४७६२ वाहनांची चोरी

By admin | Published: January 12, 2016 01:02 AM2016-01-12T01:02:25+5:302016-01-12T01:02:25+5:30

पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये सहा वर्षांमध्ये तब्बल १०० कोटी रुपये किमतीच्या ४७६२ वाहनांची चोरी झाली आहे. यामधील फक्त १३८० गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, ३३८२ गुन्ह्यांचा

4762 Theft of vehicles | ४७६२ वाहनांची चोरी

४७६२ वाहनांची चोरी

Next


- नामदेव मोरे,  नवी मुंबई

पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये सहा वर्षांमध्ये तब्बल १०० कोटी रुपये किमतीच्या ४७६२ वाहनांची चोरी झाली आहे. यामधील फक्त १३८० गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, ३३८२ गुन्ह्यांचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे.
नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण वाढले असले तरी तपास न झालेल्या गुन्ह्यांची संख्याही दुर्लक्ष करण्यासारखी नाही. पनवेल, उरण व नवी मुंबईमध्ये वाहन चोरी करणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. पोलिसांनी या टोळ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. यामुळे सहा वर्षांत सातत्याने गुन्हे कमी होत असले तरी रोज किमान एक तरी वाहनाची चोरी होतच आहे. पूर्वी चोरटे मोटारसायकलचीच चोरी करायचे. परंतु आता कारसह ट्रेलरसारखी अवजड वाहनेही चोरीला जात आहेत.
वाहनधारकांमधील असुरक्षितता वाढली आहे. रात्री सोसायटीच्या आवारात उभी केलेली गाडी सकाळी तेथे दिसेलच याची खात्री नाही. रोड, वाहनतळ व इतर ठिकाणी उभ्या केलेल्या वाहनांच्या सुरक्षेची कोणतीच शाश्वती राहिलेली नाही. २०१० मध्ये पोलीस आयुक्तालय क्षेत्रात तब्बल १०३५ वाहनांची चोरी झाली होती. यामधील फक्त २९८ गुन्ह्यांचा उलगडा करता आला होता.
२०१५ मध्ये ५९४ वाहनांची चोरी झाली असून त्यामधील १३८० वाहनांचा शोध घेण्यात यश आले आहे. गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण सहा वर्षांपूर्वी २८ टक्के होते ते आताही तेवढेच आहे.
वाहन चोरीच्या घटना थांबविण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी गांभीर्याने प्रयत्न करत आहेत. परंतु पोलीस स्टेशनमधील कर्मचारी मात्र या गुन्ह्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. वाहन चोरीची तक्रार देण्यासाठी गेलेल्या नागरिकांना योग्य वागणूक दिली जात नाही. त्यांनाच झापले जाते. पहिल्यांदा सर्वत्र शोध घ्या व नंतर तक्रार करण्यासाठी या असे सांगितले जाते.
वास्तविक वाहन चोरीच्या घटनांची दखल फोनवरूनही घेतली पाहिजे. तत्काळ कंट्रोल रूम व राज्यात इतर ठिकाणी वायरलेस मेसेज दिले तर या घटना थांबविणे सहज शक्य होणार आहे. गुन्हे रोखण्यासाठी फक्त पोलीस काहीच करू शकत नाहीत. वाहनधारकांचा निष्काळजीपणाही चोरट्यांच्या पथ्यावर पडत आहे. वाहनांच्या म्युझिक सिस्टीम व इतर गोष्टींवर हजारो रुपये खर्च करणारे वाहनामध्ये सुरक्षा उपकरण बसवत नाहीत.
रेल्वे स्टेशनच्या वाहनतळावर तेथील ठेकेदार पैसे वसूल करतात परंतु त्या वाहनांची जबाबदारी घेत नाहीत. सीसीटीव्ही कॅमेरेही बसविले जात नाहीत. वाहनांची चोरी झाली की पूर्णपणे पोलिसांना दोष देण्यापेक्षा वाहनधारकांनीही थोडे दक्ष राहिले तर या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविणे सहज शक्य होवू शकते.

चोरीची वाहने जातात कुठे?
नवी मुंबईमधील रोज किमान एकतरी वाहनाची चोरी होत आहे. चोरी केलेली वाहने नक्की कुठे जातात हे कोडे अद्याप उलगडलेले नाही. पोलिसांनी काही टोळ्या जेरबंद केल्या आहेत. सोनसाखळी चोरी करणारेही वाहन चोरी करून तिचा वापर सोनसाखळी हिसकावण्यासाठी करत असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले. गुजरातमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये वापरलेल्या वॅगनआर कारची नवी मुंबईतून चोरी झाली असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. काही वाहने उत्तरेकडील राज्यांमध्ये विकली जात असल्याची चर्चा आहे. अनेक जण भंगारमध्ये वाहने विकत असल्याची चर्चा असते. वाहनचोरी रोखण्यासाठी फक्त पोलिसांनी प्रयत्न करणे पुरेसे नसून नागरिकांनीही दक्ष राहणे आवश्यक आहे. 

Web Title: 4762 Theft of vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.