बुजविण्यासाठी जर्मन तंत्रज्ञान असलेल्या ‘कोल्डमिक्स’ पद्धतीचा वापर केला जात आहे. मात्र, वातावरणामुळे खडी दमट झाल्याने यासाठीचे मिश्रणही तयार करण्यात प्रशासनाला फारसे यश आलेले नसल्याने, काही रस्त्यांवर पेव्हरब्लॉक घालून खड्डे बुजवले जात आहे. शहर उपनगरातील रस्त्यांची संततधार पावसामुळे चाळण झाली आहे. अनेक मार्ग, उड्डाण पूल, तसेच अंतर्गत रस्त्यांवरही खड्डे पडले असून, ते कधी बुजवणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
>एकाच मार्गावर १५० खड्डे
पालिका प्रशासनाने म्हटल्यानुसार, संपूर्ण मुंबईत केवळ ३५८ खड्डे शिल्लक राहिल्याची माहिती होती, परंतु गुरुवारी पार पडलेल्या पालिकेच्या महासभेत काँग्रेसने मात्र वेगळीच माहिती उघड केली होती. काँग्रेसने आयोजित केलेल्या खड्डे मोजण्याच्या मोहिमेत फक्त वांद्रे येथील शर्ली राजन मार्गावर १५० खड्डे असल्याची माहिती काँग्रेसने दिली होती. त्यातील काही खड्डे बुजविल्याचेही काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटले होते.
२९७.९९ टन कोल्डमिक्स
कोल्डमिक्स या जर्मनीच्या तंत्रज्ञानाचा वापर खड्डे बुजविण्यासाठी केला जात आहे. पालिका प्रशासनाने यंदा वरळी येथील आपल्या कारखान्यात स्वत: हे कोल्डमिक्स तयार करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत २९७.९९ टन कोल्डमिक्स तयार करण्यात आले असून, त्यातील २९३.२१ टन कोल्डमिक्स वापरण्यात आले आहे.

Web Title: 48 hours of fuselage bar, municipal administration fails to dig potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.